वृत्त - शुध्दसती
८ २ २ (प - +)
हसतात जर्द पिवळे
घड सोनझुंबरांचे
ग्रीष्मात अनुभवावे
सौंदर्य बहाव्याचे
धग सोसुनी बहावा
सुखहिंदोळे घेतो
वैभव कांचनवर्खी
जगताला दाखवतो
वणव्यातला निखारा
कवटाळुनी उराशी
मिरवतो डौल अपुला
गुलमोहर बघ हौशी
काहिली सोसताना
हसणे जरा पहा तू
शिक पोळुनी बहरणे
गुलमोहराकडे तू
बघ समरसून मनुजा
ऋतुसोहळे धरेचे
सांभाळ तूच आता
औदार्य निसर्गाचे
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment