Wednesday, August 23, 2006

हॉस्पीटल

मला हॉस्पीटल ह्या जागेबद्दल थोडंसं वावडंच आहे. पण त्यात काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल मात्र नितांत आदर आहे. सगळ्या लोकांचं आशास्थान असलेली ही वास्तू कोणालाच नावडावी हे ह्या वास्तूचं दुर्दैवच म्हणावं लागेल. अवीसोबत कुवेतमधल्या मोठ्या हॉस्पीटलमधे जायची एकदा वेळ आली. तिकडून घरी आल्यावर काहीतरी घालमेल व्हायला लागली आणि ही कविता उतरली.

तटस्थ इमारतीतली
अविरत धावपळ
पांढऱ्या रंगातली
लयबद्ध पळापळ
बाहेरची हिरवळ
मनातली पानगळ
प्रश्नार्थक चेहेरे
व्याकुळ मन
असहाय नजरा
पिडलेलं तन
उरातली धडधड
देहाची पडझड
व्याधींचं गाठोडं
थकलेलं शरीर
शोधतंय निवारा
एक छोटासा कोपरा
सांत्वनाची थाप
हसरा दिलासा
अगतिक डोळ्यांना
पेलणारा खुलासा

जयश्री

Sunday, August 20, 2006

खेळ मनाचा

कधी कधी मन... एक नाचरा मोर
फुलवतं पिसारा इंद्रधनुषी, होऊन भावविभोर
जगलेले काही क्षण, काही आठवणी विलक्षण
येतात उचंबळून वर
आणि देऊन जातात असीम सुख
अगदी तसेच, पुन्हा एकदा.
त्या सरींचा कोसळ
आणतो शहारा नवा
नवी हुरहुर, नवी थरथर
गंधही नवा नवा

कधी हेच मन झाकोळतं
होतं हताश, निराश
गढूळ बुडबुडे आठवणींचे
करतात नकोसे सारे पाश
सारं काही गडद काळं
दीनवाणं, उदास उदास
गुदमरलेला जीव
अन सारं काही भकास

खेळ सारा मनाचा
डाव कधी जिंकलेला
कधी दुबळ्या हातांनी
स्वत:च घालवलेला.
हसरा, नाचरा मोर
की खिन्न काळोख....
असतं आपल्यालाच ठरवायचं
मनाला ताब्यात ठेवून
जिंकायचं की हरायचं.

जयश्री

ही वाट दूर जाते

इथे कुवेतला आल्यावर सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आपल्याला (म्हणजे स्त्रियांना) पटकन मनात आलं की बाहेर पडता येत नाही. तसं बायका सुद्धा इथे driving करतात म्हणा. पण मी नाही करत drive इथे. म्हणून सर्वस्वी नव-याच्या मर्जीवर असतं बाहेर जाणं. बरेचदा मस्त Long drive ला जावंसं वाटतं...... पण नेमका तेव्हा जर पतीराजाचा मूड नसेल तर सगळं मुसळ केरात. असंच एकदा बाहेर मस्त वातावरण होतं......... मग मला नेहेमीप्रमाणेच बाहेर भटकायचा मूड आला. पण ह्यांचा मात्र अजिबात नव्हता........ मग काय करणार......बाल्कनीत येऊन बाहेरच्या बोलावणा-या रस्त्याकडे बघत बसली आणि ह्या ओळी मनात आल्या.

खूप दूरवर जाणारा रस्ता
कां वाटतो आपलासा
कायम वाट बघणारा
केविलवाणा बराचसा

सोबत त्याच्या एकदा मला
तुझ्या साथीनं जायचंय
खरंच कुठे जातो ते
शोधून काढायचंय

विरक्त साधूसारखा
असतो तो अलिप्त
साथ मात्र देतो तो
समजून सकला आप्त

येशील तू माझ्यासोबत...
जगाच्या अंतापर्यंत...
रस्ता फक्त निमित्त रे....
खरं तर साथ तुझी हवीये
जीवनाच्या अस्तापर्यंत.

जयश्री

Saturday, August 19, 2006

तू हवा..... तू हवा!

कुवेतला विवेकनी जेव्हा गाणी स्वरबद्ध करायला सुरवात केली ना, तेव्हा मलाही असं वाटायचं की आपण पण काहीतरी लिहावं आणि विवेकनी इतर कवितांसारखा माझ्या कवितेलाही स्वरसाज चढवावा. ती वेळ लवकरच आली. तुषार जोशीनी लिहिलेली एक कविता "हवीस तू" ही विवेकला खूप आवडली. त्यानी त्याला स्वरांनी थोडसं सजवलंही. पण काहीतरी वेगळा प्रयोग करायचं हे त्याच्या मनात होतं. तो म्हणाला की ह्यात जसं तुषारनी एका प्रेयसीचं मनोगत लिहिलंय तसं तू एका प्रियकराचं लिहू शकशील का...... जर त्याच मीटरमधे तू लिहिलंस तर आपण एक द्वंद्वगीत बनवू शकू आणि मग "तू हवा--तू हवा " ही कविता जन्मली. त्यातली दोन कडवी घेऊन विवेकनी अतिशय तरल आणि रोमॅंटिक गाणं बनवलं. जे स्पर्श चांदण्याचे ह्या अल्बमधे अर्थात सुरेश वाडकर आणि पद्मजा फ़ेणाणी ह्यांनी गायलं. माझं अतिशय आवडतं गाणं.

स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू


मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ

बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

जयश्री

Tuesday, August 15, 2006

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.

'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं

'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी

जयश्री

Sunday, August 13, 2006

नातं

सरळ सोपं आयुष्य ......... ऊहूं....... काहीतरी घडायला हवं....... something interesting!! किती मज्जा येईल ना....... खूपदा असं वाटायचं........ आणि खरंच तसं घडलंसुद्धा. "तू" ........ हो...... "तूच" ........

एकदा तू मला म्हणालास, 'तू मला खूप आवडतेस'
किती सोपे नि सरळ शब्द !
पण त्या शब्दाच्या आवेगात मी पुरती ओढले गेले

त्या झंझावाताने गोंधळले
त्यातून बाहेर निघायला, हात-पाय हलवायलाही विसरले
हळूहळू तो झंझावातही मला आवडायला लागला
त्याचा आवेग हवाहवासा वाटायला लागला
आता मला आकंठ बुडायचं आहे
अगदी गुदमरेस्तोवर डुंबायचं आहे
तू मात्र मला अडवू नकोस
मला नाही म्हणू नकोस
तुझ्यात गुंतायला तू मला भाग पाडलं आहेस
आता फ़क्त तू आणि मी, मी आणि तू
फक्त हे एकच नातं उरलंय, जे तूच जन्माला घातलं आहेस.

जयश्री

Saturday, August 12, 2006

गर्विता

ही माझी गर्विता. आपल्याच विश्वात मश्गुल..... स्वत:बद्दल अतिशय प्रांजळ अभिमान असलेली..... आपण जगत असलेल्या आयुष्यात ती इतकी खुष आणि समाधानी असते.... की ह्यापुढेही काही सुख असू शकतं ह्याची तिला कल्पनाच नसते. आणि अचानक "तो" तिच्या आयुष्यात येतो...... त्याच्या येण्यानी ती अतिशय गोंधळते. आपण काय जगत होतो आणि आता आपल्याला काय हवंय ह्याची तिला जाणीव त्याच्या येण्यामुळे होते. ती नकळत त्याच्यात गुंतत जाते. त्याच्याशिवाय जगलेलं आयुष्य किती कवडीमोल होतं...... पण तो येतो.... तसा अचानक नाहीसाही होतो..... आपली फक्त एक झलक दाखवून....... पण ती मात्र त्याची वाट बघत राहते........... कधीतरी तो येईल पुन्हा...... कधीतरी नक्कीच.

गर्विता

काया माझी गंध फुलांची
रंगबावऱ्या गुलमोहराची
दवात भिजते, दवात न्हाते
फुलवंती मी अवनीवरची

फुलात गमते, मी गंधाली
सुरात रमते, मीच स्वराली
गंध सुरांचा पांघरून मी
गाणी गाते मी चैताली

चैतन्याची मीच पालवी
कलिका फुलती हास्य पाहुनी
पडे भूल मग भ्रमरालाही
भिरभिरती ते चकित होऊनी

एके दिवशी कसा अचानक
वारा छेडी धून आगळी
मी न राहिले माझी तेव्हा
कशी ओढ ती जगावेगळी

चाहुल कोणा गंधर्वाची
चुकवी ठोका काळजातला
पंचम त्याच्या लकेरीतला
वेग वाढवी स्पंदनातला

खिळले जागी, मंत्रमुग्ध मी
पीयुष सूरांचे प्राशन करुनी,
अजब तृप्तीच्या सागरात त्या
विहरत होते सारे विसरुनी

सूर थांबती, हवेत विरती
नयन शोधिती सूरनायका,
कटू सत्याची जाणीव झाली
सुकून गेली रुपगर्विता

जीवन सारे व्यर्थ भासले
त्या गीताविण, त्या सूराविण
किती युगे ती उलटून गेली
अर्थशून्य मी जगले जीवन

अपराधी मन घेऊन वारा
त्या सूरांना पुन्हा शोधतो
अव्यक्त प्रीतीच्या मूक क्षणांचा
तोच एकटा साक्षी असतो
तोच एकटा साक्षी असतो

जयश्री

धुकं

खरं सांगू का.... मला ना वर्तमानातच रमायला आवडतं. आता ठीक आहे पण पुढे काय होणार, असा विचार करणाऱ्या माणसांचा मला काहीसा रागही येतो. पुढे काय होणार ह्या विचाराने आताचा हा सुखाचा क्षण का वाया घालवायचा? शिवाय तुम्ही जर fighter असाल तर तुमच्या हिम्मतीवर तुम्ही नक्कीच तुमचं भविष्य सुखमय करु शकता. ही कविता अगदी typical माझ्या nature ची कविता आहे.

धुकं

धुक्यात हरवलेली वाट
सभोवती हिरवळ
पण पुढे अंधार दाट

कशाला हवी ती पर्वा
त्या पुढच्या काळोखाची
त्या गूढ भविष्याची

वर्तमानातल्या हिरवळीत
आसूसून नहावं
पाखरासारखं स्वच्छंद बागडावं

आपल्या हातानी भरावं
आपलं सुखाचं माप
धुकंही विरेल मग आपोआप

पुढची वाटही विचारेल मग
कुठे वळायचं
आता कुठल्या शिखरावर जायचं

जयश्री

Friday, August 11, 2006

धरतीचा साज

भारतातल्या पावसात मनसोक्त भिजून इथे कुवेतला परत आल्यावर तिकडच्या पावसाची आठवण यायला लागली. अशाच चुकून इथल्या आभाळात वाट चुकलेल्या एका ढगाला बघून सगळ्याच पावसाच्या आठवणी मनात पिंगा घालायला लागल्या........तेव्हा हा 'धरतीचा साज' सजला.

ह्या माझ्या कवितेला आपल्या सुरेख स्वरांचं संगीत दिलंय विवेक काजरेकरांनी आणि गायलंय सुरेश वाडकरांनी. "स्पर्श चांदण्याचे" ह्या अल्बम मधे हे गाणं ऐकायला मिळेल. व्हिनस कॅसेटनी हा अल्बम वितरीत केलाय. ह्यात माझी ३ गाणी आहेत. सुरेश वाडकरांसोबत पद्मजा फ़ेणाणी ह्यांचीसुद्धा स्वरसाथ आहे ह्या अल्बम मधे.


धरतीचा साज

घन हे आले गरजत बरसत
गंध मनाचा खुलवीत फ़ुलवीत

धरती आतूर, प्रणयी थरथर
मीलनास त्या साक्षी परीसर
अवखळ वारा छेडीत जातो
सूर आगळे, लहरत विहरत
घन हे आले.........

मैफिलीत पाचूच्या हिरव्या
पदन्यास हा सौदामिनीचा
लयीत सरींच्या, संगे रिमझिम
पर्जन्याचा नाद अनाहत
घन हे आले.................

पखरण चैतन्याची अनिमिष
आसमंत मग रंगीत, गंधीत
वेदीवरती धरा उभी ही
नवा लेऊनी साज सलज्जित
घन हे आले ..........

जयश्री

Tuesday, August 08, 2006

चांदणं

कधी कधी आपल्या आजुबाजूचा आसमंत आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. मनाची स्थितीसुद्धा कारणीभूत असते म्हणा...... अशाच एका हळूवार क्षणी, मनाची घालमेल त्याच्यासाठी...... त्याच्या आठवणींसाठी.......

चांदणं

आठवणींच्या चांदण्या
लुकलुकतात नभात
लक्ष ज्योती उजळतात
निरभ्र आकाशात

न्हाऊन निघते काया
त्या शांत प्रकाशात
धुंदावते गात्रन गात्रं
त्या मुग्ध वर्षावात

तोडून सारे तारे
अलगद घेते पदरात
तुझ्या स्पर्शाचे धुमारे
मग प्रत्येक श्चासात

रात्र चढते जशी
भिनते नसानसात
तुझा तीव्र आभास
ह्या टिपूर चांदण्यात

जयश्री

बंदिनी

समाज कितीही पुढारला तरीही स्त्रीवर लादली जाणारी बंधनं अगदी तशीच आहेत. कालानुरुप थोडाफार बदल झाला इतकंच.

बंदिनी

जन्मजात लाभली
बंधने जगातली
कुशीत जरी पहुडली
कोवळी कुमुदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

तरुणाई चिवचिवते
स्वप्नी पंख पसरते

जनकाच्या परी सदनी
पराधीन नंदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

सप्तपदी चालता
जोडवी हासती
नजरकैद कुंकवाची
असून हृदयस्वामिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

सांजकाली जीवनी
पुत्र सुकाणू धरी
पुनश्च वाट चालते
पायी बेडी घालूनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

जयश्री

Sunday, August 06, 2006

असाही एक दिवस

एखादा दिवस असा उगवतो ना..........काही मनासारखं जमतंच नाही. सगळं विपरीतंच घडतं. सारखी चिडचिड स्वत:वर आणि समोर जो दिसेल त्याच्यावर.......... असंच काहीसं.....

एखादा दिवस असा उगवतो
मनाला चुटपुट लावून जातो

सारं काही उलटंच घडतं
आणि उभारलेलं मन कोलमडून पडतं

हरएक गोष्ट चुकतंच जाते
सावरायच्या आधीच विस्कटून जाते

सा-या जगाचा अगदी राग राग येतो
समोरचा प्रत्येक माणूस नकोसा होतो

मन कशातच रमत नाही
कुठल्याच गोष्टीत गमतही नाही

काळाकभिन्न अंधार वेडावू लागतो
मनातल्या काळोखाला अधिकच गडद करतो

सांजवेळीचा दिवाही धापा टाकू लागतो
भिंतीवरल्या सावल्यांशी असहाय झुंज देतो

रात्रीची चढती कमान आणखीनच रुंदावते
सा-या जगाला जणू विळख्यात घेऊ पहाते

थकलेलं मन मग स्वत:ला झोपेच्या स्वधीन करतं
आणि एका शुभ्र दिवसाची स्वप्नं पाहू लागतं.

अस्तित्व

कधी कधी मन उगाचच नको त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंतल्या जातं. स्वत:चं अस्तित्व शोधण्याचा एक चाळा म्हणा हवं तर......! पण सगळं शोधून झाल्यावर कळतं की ह्याची काही गरजच नव्हती मुळी. आपण आपल्या प्रेमळ गोतावळ्यातच आहोत गुरफ़टलेले आणि स्वतंत्र अस्तित्वाची अजिबात गरज नाहीये. आता हे झालं माझं मत...........बघा पटतंय का ?


अस्तित्व

झगडतं मन स्वत:शी
मी म्हणजे कोण
काय ओळख माझी
उत्तरं येतात बरीच
पण खरी मी कुणाची
कायम कुठल्यातरी नात्यात अडकलेली
की कधी होते मी माझी स्वत:ची.....?

कळती झाले जेव्हा,
होते फ़क्त लाडकी लेक आईबाबांची
त्यांच्या सुरक्शित पांघरुणात
कित्ती कित्ती सुखात
हळूहळू सखे सवंगडी आले जीवनात
आणि रमू लागलं मन
एका वेगळ्याच विश्वात
आईबाबांचं ते कवच होतंच
पण अंगण आता झालं होतं
रंगीत...... खुळावलेल्या ढगांचं
कुणाची होते तेव्हा मी........
माझी.......ऊं हू.......नक्कीच नाही.

वेळॆवारी झालं लग्न
बायको झाले त्याची
आई झाले दोन गोजिरवाण्या बाळांची
पण माझी मी कुठे होते........
त्या गोड किलबिलाटात स्वत:ला
हरवून बसले होते.

पाखरं झाली मोठी
उडून गेली आपापल्या जगात
फ़क्त दोघंच उरली त्या
छोट्याशा घरट्यात
तो अन मी.
कुणाची होते तेव्हा मी
माझी......... ऊं हू.....

तेव्हाही मी माझी नव्हतेच
होते त्याची, फ़क्त त्याची
पण आता मनातलं हे प्रश्नांचं वादळ मात्र शमलेलं
चारही किना-यांवर आदळून विसावलेलं.
मी पणाची जाणीवही संपलेली.
उरलीये ती फ़क्त त्याची सखी
त्याच्यासाठी जगणारी
अस्तित्व स्वत:चं विसरलेली.
कुवेतमधे सहसा हिवाळ्यात पाऊस पडतो.
अशाच एका आळसावलेल्या, गारठलेल्या, भिज-या सकाळी
अगदी पांघरुणातली कविता !

Saturday, August 05, 2006

आठवणी

पूर आठवणींचा
आठवणी साचलेल्या
काळजात ओथंबलेल्या
आठवणी पेटलेल्या
होरपळून निघालेल्या
आठवणी भरजरी
मखमली पेटीत जपलेल्या
आठवणी हळूवार
अलगद हातांनी टिपलेल्या
आठवणी पहिल्या स्पर्शाच्या
नकळत लाजलेल्या
आठवणी मीलनाच्या
हृदयात साठलेल्या
आठवणी पावसाच्या
मनात कोसळणा-या
आठवणी सरींच्या
चिंब चिंब भिजवणा-या
आठवणी थंडीतल्या
उबदार कुशीतल्या
आठवणी पहाटॆच्या
गार गार वा-यातल्या
आठवणी विरहाच्या
पिळावटून निघालेल्या
आठवणी भेटीच्या
मोहरून निघालेल्या
आठवणींचे मोहळ
अनावर तो कोसळ
आठवणींचे वादळ
भावनांचा कल्लोळ
आठवणींचा वावर
ओला गहिवर
आठवणींचा आसरा
मनाचा गाभारा
जयश्री

आयुष्य

माझ्या मते आयुष्य हे असं असावं. मी लिहिलेली ही कविता... आयुष्यावरची.

आयुष्य

आयुष्य म्हणजे काय असतं...?
देवानी जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं?
खरं तर... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं
आणि तरुणपण टिकवायचं असतं
माणूसपण जोपासायचं असतं
दुसर्यांना हसवत स्वत:ही फ़ुलायचं असतं
पहाटॆच्या दवबिंदूत नहायचं असतं
प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं
रातराणीच्या झुळूकींनी मोहरायचं असतं
निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं
स्वत:चं राजेपण स्वत:च घडवायचं असतं
मित्रमैत्रीणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफ़िलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनी संपवायचं असतं.

जयश्री

Wednesday, August 02, 2006

नव्या दालनातलं पहिलं पाऊल

॥ॐ गं गणपतये नम:॥
सुरवात गणपतीला वंदन करुन करतेय.
हा माझ्या घरचा गणपती.
कुठलंही काम असो.....छोटं किंवा मोठं.....सगळ्यात पहिले हात गणपती बाप्पापुढे जोडले जातात.
गणपतीच्या आशीर्वादानी आतापर्यंत आयुष्याची वाटचाल खूपच सुखकर झालीये.
देवा, तुझी अशीच कृपादृष्टी असू दे.