Saturday, January 27, 2007

झाड वयात आलेले

मायबोलीवर "झाड वयात आलेले" ह्या ओळीवरुन चक्क जुगलबंदी झाली होती....त्यातला हा माझा सहभाग..........

रंगसोहळा झाडाचा
नेत्र अनिमिष झाले
दृष्ट लावू नका कोणी
झाड वयात आलेले

जाग हळू पानी आली
सारे जग धुंद झाले
यौवनाचा भार साहे
झाड वयात आलेले

कशा परी लपविते
सोनसळी हा बहर
नेत्री साठवते तुझे
झाड वयात आलेले

नको भिती या ग्रीष्माची
नको बावरु असा तू
ऊन जपेल जपेल
झाड वयात आलेले

कळी कळी फुलारली
पान पान हे लाजले
फांदीतून उमटले
सूर गोड ते गोजिरे

काय विपरीत झाले
काय विपरीत झाले
अहो....... झाड वयात आलेले
झाड वयात आलेले

जयश्री

Saturday, January 20, 2007

ओंजळ माझी

भिजलेल्या मनाचा गहिवर
कंठातून दाटून येतो
आणि मग आसवांचा पाऊस
अनावर होतो

मुकेपणा नाही रे त्याला
बांध फुटून कोसळतं सारं
फक्त तूच हवा असतोस त्यावेळी
बाकी व्यर्थ असतं सारं

रुजलास इतक्या खोलवर
अगदी वटवृक्षासारखा पसरलास
प्रत्येक पारंबीच्या मूळाशी तुझा
एक विलक्षण इतिहास

आठवक्षणांची ओंजळ माझी
तुडूंब, काठोकाठ भरलेली
एकही क्षण झिरपू नये म्हणून
कायम जीवापाड जपलेली

जयश्री

Thursday, January 18, 2007

चांदणे प्रीतीचे

हा चंद्र....... आकाशभर विखुरलेलं पौर्णिमेचं चांदणं काही माझा पिच्छा सोडणार नाहीयेत आयुष्यभर....! हे जीवघेणं चांदणं........!

साक्षीने पुनवेच्या
साथीने सखयाच्या
जागविते रात्र मी
चांदण्यात प्रीतीच्या

पांघरते चांदवा,
गंध रातराणीचा
मोहरते मी फ़िरुन
चांदण्यात प्रीतीच्या

चांदरातीची नशा
खुलविते ही निशा
भिजते मी नखशिखान्त
चांदण्यात प्रीतीच्या

जयश्री

Tuesday, January 16, 2007

पुनवरात

धुंद तेच चांदणे
हवेत तोच गारवा
शिरशिरी तशीच का
जागते उरात या

पाकळ्यात उमलती
रंग तेच लाजरे
अंतरात फुलविती
तशीच फुलपाखरे

गंध तोच दरवळतो
अल्लड वार्‍यासवे
तसाच श्वास उसवतो
कोवळ्या कळ्यांसवे

मंतरल्या त्या क्षणात
अजून जीव घुटमळे
पुनवराती आज का
मजसी चांदणे छळे

जयश्री

Saturday, January 13, 2007

सूर्यास्त

का लागली दृष्ट तेजोनिधीला
अवेळी कसा आज सूर्यास्त झाला

अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा
शरण भास्करा तू निशेला कसा

बांधुनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली

अंधार डोही धरा दीनवाणी
कशी भासते आज केविलवाणी

कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची
आस वेड्या जीवाला नव्याने उषेची

जयश्री

Tuesday, January 09, 2007

तू आलास.........?

दाटल्या कंठातूनी ना शब्द काही उमटले
सावळ्या डोळ्यातूनी आभाळ सारे बरसले

पायरव ऐकावयासी, चित्त का आसूसले
उंब-याशी का असे, पाऊल माझे अडखळे

अंगठ्याशी नजर का ही, पदर हाती घुटमळे
मीत मनीचा दारी असता, लाज का ही मज छळे

पापण्यांची ओल सांगे, वेदना विरहातली
शिरशिरी स्पर्शून गेली, अंतरी भेटीतली

लक्ष्य ज्योती उजळती, नयनी अशा का बाव-या
गाली फ़ुलती हास्य कलिका गोजि-या अन्‌ लाज-या

दूर जाता तू सख्या आयुष्य होते थांबले
नव्हतास जेव्हा जवळी तू, जगणेच होते विसरले

जयश्री

Saturday, January 06, 2007

ये ना रे.......!

झालाय अनोळखी काहीसा, जागर तुझा मनातला
अन्‌ परका बराचसा, वावर तुझा मनातला

पुन्हा पुन्हा छळतो सवाल... व्याकुळ मनातला
कसा हरवला माझा सखा... माझ्या मनातला

कसा हा सांधायचा दुवा मनातला
कसा पुन्हा बांधायचा पूल मनातला

तूच फक्त काढू शकतोस, किंतु मनातला
तूच फ़क्त पेटवू शकतोस, दिवा पुन्हा मनातला

तुझ्या येण्याने उजळेल... तिमिर मनातला
तुझ्या स्पर्शाने बहरेल... वसंत मनातला

जयश्री

तू असा

अस्सा आहेस ना तू.......

तू दिलेली फुलं
तशीच आहेत अजून
आसमंत ही गंधित तसाच
तुझं अस्तित्व रेंगाळून

झुळूकीसारखा येतोस
मला फ़सवून
श्वास मात्र माझा
जातोस उसवून

सारं काही बोलतोस
भावस्पर्शी डॊळ्यातून
गात्रं जागवतोस
रेशीम स्पर्शातून

फुललेले क्षण सारे
ठेवलेत मी जपून
वाट पाहते पुन्हा
तशीच मोहरुन

जयश्री

Tuesday, January 02, 2007

स्वयम्‌

कंटाळलास एकटेपणाला.... ?
मग त्या दीपस्तंभाचं काय
काजळलेल्या रात्री तोच दाखवतो ना दिशा,
एकाकीपण सोसूनही....
तूच आहेस तुझ्या आयुष्याचा दीपस्तंभ
इतक्या तारुंना वाट दाखवलीस
आणि आता स्वतःच हरवलास....
तो अढळ धृवतारा बघितलास ना
दिमाखात असतो रे तो सुद्धा
त्याला नसेल जाणवत एकटेपण....
तो सुसह्य करतो आपली वाटचाल
अंधा-या रात्रीलाच सोबत करुन.
तू स्वयंप्रकाशी भास्कर आहेस
रात्रीचा दिवस तूच करु शकतोस
झाकोळलेली वाट तूच उजळू शकतोस
एकाकीपण कुरवाळायला वेळ कुठे आहे तुझ्याकडे....
कितीतरी रात्री संपवायच्या आहेत
कितीतरी दिवस उजळायचे आहेत
उगवणा-या प्रत्येक दिवसाची
एक सुरेल मैफ़िल करायची आहे
पेटवायच्या आहेत दाही दिशा
अंतरीच्या तेजोमृताने
आणि व्यापून टाकायचा आहे हा संपूर्ण आसमंत
तुझ्या अस्तित्वाने
जयश्री

Monday, January 01, 2007

वाट तुझी पाहते

वाट तुझी पाहते
मनातल्या मनात मी
प्रीत तुझी पांघरते
कोवळ्या उन्हात मी

फ़ुलाफ़ुलात पेंगते
रात्र अजून कालची
स्वप्नातून थकलेली
गात्रं अजून कालची

दवात न्हाऊनी पहाट
गोड गोड लाजते
मनातली तुझी नशा
नसानसात उतरते

पाहतोस अंत का
आर्जवे करु किती
प्रसन्न ह्या सकाळची
वाट पाहणे किती

जयश्री