Wednesday, November 26, 2008

तू दिलेल्या वेदना

माझी ही गझल मायबोलीच्या प्रातिनिधीक गझल संग्रहासाठी निवडल्या गेलीये.   

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

उंब-याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या
आज पुरते दु:ख ही पदरात नाही

जयश्री 

Sunday, November 23, 2008

कधीच नाही

का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही

त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही

बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही

डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही

जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही

जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही

जयश्री

Tuesday, November 18, 2008

रितेपण

श्वासांचं गुदमरणं काही नवीन नाही आताशा
तू मनात नुसता डोकावलास जरी.. 
तरी एक मोठ्ठा आवंढा घशात...
आणि मनाची उलाघाल थेट डोळ्यांपर्यंत.
...
वर्तमानातल्या प्रत्येक गोष्टीला 
तुझ्याशी रिलेट करणं....
आपसूकच !!
पण तू कुठेच नसल्यामुळे आलेलं रितेपण...
असंच गुदमरतं....व्यक्तच होता येत नाही त्याला.
अधून मधून स्वप्नांचं खेळणं येतं मदतीला
खेळत बसते तास्‌ न्‌ तास
अगदी भान हरपून....
तुझ्याशीच असतो डाव मांडलेला
पण जिंकणार तूच...
मी मात्र तुझ्या विजयावर कायम खुश...
तुझ्या जिंकण्याचं मला नेहेमीच कौतुक वाटतं.
तुझ्यावर विजय मिळवावा असं कधी वाटलंच नाही मला
पण....
एकदा तरी मलाही जिंकू दे ना....
मी जिंकल्यावर कधी तरी टाळ्या वाजव...
अगदी मनापासून...
मलाही आवडेल रे ते....!!
...
राहिलं.... 
असू दे.
पण खेळ नको संपवूस रे...
मला खेळायचंय तुझ्यासोबत.
तुझ्या प्रत्येक विजयी खेळीचा भागीदार व्हायचंय
प्लीज... 
...
कंटाळलास का रे...
नाही त्रास देणार मी तुला...
नाही बोलावणार खेळायलाही
पण.... मला सांग..
तुला मी आठवेन ना रे....
खूप खूप दूर गेल्यावरही...
कधी तरी...
एकदा तरी...

जयश्री