Wednesday, March 17, 2010

हिरवा साज


रिमझिम बरसतो सखा साजण पाऊस
साज घेऊन हिरवा, येतो साजण पाऊस

तिची प्रतिक्षा ओलेती अन सखा ही आतूर
पानापानात शहारा, कणाकणात अंकूर

हिरवाईचे डोहाळे तिचे पुरवतो सखा
खुळावते राणी कशी साज लेऊन अनोखा

मिरविते नवा शालू भरजरी तो हिरवा
प्रेमसरीत भिजूनी चढे रंग गाली नवा

मेघ दाटती नभात तिचे बघण्या कौतुक
हलकेच उतरती, घेती चुंबन नाजुक

तीट लावियतो गाली, वारा हळूच वाकून
शेला फुलांचा रंगीत, धरा घेते पांघरुन

जयश्री





Saturday, March 13, 2010

..... पुन्हा पुन्हा !


दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
जिंकतो नि हारतो खेळतो पुन्हा पुन्हा

हर गुन्ह्यात मी तुला पाहतो पुन्हा पुन्हा
दाखल्यात बोलणे टाळतो पुन्हा पुन्हा

चांदणे कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा

आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा

माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा

हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा

हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा

जयश्री


Tuesday, March 09, 2010

भग्न किनारे


का उदास वाटते
नयनी पाणी दाटते
असून घोळक्यातही
एकलेच वाटते

बोलणे नको नको
मौन सुखद वाटते
विचारही मनी नको
रितेच मुक्त वाटते

शांत सागरातही
भोवरे नवे नवे
वादळे जुनी परी
भग्न किनारे नवे

उजाड माळरान हे
गंध, गारवा नको
श्रावणातही घना
बरसणे तुझे नको

जयश्री