Saturday, December 30, 2006

गारवा

आभाळ भरुन आलं ना......की तुझी आठवण अनावर होते रे! अगदी त्याच क्षणी तू हवा असतोस ! गच्च भरुन आलेलं आभाळ, तो खट्याळ वारा, भुरभुरता पाऊस...... सगळे एकच मागणं मागत असतात..... तू हवा...तू हवा.........

गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा

नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा

झुळूक मंद हासली
प्रीत मनी बहरली
मुग्ध मिठी पांघरण्या
तू हवा, तू हवा

वारा बघ जुल्मी हा
छेडितो पुन्हा पुन्हा
स्वैर बटा आवरण्या
तू हवा, तू हवा

भुरभुरत्या पावसात
भिजले मी नखशिखान्त
पदर जरा सावरण्या
तू हवा, तू हवा

जयश्री

ह्या माझ्या कवितेचं विवेक काजरेकरांनी खूपच मस्त रोमँटिक गाणं बनवलंय. "स्पर्श चांदण्यांचे" या अल्बममधे पद्मजा फ़ेणाणींनी ते गायलंय देखील सुरेख!

Friday, December 29, 2006

ऐश्वर्या

सगळी सुखं हात जोडून उभी आहेत..... ख-या अर्थानं मी आज ऐश्वर्या आहे......... फ़क्त तुझ्यामुळे !

सोपान चढता हे सुखाचे
आकाश मजला ठेंगणे
होताच तूची सोबतीला
नाही काही मज उणे

कुबेराचे गवसले धन
साथीने सखया तुझ्या
अमृताचा चषक ओठी
आज बघ रे माझिया

वादळी या यशपथावर
दीपस्तंभ होतास तू
अडखळे पाऊल जेव्हा
सावराया होतास तू

झोळी माझी तोकडी रे
सुमने सुखाची वेचण्या
चिंब झाले सुखसरींनी
आभाळ तू ये पेलण्या

जयश्री

Tuesday, December 26, 2006

मोगरा माझा

नजरेत मिसळली नजर राजसा जेव्हा
तो क्षणही थांबला होता
शब्दाविण तू बोललास तेव्हा
पाऊस थांबला होता

घनव्याकुळ डॊळ्यांमधला
मी प्रश्न पाहिला होता
रुकार तेव्हा नकळत माझ्या
कसा उमटला होता

तुझा वितळता कानी माझ्या
सूर वाजला होता
रजनीच्या अन्‌ कुशीत तेव्हा
मोगरा बहरला होता

तोच मोगरा दारी माझ्या
कसा कोमेजला होता
आवेग तुझ्या उबदार मिठीचा
आज ओसरला होता

माळियाने कसा अपुला
वृक्ष दुर्लक्षिला होता
नजरेत या रे आसवांचा
पूर दाटला होता

आसवांचे अर्घ्य पिऊनी
मोगरा फ़ुलणार होता
जागवाया गंध त्याचा
तू पुन्हा येणार होता

जयश्री

Saturday, December 23, 2006

प्रिया

ही माझ्या प्रियाच्या मनातली प्रिया :)

नकळत उमले हसू ओठावर
मनी तिचा तो अल्लड वावर
आठवणींची भरली ओंजळ
अंतरातूनी पसरे दरवळ

रंग केतकी जिवणी नाजूक
गालांवरचे गुलाब मोहक
महिरप कुरळ्या केसांची अन्‌
भाळावरची बट ती कामुक

भाव मनीचे नेत्र सांगती
शब्दाविण ते बोलून जाती
तार दिलाची छेडून जाती
संमोहन ते पसरुन जाती

सौंदर्यखणी ती मदनमंजिरी
वेडा लाविते नजर लाजरी
उत्कट खुलणे, प्रीत बावरी
प्रिया माझी ही गोड गोजिरी

जयश्री

माझिया मना

सांग ना वेड्या मना
काय तुजला जाहले
आज तू मौनात का हे
गूढ आता कर खुले

कोवळी किरणे रवीची
उजळती दाही दिशा
न्हाऊनी तेजात त्याच्या
तू असा विझलास का

दाटूनी हे मेघ आले
खुलविण्या तुज अंतरी
सोबती असती तयाच्या
पावसाच्या बघ सरी

गगनी नितळाई तरीही
हृदयी हा झाकोळ का
आसमंती तृप्ती तरीही
तू असा मिटलास का

कसली हुरहुर ही तुला
का नेत्र असूनी आंधळा
पायी असूनी सुखनुपूर
आज का तू पांगळा

जयश्री

Tuesday, December 19, 2006

साठवण

तुझ्या माझ्यातले सारे सारे सोनेरी क्षण मी मनापासून जपलेत. कधीतरी एकांतात उघडते ती कुपी आणि न्हाऊन निघते त्या आठवणींच्या पावसात....

कुठे साठवू
कसे साठवू
ते अमृत क्षण....
तुझ्या माझ्या प्रीतीचे
नकळत फ़ुललेले
अनावर ओढीचे
बहरलेले मोहरलेले.
हातात गुंफ़लेले हात
गुलाबी चांदरात
कुजबुज कानात
धुंद श्वासात
धडधड उरात
आतूर एकांत
फ़ुललेला वसंत
चांदणे विखुरलेले
चेहे-यावर पसरलेले
चंद्र थांबलेला
खिडकीतून डोकावलेला
अन्‌ खट्याळ हसलेला
रात्र चांदण्यात भिजलेली
कुशीत तुझ्या निजलेली
अशा राती आठवणीतल्या
कशा सावरु मनातल्या
एकमेकात मिसळलेल्या
स्पर्शाने उजळलेल्या

जयश्री

Sunday, December 17, 2006

मळभ

काही सुचतच नाहीये आज
काय होतंय काही कळतच नाहीये आज
सगळ्यांमधे असूनही वाटतंय एकटं का
सारं जवळ असूनही ही हुरहुर का
काहीतरी तुटतंय हा भास का
हातून काहीतरी निसटतंय हा आभास का
कशात रमवावं मन हे खुळं
मनाचं वागणं का नेहेमीपेक्षा निराळं
कशामुळे आलंय हे मळभ आकाशात
त्याचीच तर सावली नव्हे ना अंतरात
सारंच भासतंय करुण अन्‌ उदास
हट्टी जीवाची ही कसली मिजास
पुरे झाला आता हा खुळचट खेळ
वेडावतेय तुला ही रम्य सांजवेळ
देवापुढची समई शांत, प्रसन्न हसतेय
अजूनही निराशा ही मग का घर करतेय
बघ त्या ज्योतीकडे डोळे एकदा भरुन
हृदयातला अंध:कार कधीच गेलाय पळून
आता स्वच्छ, नितळ मनाच्या गाभा-यात
होऊ दे एका नव्या दिवसाची सुरवात

जयश्री

वसंतपालवी

कधी कधी आपलं सुख हे दुस-यांना सुखी बघून पण मानायचं असतं. असाच एका वसंताला वाट आहे ती तिच्या बहराची..... आणि त्याच्या पालवीला वृक्ष होण्याची.

वसंतपालवी

Tuesday, December 12, 2006

वर्तुळाचा कोन

जीवन एक कोडं, न सुटलेलं
एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं
आयुष्य सरतं याच धडपडीत
असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधीत
वाट तीच, आखून दिलेली
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फ़िरायचं
वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं.
मानायची खुषी त्याच परिघात
कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात.
मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं
आणि मूळही छाटून चक्क बोनसाय बनायचं,
मिरवायचं दिवाणखान्यात एक शोपीस बनून.
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं,
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश,
स्वत:साठी, इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.

जयश्री