Monday, September 22, 2008

जरा जरा तू तसा

असा रे कसा तू....... माझ्या अगदीच वेगळा !! कदाचित म्हणूनच तू मला आवडतोस :) पण मला कोडं मात्र नेहमीच पडतं......

जरा जरा तू तसा,
जरा जरा मी अशी
रंग वेगळे जरी
प्रीत ही अशी कशी

शब्द ना तुझ्याकडे
मौनखेळ हा तुझा
नेत्र फ़क्त बोलती
मूकभावना तुझ्या
माझेच मुक्त बोलणे
अवखळ सरीता जशी
बोलक्या मौनातली
प्रीत ही अशी कशी

शर्वरी उन्मुक्त मी
चंद्र तूच लाजरा
रम्य एकांती का
लांब तू जरा जरा
तारका खट्याळ मी
मोहवू तुला कशी
चंद्र तारकातली
ओढ ही अशी कशी

दाटले आभाळ तू
अवनी आतूर मी
धुंद बरसणे तुझे
तृप्त मी, पूर्ण मी
प्रीत आगळी तुझी
रीत ही अशी कशी
मात मीच देऊनी
तुझीच जीत रे कशी

जयश्री अंबासकर