Friday, June 18, 2021

हल्ली

जिंकण्याने सतत मी बेजार हल्ली
वाटते घ्यावी जरा माघार हल्ली

थांबले दिसते तुझे लढणेच आता
हारण्याचा थेट की स्वीकार हल्ली ?

संपली नाही लढाई जीवनाची
केवढे बोथट तुझे हत्यार हल्ली

शांतता आहे खरी की भास आहे
होत नाही कोणताही वार हल्ली

लागते रात्री सुखाची झोप आता
ना लढाई, ना चढाई फार हल्ली

मेळ झाला थांबला संहार हल्ली
जीवनाला देखणा आकार हल्ली

जयश्री अंबासकर

No comments: