Friday, June 30, 2023

पण तो आता परका होता

प्रसंग मोठा बाका होता
मारेकरीच काका होता

कळले आधी म्हणुन थांबला
वळणावरती धोका होता

पावसातली भेट अचानक
पण तो आता परका होता

त्याच्यासाठी काळजातला
चुकला माझा ठोका होता

जखम लागली पुन्हा भळभळू
एक उसवला टाका होता

जवळपास मी सदा रहावे
एकच त्याचा हेका होता

आनंदी आहेस ना अता?
प्रश्नच त्याचा तिरका होता

आयुष्याच्या संध्याकाळी
परिसर ओकाबोका होता

✍️जयश्री अंबासकर

Saturday, June 24, 2023

पंख पसरल्यानंतर

आकाशाची उंची कळते झेप घेतल्यानंतर 
पंखांमधली शक्ती कळते पंख पसरल्यानंतर 

रंगामधल्या साधर्म्याचा वाद काय कामाचा
काक-पिकातिल फरक समजतो वसंत फुलल्यानंतर 

रोख हवेचा बघून ठरते मित्र-शत्रुता आता 
संत्र्याचाही होतो मंत्री पक्ष बदलल्यानंतर 

'मृत्यू देखिल सुंदर असतो', कीर्तनात ऐकवतो
उडते त्याची गाळण मृत्यू थेट भेटल्यानंतर 

सोशिकता, माया अन् संयम कैसे एका ठायी 
समजेलच पुरुषाला स्त्रीचा जन्म घेतल्यानंतर 

जयश्री अंबासकर