Saturday, December 26, 2020

आता असे करूया

तरही गझल 
(मिसरा - सुरेश भट)

(नाही म्हणावयाला आता असे करूया)
जे आजवर उधळले  ते आज सावरूया

आहे बरेच काही हातात या घडीला
विनियोग या घडीचा थोडातरी करूया

आनंदकण जरासे शिंपूनिया बघूया
दुःखात जे तयांच्या झोळीत सुख भरूया

हातातुनी निसटले आयुष्य वाळुपरि ज्या
हातात त्या सुखाची ओंजळ नवी धरूया

घालून मुखवटा तो सर्रास जे मिरवती
त्यांच्या समोर आता चल आरसा धरूया

तो चंद्र, चांदणे अन् त्या तारका नकोशा
पोटात आग आहे  चल भाकरी स्मरूया

पाऊल अडखळोनी पडलो जिथे जिथे मी
ती वाट सोबतीने चल एकदा धरूया

तो एकदाच आला क्षण धुंद मीलनाचा
बाकी नकोच काही क्षण फक्त तो स्मरूया

ओसाड माळरानी एकांत आंथरूया
अन् चांदणे गुलाबी खुश्शाल पांघरूया

✍जयश्री अंबासकर

Friday, December 25, 2020

कहां हो तुम

Another Project with Talented Singer, Composer Nikhil Iyer !!

My Poetry with Background Score by Nikhil Iyer !!

If you like it ...Please Share n Subscribe!!







Friday, December 18, 2020

वृत्त - उध्दव

वृत्त - उध्दव 
मात्रा २+८+४ 

तोडून शृंखला बोजड
मी मुक्त मोकळी झाले
हा समाज आता म्हणतो 
बेछूट स्वैर मी झाले

हे मनाप्रमाणे जगणे
नाहीच कुणाला रुचले
मग विशेषणांची यादी
घेऊनच मी वावरले

मी पर्वा नाही केली
जग अधिक विखारी झाले
वाळीत टाकल्यावरती 
ते शांत जरासे झाले

या परंपरेच्या बेड्या
का तिच्याच पायांसाठी
निर्बंध अघोरी सगळे
का पुरुषी सत्तेसाठी

बेटावर माझ्या आता
मी श्वास मोकळा घेते
अन पंख पसरुनी माझे
मी गगनभरारी घेते

✍जयश्री अंबासकर

Wednesday, December 16, 2020

वृत्त - मध्यरजनी

वृत्त  - मध्यरजनी
लगावली - गालगागा x ४

साद घालुन अंबराला सोनपिवळी सांज गेली 
चंद्रआतुर आसमंता जाग आली रात्र झाली

नादमधुरा पावलांची मस्त मोहक देहबोली
तारकांच्या पैंजणांनी चंद्रवर्खी रात्र झाली

चंद्र संमोहन जगावर रातराणी झिंगलेली
शबनमी ह्या चांदव्याने चिंब ओली रात्र झाली

चाहुलीने भास्कराच्या भैरवीची वेळ झाली
चांदव्याच्या मैफिलीची सांगतेची वेळ झाली

जयश्री अंबासकर
#गोदातीर्थ_उपक्रम

Sunday, December 13, 2020

वृत्त - भुजंगप्रयात

लगावली  - 
लगागा लगागा लगागा लगागा

मनाची किती हाव होते न तृप्ती
मिळाले कितीही तरी ओढ चित्ती

नकोसे मनाला जिणे साधकाचे
सदा सर्वदा फक्त उपभोग वृत्ती

मनाचा पसारा असा आवरावा
न आसक्त व्हावे न यावी विरक्ती

मनाला कळावा मनाचा इशारा
कशाला कुणाचा पहारा नि सक्ती

उधळतील चौखूर वारू मनाचे 
मना शिस्त द्यावी नको स्वैर मुक्ती

✍जयश्री अंबासकर

Tuesday, December 08, 2020

वृत्त - केशवकरणी

एक जोशपूर्ण वृत्त - केशवकरणी 
चरणसंख्या - २ 
पहिल्या चरणात मात्रा - २७
दुसऱ्या चरणात मात्रा - १६
(चाल - खबरदार जर टाच मारुनि जाल पुढे चिंधड्या ।
उडविन राइ राइ एवढ्या ।) 

मशाल हाती कर्तृत्वाची जरी अंतरी व्यथा ।
घडविते मर्दुमकीच्या कथा ।

प्राक्तन आहे भोगत राहिन विचार होता खुळा ।
किती ती सोसत होती झळा ।

अफाट आहे सहनशक्ति दुबळी ती नाही मुळी ।
तरीही तिचाच नाहक बळी ।

समाज पुरुषी आणि ती तर आहे केवळ मादी ।
म्हणती वंशाची बरबादी ।

चूल मूल यातच अडकवुनी वरती करडी नजर ।
डोइवर तिनेच घ्यावा पदर ।

किती युगांचे तिचे सोसणे कष्टत अष्टौप्रहर ।
जग बघे तिचे नव स्थित्यंतर।

✍जयश्री अंबासकर 
७ डिसेंबर २०२०

Saturday, December 05, 2020

वृत्त - हरिभगिनी

हरिभगिनी मात्रावृत्त 
(८+८+८+६)

किती चाललो सोबत आपण आज दुरावा भासे का
तीच वाट अन तेच चालणे मणभर पायी ओझे का

किती ठरवले अता पुरे हे सोशिक जगणे मनोमनी
थकल्या नात्यामधे अजुनही क्षीण उसासे तग धरुनी

मोह कशाला पडतो अजुनी रुक्ष बेगडी नात्याचा
कंठशोष का जगापुढे मग असतो कायम मुक्तीचा

नाते तोडुन सुटका झाली तरी अंतरी झुरणे का
स्वातंत्र्याचे कौतुक सोडुन बंधनात मी अडकुन का

दुःख वेदना ज्याने दिधल्या जीवन केले कष्टमयी 
बंध तोडता नात्याचे का दाटुन याव्या सर्व सयी

विरल्या नात्यामधे सुखाचा  दिसतो धागा ओझरता
ऊब पुरेशी धाग्याची त्या नाते फिरुनी पांघरता 

तकलादू जे वाटत होते नाते होते शिणलेले 
जीर्ण जरी ते झाले असले नाते अजुनी तगलेले

✍जयश्री अंबासकर

#गोदातीर्थ_उपक्रम

Tuesday, December 01, 2020

वृत्त - हिरण्यकेशी

वृत्त : हिरण्यकेशी
लगावली - 
लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा 
(मात्रा:३२)

सुखा मिळविण्या किती पळापळ 
उगाच म्हणती सुखास मृगजळ
इथे तिथे सुख विखूरलेले 
जमवत जा तू भरेल ओंजळ

सुखास जर तू बसशिल शोधत
विसरुन जाशिल जगावयाला
तुझ्याचपाशी तुझेच सुख रे
अप्राप्य ना सुख कळेल तुजला

निसर्ग देतो अनंत हस्ते
उचलुन घे तू तुला हवे ते
सुखात सामिल जगास कर तू
नभात साऱ्या फिरेल सुख ते

तुझ्याचपुरते नको जगू तू
विशाल अंबर कवेत घे तू
सवंगडी जग बनेल जेव्हा
सरी सुखाच्या अनुभवशिल तू

जरा हवे दुःखही चवीला 
नकोच रे फक्त सुख जगाया
झकास लज्जत नव्या चवीची
तुलाच लागेल आवडाया

✍जयश्री अंबासकर 
३० नोव्हेंबर २०२०

Monday, November 23, 2020

वृत्त - सौदामिनी

वृत्त  - सौदामिनी
लगागा लगागा लगागा लगा 

तिने मुक्त व्हावे, जगावे पुन्हा
करारी वगैरे दिसावे पुन्हा

नव्या पिंजर्‍याची पुरे कौतुके
किती बंदिवासात रावे पुन्हा

पुन्हा कृष्णबाधाच व्हावी मना
जिणे मोरपंखी मिळावे पुन्हा

अपेक्षाच दुःखास कारण तुझ्या
कितीदा तुला समजवावे पुन्हा

तिचे हासणे आज दुबळे पुन्हा
तिच्या सोसण्याचे पुरावे पुन्हा

शरीरावरी यातनांच्या खुणा
खुलासे जगा काय द्यावे पुन्हा

अकस्मात येणे सुखाचे नको
जुने दुःख खुश्शाल यावे पुन्हा

जयश्री अंबासकर

Monday, November 09, 2020

वृत्त - इंद्रवज्रा

गागालगागा ललगालगागा

ह्रदयात त्याचा शिरकाव आता
श्वासात वावर हळुवार आता

मज्जाव नाही कसलाच आता 
बेखौफ झाले मन द्वाड आता

धरबंध नाही उरला मनाला
अन मागण्याही भलत्याच आता

मधुभास देतो सहवास त्याचा
आयुष्य सारे मदहोश आता

आवेग आहे जगण्यात आता
आयुष्य पळते भरधाव आता

उत्सव मनाचा मनसोक्त आता
जगणेच अवघे मधुचंद्र आता

तावुन सलाखुन मुरले पुरेसे
नाते म्हणावे परिपूर्ण आता

✍जयश्री अंबासकर

Tuesday, November 03, 2020

भिन्न किती

तू गेल्यावर खिन्न किती
जग हे झाले भिन्न किती 

कोलाहल ह्रदयात अता
जगणे मरणासन्न किती

स्वप्न मनी जे रंगवले
झाले छिन्न विछिन्न किती

विस्कटल्या देहात उरे
वैरागी मन सुन्न किती

तृप्तीने जगलास सख्या 
मुक्ती शांत प्रसन्न किती 

जन्म मरण हे अटळ जरी
जीवन रंग विभिन्न किती

✍जयश्री अंबासकर

Monday, October 26, 2020

वृत्त - कलिंदनंदिनी

वृत्त - कलिंदनंदिनी
लगालगा लगालगा 
लगालगा लगालगा

फिरून भेट जाहली
उभी पुन्हा समोर ती
तसाच लुब्ध मी तिथे
अधीर स्पंदने किती

तशीच मिश्किली तिची 
खट्याळ तेच हासणे 
तिलाच शोभते असे
जहाल थेट बोलणे

तशीच ती झऱ्यापरी 
खळाळती अजूनही
तशीच ती विजेपरी 
सळाळती अजूनही

कट्यार वार दृष्टिचा
तसाच तीक्ष्ण भासतो
क्षणात वेध घेऊनी
उरात घाव कोरतो

तशीच बेफिकीर ती
तशीच मुक्त आजही
वसंत पाहतो तिचा
दुरून फक्त आजही

जयश्री अंबासकर

Saturday, October 24, 2020

वृत्त - चंपकमाला

वृत्त – चंपकमाला 
गालल गागा | गालल गागा

मर्द गड्याची हिंमत जेव्हा
या जगण्याला किंमत तेव्हा

सावज होते गाफिल जेव्हा
पारध त्याची निष्ठुर तेव्हा

सोबत पैसा पुष्कळ जेव्हा
मित्र सभोती केवळ तेव्हा 

दु:खद होतो शेवट जेव्हा
काळिज होते व्याकुळ तेव्हा

विकृत होते हे जग जेव्हा
भीषण होते शोषण तेव्हा

पातक होते हातुन जेव्हा
शासन व्हावे तत्पर तेव्हा

जयश्री अंबासकर

Monday, October 19, 2020

चांदणे

इश्कात झुरते चांदणे
घायाळ करते चांदणे

जागून सरते यामिनी
देहात भिनते चांदणे

येतेच परतुन पौर्णिमा
बेभान करते चांदणे

चंद्रास गगनी भेटण्या
आतूर असते चांदणे

सळसळत असता ती इथे
दरवळत असते चांदणे

एकांत विरही भासते
व्याकूळ करते चांदणे

प्रेमात भिजल्या हर मना
आजन्म पुरते चांदणे

अन्‌ रात्र सरताना नभी
विरघळत असते चांदणे

जयश्री अंबासकर

Thursday, October 15, 2020

प्रेमात तुझ्या

तुझ्या आठवांनी श्वासात भिनतो
तुझा गंध ओला नव्याने पुन्हा
प्रेमात पडतो नव्याने तुझ्या मी
गुन्हा तोच घडतो नव्याने पुन्हा

निराळीच असते तुझी भेट प्रत्येक
ऋतूंचे तुझ्या हे किती सोहळे
कसे साठवावे तुला अंतरी मी
तुझे रंग फुलती किती वेगळे

तुला ऐकताना हरखून जातो
तुझे लाघवी बोल छळती मला
म्हणतेस नाही भेटीस जेव्हा
तुझा शब्द खंजीर भासे मला

का मीच व्हावे आतूर इतके   
अप्राप्य असतेस तू कैकदा
झुरावे कधी तू माझ्याविनाही
उतावीळ व्हावे कधी एकदा

✍जयश्री अंबासकर

Tuesday, October 13, 2020

यापुढे

आसवांचे अर्घ्य मी देणार नाही यापुढे
वेदनांचा व्यर्थ हा बाजार नाही यापुढे

सतत जिंकावे असा नाहीच मजला सोस हा
जिंकले नाही तरी हरणार नाही यापुढे

भावनांशी खेळणे हे आजवर झाले किती
सांत्वनाचा नाटकी व्यापार नाही यापुढे

स्वाभिमाना अडगळीतच डांबणे झाले पुरे
ही अशी तडजोड मी करणार नाही यापुढे

मी स्वयंभू या जगा करणार आहे यापुढे
बापुडे लाचार जग दिसणार नाही यापुढे

जयश्री अंबासकर
२६ सप्टेंबर २०२०                            

Wednesday, October 07, 2020

पापणकाठी आसवदाटी

एकाच शब्दसमूहाला दोन वेगवेगळ्या बंधात दाखवण्याचा प्रयत्न !!
एक कविता आणि दुसरी गझल

पापणकाठी आसवदाटी

दुर्मिळ आता गाठीभेटी
सक्त दुरावा भीतीपोटी
बंधन मोठे छोट्या भेटी
पापणकाठी आसवदाटी

फक्त अता आभासी भेटी
आठवणीतच कर संतुष्टी
संपत आली आशा खोटी
पापणकाठी आसवदाटी

माणुस आता फक्त सोंगटी
भयभित चित्ती कोटी कोटी
नाव अता रे तुझेच ओठी
तारक आता तू जगजेठी

गझल

दुर्मिळ आता गाठीभेटी
पापणकाठी आसवदाटी

सक्त दुरावा भीतीपोटी
पापणकाठी आसवदाटी

बंधन मोठे छोट्या भेटी
पापणकाठी आसवदाटी

आठवणीतच कर संतुष्टी
पापणकाठी आसवदाटी

फक्त अता आभासी भेटी
पापणकाठी आसवदाटी

संपत आली आशा खोटी
पापणकाठी आसवदाटी

भयभित चित्ती कोटी कोटी
पापणकाठी आसवदाटी

माणुस फक्त पटावर गोटी
पापणकाठी आसवदाटी

तारक आता तू जगजेठी
पापणकाठी आसवदाटी

जयश्री अंबासकर
८ ऑक्टोबर २०२०

Tuesday, October 06, 2020

वृत्त - मंजुघोषा

वृत्तमंजुघोषा
गालगागा गालगागा गालगागा

सांगता होते दिसाची सांज येता
सांजही जाते लयाला रात्र येता
चक्र हे चाले निरंतर जीवनाचे
उगवतो कोणी कुणाचा अस्त होता

खेळ हा चालूच असतो जीवनाचा
एक जातो एक येतो वेळ येता
थांबते आयुष्य ना रेंगाळतेही
वेग मंदावतहि नाही दु: होता

अटळ आहे खेळ हा जर माणसाला
खेळताना का करावी व्यर्थ चिंता
सोपवू कोणा सुकाणू प्रश्न नसतो
तोच सांभाळी सुकाणू तोल जाता

जयश्री अंबासकर
ऑक्टोबर २०२०

 

 

Friday, October 02, 2020

मुक्तीचा आभास किती

आयुष्याच्या खेळपटावर दु:खाचे आक्रोश किती
दान सुखाला थोडे आणिक दु:खाला ते अधिक किती

आवरताना मोह पसारा, उमगत जातो योग जरा
उपभोगातील जिणे वाटते, आता सारे फोल किती

काळापुढती चालत नाही, काही काही कोणाचे
भाग्यावरही पाश तयाचा, सत्ता ही निष्ठूर किती

आसक्तीचा देह मिळाला, आहे आम्हा सगळ्यांना
अडकत असतो मोहातच पण, मुक्तीचा आभास किती

ऐहिक सुख अन्ऐहिक इच्छा, गाठोडे भरते सगळे
भोगाने आयुष्यच सरते, योगाला उरतेच किती

जयश्री अंबासकर

 

Thursday, September 24, 2020

तू असताना...

मी पाचोळा तू नसताना
मी हिंदोळा तू असताना

पोक्त विचारी तू नसताना
मी वय सोळा तू असताना

दु:खद वास्तव तू नसताना
स्वप्ने डोळा तू असताना

एकाकी मी तू नसताना
गर्दी गोळा तू असताना

डोळस वावर तू नसताना
कानाडोळा तू असताना

सावध चौकस तू नसताना
गाफिल भोळा तू असताना

जयश्री अंबासकर
२४ सप्टेंबर २०२०

Saturday, September 19, 2020

वृत्त मालिनी - सोहळे यामिनीचे

 #गझलेतर वृत्तबद्ध कविता

वृत्त_मालिनी
लललल लल गागा | गालगा गालगागा

झुळ झुळ झुळ होता वाहता गार वारा
सुखद उठत होता गारव्याने शहारा
विहरत ढग होते  धुंद दाही दिशाही
 नटुन थटुन येण्या यामिनी वाट पाही

दिवस सरत जाता जाग येते नभाला
विहग परत जाती आपुल्या कोटराला
हळुच मधुर  जाते साद ती चांदण्याला
अधिर अधिर होते रात्र जागावयाला

टिपुर टिपुर होते रात्र कोजागिरीची
उधळण अति होते अंबरी चांदण्यांची
धवल रुप जपावे अंतरी या शशीचे
फिरुन अनुभवावे सोहळे यामिनीचे

जयश्री अंबासकर
१९ सप्टेंबर २०२०

Sunday, September 13, 2020

निर्मळ जगणे जमेल ना

जगलो कायम ऋणात मी, ऋण हे माझे फिटेल ना
आनंदाने कधी तरी, उपभोगाया मिळेल ना

धावत आलो किती पुढे, कोणी उरले सवे अता
मागे फिरता पुन्हा मला, साथी कोणी दिसेल ना

सोडून गेली कशी मला, शोधू आई कुठे तुला
जगणे दुष्कर तिच्या विना, आई फिरुनि दिसेल ना

दु:खी व्हावे किती मना, दु: बघावे किती पुन्हा
पुनरावृत्ती नको नको, शेवट सुखकर असेल ना

आयुष्या रे गणित तुझे, सोडवणे मज जमेल ना
तुकडे सगळे जुळुनि तुझे, कोडे पुरते सुटेल ना

देवा सुंदर तुझ्या परी, मजला हे जग दिसेल ना
झुळझुळ पाण्या परी मला, निर्मळ जगणे जमेल ना

जयश्री अंबासकर

Friday, September 11, 2020

मध्यान्ही तप्त प्रहरी

एक गंमत... "मध्यान्ही तप्त प्रहरी" ही एकच ओळ कडव्याच्या वेगवेगळ्या ओळीत लिहून केलेली कविता !!

मध्यान्ही तप्त प्रहरी
ओसाड पार सारे
बाहेर नाही कोणी
बंदिस्त आत सारे

सुनसान हे मोहल्ले
मध्यान्ही तप्त प्रहरी
कामास कोणत्याही
येईल कोण दारी

दिसतो कुणी बिचारा
पसरूनिया पथारी
मध्यान्ही तप्त प्रहरी
खाऊनिया शिदोरी

उष्म्यास या अघोरी
कंटाळतात सारी
किती काहिली जीवाची
मध्यान्ही तप्त प्रहरी

घामात चिंब सारे
मध्यान्ही तप्त प्रहरी
तलखी कशी शमावी
मध्यान्ही तप्त प्रहरी

मध्यान्ही तप्त प्रहरी
वाराही खूप शिणतो
मध्यान्ही तप्त प्रहरी
वारा मुकाट असतो

मध्यान्ही तप्त प्रहरी
धग सोसतात सारी
मनमानी सूर्य करतो
मध्यान्ही तप्त प्रहरी

जयश्री अंबासकर
११..२०२०


Wednesday, September 09, 2020

भग्नता

ऐलतटावर भग्न उभा मी, पैलतटी तू तृप्त किती
विरहाने उध्वस्त किती मी, मुक्तीने तू शांत किती

ओलावा जगण्याचा गेला, जगणे झाले शुष्क किती
आठवणींच्या पागोळ्यांतुन, जमवत आणू ओल किती

माहित असते श्वास मला जर, उरले या देहात किती
संपवुनी मी आलो असतो, सोपी होती भेट किती

माझे मीच मला सावरतो, बसुनि उसासत राहु किती
थांबुन एका जागी केवळदु: उगाळू तेच किती

दु:खाने या दग्ध जरी मी, आयुष्याला वेग किती
थांबायाला नाही फुरसत, जगण्याचा आवेग किती

जयश्री अंबासकर
०९.०९.२०२०