Sunday, November 19, 2006

मुखवटे आणि चेहरे

किती मुखवटे, किती चेहरे
किती खोटे, किती खरे
प्रयत्न केला शोधायचा जर
भीषण सत्य येईल समोर
त्या सत्याला सामोरं कधी जाता येईल का?

रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून तारीफ़ करणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?

कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?

कशाला हवेत हे जमाखर्च....
कशाला हवेत हे तर्ककुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?

नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?

जयश्री

Wednesday, November 15, 2006

तुझे श्वास

श्वास तुझे ते मला दिलेले
संपत आले रे
कासावीस हा जीव होतसे
त्याविण माझा रे

श्वासांच्या त्या हिंदोळ्यांवर
झुलते मी ही तुझ्यासवे
स्पंदनात त्या अनुभवते मी
तुझ्या छबीचे रंग नवे

हळुवार त्या निश्वासांच्या
गोड गुलाबी स्पर्शाने
लाली चढते गो-या गाली
नकळत कशी ही लज्जेने

उमले ओठी हास्य चोरटे
आठवून त्या गुजगोष्टी
काटा फुलतो अंगावरती
तुझीच स्मरुनी गोड मिठी

रिती जाहले आहे पुरती
विना तुझ्या त्या श्वासांनी
दे ना आता श्वास नवे ते
घेऊनी मजसी तव कवनी

जयश्री

Tuesday, November 14, 2006

बंधन

नात्यांचं बंधन कधी कधी जाचक होत असलं तरी त्या बंधनातली तृप्ती पण फ़ार फ़ार सुख देते. इतकी वर्ष सोबत राहिल्यानंतर, एकमेकांच्या गुणदोषांना स्वीकारुन वाटचाल करताना....... कितीतरी सुखद क्षण वाटेत आले. सोबत दु:खाचे काटे सुद्धा होते म्हणा. पण तुझ्या सुरक्षित सोबतीनं सगळा मार्गच सोप्पा केलाय. तुझी आश्वासक साथ कुठल्याच अनिश्चिततेला थारा देत नाही. अशीच देशील ना रे तुझी साथ मला........जीवनाच्या प्रत्येक वळणावर.......!

तुझ्या बंधनात रे
आज खूप तृप्त मी
पिंज-यात प्रीतीच्या
कैद असून मुक्त मी

शिडकावा प्रेमाचा
सतत शिंपतोस तू
ग्रीष्माच्या वणव्यातही
फुलवतोस बाग तू

विहरते तुझ्यासवे
जसे फुलपाखरु
वर्षा ही प्रेमाची
नको कधीच आवरु

दिलेस फ़क्त सुख तू
दु:ख मात्र लपविले
प्रीतीच्या पंखांनी
मजला गोंजारीले

असेच चिंब भिजवूनी
ठेवशील ना मला
सावरुन घेशील ना
या तुझ्या वेड्या फुला

जयश्री

Monday, November 13, 2006

प्रेमसमर

पाहू नकोस ना रे
मजसी असा गडे तू
मी विरघळून जाते
समजून घे जरा तू

आमंत्रणे तुझी ती
नजरेतूनीच येती
नि:शब्द आर्जवे ती
डोळेच व्यक्त करीती

करी पाठलाग माझा
मिश्कील भाव त्याचे
हळुवार सोडती ते
शर प्रेमबंधनाचे

लटका विरोध आता
किती वेळ भासवू मी
ओढाळ ह्या मनाला
किती वेळ थांबवू मी

तू जिंकलास जानू
हरले तुझी प्रिया मी
समरात ह्या मनाच्या
हरुनीही जिंकले मी

जयश्री

Sunday, November 12, 2006

तुझ्याविना

का रे इतकी बंधनं हवीत ह्या जगाची? कां मनाला हवं तसं जगता येऊ नये? नाही रे जगता येत तुझ्याशिवाय!!

माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य

जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव

कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड

उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज

धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन.

जयश्री

Thursday, November 09, 2006

वळवाचा पाऊस

अचानक आभाळ भरुन येतं
चोहोबाजूंनी कोसळू लागतं
तळाशी दडलेल्या आठवणी तरल होतात
कासावीस होऊन उचंबळून येतात

उधाणलेला समुद्र
बेछूट पिसाळलेला वारा
उठवतो मोहोळ आठवणींचे
पसरुन सैरावैरा

विचारांचं काहूर
घालतं मनात थैमान
कुरतडून टाकतं काळीज
होऊन दुष्ट सैतान

काहीतरी करायचं राहून गेलेलं
खूपसं उपभोगायचं विसरुन गेलेलं
हातातून वेळ निसटून गेलेली
अपुरेपणाची जाणीव देऊन गेलेली

आभाळ निरभ्र झाल्यावर
स्व्च्छ प्रकाशाची कवाडं उघडल्यावर
आरंभ होईल नव्या दिवसाचा
तृप्तीचं तेज ल्यालेल्या एका नव्या आयुष्याचा

जयश्री

Tuesday, November 07, 2006

तू अन्‌ मी

आतूरलेला तू
अ‍न्‌ बहरलेली मी

आसूसलेला तू
बावरलेली मी

कासावीस तू
हरवलेली मी

नादान तू
अजाण मी....

प्रश्नार्थक मी
आश्वासक तू

स्वप्नील मी
हळुवार तू

बेहोष मी
मदहोश तू

स्वानंद मी
बेधुंद तू

हिंदोळा मी
आंदोलन तू

संमोहित मी
संमोहन तू........

अनुनय तू
अनुराग मी

अवाहन तू
अनुमोदित मी

माझाच तू
अन्‌ तुझीच मी

जयश्री