Thursday, April 23, 2009

मन हळूच गाली हसले


अचानक इतका छान, गोड वारा सुटला ना.....  मनात खट्याळ  हसू उमटलं.... आणि मग...........

हा सुटला अल्लड वारा
मन पाकोळीगत झाले
रोमांचित काया सारी
मन हळूच गाली हसले

हे रंग मनाचे सारे
आकाशी कसे उमटले
जाणून गुपित ते गहिरे
मन हळूच गाली हसले

चाहुल खट्‍याळ कुणाची
मन अधिर अधिर का झाले
पाहून कपोली लाली 
मन हळूच गाली हसले

आतूर मनाला सावर
कानात कोण कुजबुजले
नजरेची बघुनी भिरभिर
मन हळूच गाली हसले

लाजून चिंब भिजलेले
मन हिंदोळ्याचे झाले
आंदोलन घेता बुजरे
मन हळूच गाली हसले

जयश्री


Tuesday, April 21, 2009

छळतो अजूनही का


पाऊस कुणाला कसं वेड लावेल ते शब्दात सांगणं कठीण !! पण ह्या गझलेतून व्यक्त करायचा प्रयत्न केलाय.

पाऊस कालचा तो छळतो अजूनही का
जाळून काळजाला झरतो अजूनही का

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का

होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची
उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का

पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा
विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का

आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या
मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का

जयश्री 

Tuesday, April 07, 2009

यावा अशात साजण


सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा

हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्‍याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

निळाईने पसरावे 
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

नभदीप तारकांचे 
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

जयश्री