वृत्त - अनलज्वाला
मात्रा
८ ८ ८
वणवण फिरुनी, धावुनि दमतो संध्याकाळी
दिवस उसासे
टाकत असतो संध्याकाळी
थकून वारा
निपचित असतो संध्याकाळी
कधी विरक्ती
घेउन फिरतो संध्याकाळी
दिवसभराची
दिनकर करतो वेठबिगारी
दमून सुटका
मागत असतो संध्याकाळी
निशेस येण्या
अवधी असतो अजुन जरा अन्
दिवसच हातुन
निसटत असतो संध्याकाळी
विचार भलता
येतो कायम कातरवेळी
मनास विळखा
घालुन बसतो संध्याकाळी
चुकाच केल्या
आजवरी का वाटत असते
उगाच शिक्षा
भोगत बसतो संध्याकाळी
भरकटलेले गलबत
माझे सावरतो मी
नवा किनारा शोधत
फिरतो संध्याकाळी
नव्या दमाने
खेळत असतो रोज सकाळी
पुन्हा तसाच
पराजित असतो संध्याकाळी
चराचराच्या
नश्वरतेचा जागर होतो
तनमन सारे
व्याकुळ करतो संध्याकाळी
प्रसन्न करतो
देवघरातुन सांजदिवा मग
मनास उजळत तेवत
असतो संध्याकाळी
जयश्री अंबासकर
तुम्हाला ही गझल माझ्या आवाजात खाली दिलेल्या लिंकवर ऐकता येईल.
No comments:
Post a Comment