Friday, June 26, 2020

यश तुझे तुझ्या दारी


नको जगाकडे बघू
असा लाचार होऊन
हिस्सा तुझा सुद्धा आहे
पहा डोळे भिडवून

तुझे तुला मिळणार
जरा ठेव हे ध्यानात
नको घाई घाई करु
नशिबाला दे उसंत

नको विसंबू कुठेही
तुझे काम कर तूच
आल्यावर योग्य वेळ
भाग्य शोधेल तुलाच

मनासारखे आपल्या
नसते सदा घडत
बसायचे का म्हणून
मुळूमुळू रे रडत ?

जीव ओतून तू तुझे
काम कर अविश्रांत
तुला नकार देण्याची
मग कुणाची बिशाद

नको करु हाजी हाजी
तू कोणा सोम्या गोम्याची
तूच आहेस स्वयंभू
नको गुलामी कुणाची

जरा बघ रे ठेवून
स्वत:वर तू विश्वास
यश तुझे तुझ्या दारी
मिरवेल हमखास

जयश्री अंबासकर
२६..२०२०




Tuesday, June 23, 2020

उजळेल केव्हा

दुबळ्या मनाचा, आक्रोश काळा, थांबेल केव्हा
सूर्यात माझ्या, पेटून वणवा, उजळेल केव्हा

मार्गात होते, काटेच काटे,  जखमाच जखमा
हळुवार फुंकर, कोणी तयावर, घालेल केव्हा

कुठली न आशा, होती निराशा, पदरात माझ्या
भाग्यातले हे, दुष्चक्र माझे,  संपेल केव्हा

आभाळ येते, भरुनी पुन्हा पण, कोसळ न त्याला
माझा सुगंधी, मनमोगरा मग, बहरेल केव्हा

उलटेच फासे, पडतात कायम, खेळात माझे
माझ्या नशीबी, आहे किती हे, उमजेल केव्हा

कसदार असुनी, माझे बियाणे, पिकते न काही
शेतात माझ्या, सुख मोतियाचे, उगवेल केव्हा

जयश्री अंबासकर

Wednesday, June 03, 2020

अंतहीन

अस्वस्थ जाणिवा
दाटलेला काळोख
घुसमटलेला श्वास
संपलेली आस
सरपटणारा दिवस
संथ काळरात्री
अगतिकता
भूक
लाचारी
आक्रोश..
हतबलता
विझत जाणं
ठिणगीतली आग….
निपचित
राखेच्या ढिगाखाली !!
………
……
अचानक वावटळ
ठिणगीला जाग
आगीचा भडका
भडक्याचा वणवा
वणव्यातली होरपळ
चक्र तेच
पुन्हा पुन्हा
कधी ठिणगी
कधी वावटळ
कधी वणवा..
कधी होरपळ
अंतहीन….
अंतहीन….
…… ???
नाही…. नाही
हा अंत नाही
नक्कीच नाही
पेटलेली ठिणगी
आकाशाला भिडणार
दाटलेला काळोख
उजळून टाकणार
आणि मग….
हातात हात
दैवाची साथ
निधडी छाती
संकटावर मात
नवं क्षितिज
नवी कास
जुनेच हात
पण नवा आज
नव्या दिशांचा
शोध मनात
सुखाचं कारंजं
प्रत्येक घरात !!

जयश्री अंबासकर