Saturday, December 30, 2006

गारवा

आभाळ भरुन आलं ना......की तुझी आठवण अनावर होते रे! अगदी त्याच क्षणी तू हवा असतोस ! गच्च भरुन आलेलं आभाळ, तो खट्याळ वारा, भुरभुरता पाऊस...... सगळे एकच मागणं मागत असतात..... तू हवा...तू हवा.........

गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा

नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा

झुळूक मंद हासली
प्रीत मनी बहरली
मुग्ध मिठी पांघरण्या
तू हवा, तू हवा

वारा बघ जुल्मी हा
छेडितो पुन्हा पुन्हा
स्वैर बटा आवरण्या
तू हवा, तू हवा

भुरभुरत्या पावसात
भिजले मी नखशिखान्त
पदर जरा सावरण्या
तू हवा, तू हवा

जयश्री

ह्या माझ्या कवितेचं विवेक काजरेकरांनी खूपच मस्त रोमँटिक गाणं बनवलंय. "स्पर्श चांदण्यांचे" या अल्बममधे पद्मजा फ़ेणाणींनी ते गायलंय देखील सुरेख!

Friday, December 29, 2006

ऐश्वर्या

सगळी सुखं हात जोडून उभी आहेत..... ख-या अर्थानं मी आज ऐश्वर्या आहे......... फ़क्त तुझ्यामुळे !

सोपान चढता हे सुखाचे
आकाश मजला ठेंगणे
होताच तूची सोबतीला
नाही काही मज उणे

कुबेराचे गवसले धन
साथीने सखया तुझ्या
अमृताचा चषक ओठी
आज बघ रे माझिया

वादळी या यशपथावर
दीपस्तंभ होतास तू
अडखळे पाऊल जेव्हा
सावराया होतास तू

झोळी माझी तोकडी रे
सुमने सुखाची वेचण्या
चिंब झाले सुखसरींनी
आभाळ तू ये पेलण्या

जयश्री

Tuesday, December 26, 2006

मोगरा माझा

नजरेत मिसळली नजर राजसा जेव्हा
तो क्षणही थांबला होता
शब्दाविण तू बोललास तेव्हा
पाऊस थांबला होता

घनव्याकुळ डॊळ्यांमधला
मी प्रश्न पाहिला होता
रुकार तेव्हा नकळत माझ्या
कसा उमटला होता

तुझा वितळता कानी माझ्या
सूर वाजला होता
रजनीच्या अन्‌ कुशीत तेव्हा
मोगरा बहरला होता

तोच मोगरा दारी माझ्या
कसा कोमेजला होता
आवेग तुझ्या उबदार मिठीचा
आज ओसरला होता

माळियाने कसा अपुला
वृक्ष दुर्लक्षिला होता
नजरेत या रे आसवांचा
पूर दाटला होता

आसवांचे अर्घ्य पिऊनी
मोगरा फ़ुलणार होता
जागवाया गंध त्याचा
तू पुन्हा येणार होता

जयश्री

Saturday, December 23, 2006

प्रिया

ही माझ्या प्रियाच्या मनातली प्रिया :)

नकळत उमले हसू ओठावर
मनी तिचा तो अल्लड वावर
आठवणींची भरली ओंजळ
अंतरातूनी पसरे दरवळ

रंग केतकी जिवणी नाजूक
गालांवरचे गुलाब मोहक
महिरप कुरळ्या केसांची अन्‌
भाळावरची बट ती कामुक

भाव मनीचे नेत्र सांगती
शब्दाविण ते बोलून जाती
तार दिलाची छेडून जाती
संमोहन ते पसरुन जाती

सौंदर्यखणी ती मदनमंजिरी
वेडा लाविते नजर लाजरी
उत्कट खुलणे, प्रीत बावरी
प्रिया माझी ही गोड गोजिरी

जयश्री

माझिया मना

सांग ना वेड्या मना
काय तुजला जाहले
आज तू मौनात का हे
गूढ आता कर खुले

कोवळी किरणे रवीची
उजळती दाही दिशा
न्हाऊनी तेजात त्याच्या
तू असा विझलास का

दाटूनी हे मेघ आले
खुलविण्या तुज अंतरी
सोबती असती तयाच्या
पावसाच्या बघ सरी

गगनी नितळाई तरीही
हृदयी हा झाकोळ का
आसमंती तृप्ती तरीही
तू असा मिटलास का

कसली हुरहुर ही तुला
का नेत्र असूनी आंधळा
पायी असूनी सुखनुपूर
आज का तू पांगळा

जयश्री

Tuesday, December 19, 2006

साठवण

तुझ्या माझ्यातले सारे सारे सोनेरी क्षण मी मनापासून जपलेत. कधीतरी एकांतात उघडते ती कुपी आणि न्हाऊन निघते त्या आठवणींच्या पावसात....

कुठे साठवू
कसे साठवू
ते अमृत क्षण....
तुझ्या माझ्या प्रीतीचे
नकळत फ़ुललेले
अनावर ओढीचे
बहरलेले मोहरलेले.
हातात गुंफ़लेले हात
गुलाबी चांदरात
कुजबुज कानात
धुंद श्वासात
धडधड उरात
आतूर एकांत
फ़ुललेला वसंत
चांदणे विखुरलेले
चेहे-यावर पसरलेले
चंद्र थांबलेला
खिडकीतून डोकावलेला
अन्‌ खट्याळ हसलेला
रात्र चांदण्यात भिजलेली
कुशीत तुझ्या निजलेली
अशा राती आठवणीतल्या
कशा सावरु मनातल्या
एकमेकात मिसळलेल्या
स्पर्शाने उजळलेल्या

जयश्री

Sunday, December 17, 2006

मळभ

काही सुचतच नाहीये आज
काय होतंय काही कळतच नाहीये आज
सगळ्यांमधे असूनही वाटतंय एकटं का
सारं जवळ असूनही ही हुरहुर का
काहीतरी तुटतंय हा भास का
हातून काहीतरी निसटतंय हा आभास का
कशात रमवावं मन हे खुळं
मनाचं वागणं का नेहेमीपेक्षा निराळं
कशामुळे आलंय हे मळभ आकाशात
त्याचीच तर सावली नव्हे ना अंतरात
सारंच भासतंय करुण अन्‌ उदास
हट्टी जीवाची ही कसली मिजास
पुरे झाला आता हा खुळचट खेळ
वेडावतेय तुला ही रम्य सांजवेळ
देवापुढची समई शांत, प्रसन्न हसतेय
अजूनही निराशा ही मग का घर करतेय
बघ त्या ज्योतीकडे डोळे एकदा भरुन
हृदयातला अंध:कार कधीच गेलाय पळून
आता स्वच्छ, नितळ मनाच्या गाभा-यात
होऊ दे एका नव्या दिवसाची सुरवात

जयश्री

वसंतपालवी

कधी कधी आपलं सुख हे दुस-यांना सुखी बघून पण मानायचं असतं. असाच एका वसंताला वाट आहे ती तिच्या बहराची..... आणि त्याच्या पालवीला वृक्ष होण्याची.

वसंतपालवी

Tuesday, December 12, 2006

वर्तुळाचा कोन

जीवन एक कोडं, न सुटलेलं
एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं
आयुष्य सरतं याच धडपडीत
असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधीत
वाट तीच, आखून दिलेली
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फ़िरायचं
वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं.
मानायची खुषी त्याच परिघात
कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात.
मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं
आणि मूळही छाटून चक्क बोनसाय बनायचं,
मिरवायचं दिवाणखान्यात एक शोपीस बनून.
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं,
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश,
स्वत:साठी, इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.

जयश्री

Sunday, November 19, 2006

मुखवटे आणि चेहरे

किती मुखवटे, किती चेहरे
किती खोटे, किती खरे
प्रयत्न केला शोधायचा जर
भीषण सत्य येईल समोर
त्या सत्याला सामोरं कधी जाता येईल का?

रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून तारीफ़ करणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?

कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?

कशाला हवेत हे जमाखर्च....
कशाला हवेत हे तर्ककुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?

नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?

जयश्री

Wednesday, November 15, 2006

तुझे श्वास

श्वास तुझे ते मला दिलेले
संपत आले रे
कासावीस हा जीव होतसे
त्याविण माझा रे

श्वासांच्या त्या हिंदोळ्यांवर
झुलते मी ही तुझ्यासवे
स्पंदनात त्या अनुभवते मी
तुझ्या छबीचे रंग नवे

हळुवार त्या निश्वासांच्या
गोड गुलाबी स्पर्शाने
लाली चढते गो-या गाली
नकळत कशी ही लज्जेने

उमले ओठी हास्य चोरटे
आठवून त्या गुजगोष्टी
काटा फुलतो अंगावरती
तुझीच स्मरुनी गोड मिठी

रिती जाहले आहे पुरती
विना तुझ्या त्या श्वासांनी
दे ना आता श्वास नवे ते
घेऊनी मजसी तव कवनी

जयश्री

Tuesday, November 14, 2006

बंधन

नात्यांचं बंधन कधी कधी जाचक होत असलं तरी त्या बंधनातली तृप्ती पण फ़ार फ़ार सुख देते. इतकी वर्ष सोबत राहिल्यानंतर, एकमेकांच्या गुणदोषांना स्वीकारुन वाटचाल करताना....... कितीतरी सुखद क्षण वाटेत आले. सोबत दु:खाचे काटे सुद्धा होते म्हणा. पण तुझ्या सुरक्षित सोबतीनं सगळा मार्गच सोप्पा केलाय. तुझी आश्वासक साथ कुठल्याच अनिश्चिततेला थारा देत नाही. अशीच देशील ना रे तुझी साथ मला........जीवनाच्या प्रत्येक वळणावर.......!

तुझ्या बंधनात रे
आज खूप तृप्त मी
पिंज-यात प्रीतीच्या
कैद असून मुक्त मी

शिडकावा प्रेमाचा
सतत शिंपतोस तू
ग्रीष्माच्या वणव्यातही
फुलवतोस बाग तू

विहरते तुझ्यासवे
जसे फुलपाखरु
वर्षा ही प्रेमाची
नको कधीच आवरु

दिलेस फ़क्त सुख तू
दु:ख मात्र लपविले
प्रीतीच्या पंखांनी
मजला गोंजारीले

असेच चिंब भिजवूनी
ठेवशील ना मला
सावरुन घेशील ना
या तुझ्या वेड्या फुला

जयश्री

Monday, November 13, 2006

प्रेमसमर

पाहू नकोस ना रे
मजसी असा गडे तू
मी विरघळून जाते
समजून घे जरा तू

आमंत्रणे तुझी ती
नजरेतूनीच येती
नि:शब्द आर्जवे ती
डोळेच व्यक्त करीती

करी पाठलाग माझा
मिश्कील भाव त्याचे
हळुवार सोडती ते
शर प्रेमबंधनाचे

लटका विरोध आता
किती वेळ भासवू मी
ओढाळ ह्या मनाला
किती वेळ थांबवू मी

तू जिंकलास जानू
हरले तुझी प्रिया मी
समरात ह्या मनाच्या
हरुनीही जिंकले मी

जयश्री

Sunday, November 12, 2006

तुझ्याविना

का रे इतकी बंधनं हवीत ह्या जगाची? कां मनाला हवं तसं जगता येऊ नये? नाही रे जगता येत तुझ्याशिवाय!!

माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य

जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव

कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड

उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज

धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन.

जयश्री

Thursday, November 09, 2006

वळवाचा पाऊस

अचानक आभाळ भरुन येतं
चोहोबाजूंनी कोसळू लागतं
तळाशी दडलेल्या आठवणी तरल होतात
कासावीस होऊन उचंबळून येतात

उधाणलेला समुद्र
बेछूट पिसाळलेला वारा
उठवतो मोहोळ आठवणींचे
पसरुन सैरावैरा

विचारांचं काहूर
घालतं मनात थैमान
कुरतडून टाकतं काळीज
होऊन दुष्ट सैतान

काहीतरी करायचं राहून गेलेलं
खूपसं उपभोगायचं विसरुन गेलेलं
हातातून वेळ निसटून गेलेली
अपुरेपणाची जाणीव देऊन गेलेली

आभाळ निरभ्र झाल्यावर
स्व्च्छ प्रकाशाची कवाडं उघडल्यावर
आरंभ होईल नव्या दिवसाचा
तृप्तीचं तेज ल्यालेल्या एका नव्या आयुष्याचा

जयश्री

Tuesday, November 07, 2006

तू अन्‌ मी

आतूरलेला तू
अ‍न्‌ बहरलेली मी

आसूसलेला तू
बावरलेली मी

कासावीस तू
हरवलेली मी

नादान तू
अजाण मी....

प्रश्नार्थक मी
आश्वासक तू

स्वप्नील मी
हळुवार तू

बेहोष मी
मदहोश तू

स्वानंद मी
बेधुंद तू

हिंदोळा मी
आंदोलन तू

संमोहित मी
संमोहन तू........

अनुनय तू
अनुराग मी

अवाहन तू
अनुमोदित मी

माझाच तू
अन्‌ तुझीच मी

जयश्री

Wednesday, October 18, 2006

नव्हतास तू तेव्हा.......

मंतरलेली रात होती
तारकांची प्रणयी वरात होती

चंद्राची धुंद साथ होती
मौनाची नीरव साद होती

दिलात तुझी रे याद होती
सोबतीच्या तुझी आस होती

अनिवार अशी ती रात्र होती
फितूर सारी गात्रं होती

श्वासात आर्जवी ओढ होती
उरात हुरहुर गूढ होती

रात सरता सरत नव्हती
तुझ्याविना जणू व्याकुळ होती

नि:शब्द उसासे टाकीत होती
उष:काल ती मागत होती

जयश्री

Tuesday, October 17, 2006

मी पण

माझे मी पण मी कधीच विसरले
सवे जेव्हा तुझ्या मी पहिल्यांदा बहरले

स्पर्शातून तुझ्या रे मोरपीस फुलले
मनातले तरंग सारे अधरांवर उमटले

सारं विश्व माझं व्यापून तू टाकलंस
मला मात्र पुरतं वेडं करुन सोडलंस

सूर्य, चंद्र, तारे, आकाश सारं काही तूच
हृदयातली छेडली जाणारी हर एक तार तूच

तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यापर्यंतच सारं
वृथा आता माझ्यासाठी बाकी जग सारं

जयश्री

Saturday, October 14, 2006

चांदरात

पुन्हा आली ती चंदेरी रात्र, खट्याळ चंद्रासोबत......

टिपूर चांदण्यातली दुधाळ रात्र
फ़क्त तू अन मी मात्र
मंद तारकांचा सहवास
खराखुरा की नुसता आभास
चंद्राची असूया
आतूरलेली काया
खट्याळ लाटा
उडणा-या बटा
झुळूक वा-याची
थरथर अधरांची
सळसळ वेलींची
कुजबूज शब्दांची
चकित ते तारे
स्वप्नवत सारे
आसमंत भारलेला
माझ्यात तू भिनलेला
रात्र थांबलेली
कुशीत तुझ्या विसावलेली
जयश्री

Friday, October 13, 2006

परीसस्पर्श

तुझी आठवण येताच
खुलतं ओठावर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू

लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन पापण्या ही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं

उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा

जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर

दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात गात्रं

जयश्री

Thursday, October 12, 2006

येशील कां?

सांग सख्या रे येशील का
स्वप्नात माझिया येशील का

वारा नांदी घेऊन आला
हसू गालावर खुलवून गेला
मिटूनी डोळे वाट पाहते, हरवूनी सकला येशील का

आसमंत तो धुंद जाहला
तुझ्याचसाठी व्याकुळ झाला
अलगद येऊनी, हळूच स्पर्शूनी, मोरपीस तू होशील का

रातराणीचा सुगंध आता
गात्रातून या वाहू लागला
मिठीत तुझिया विसरुनी सारे, बेहोश मला तू करशील का

या वेडीला काही ना कळे
तुझ्याविना ना काही उकले
एकदाच रे फ़क्त एकदा, माझा तू रे होशील का

जयश्री

Wednesday, October 11, 2006

गूढ

खरंच........! गूढच म्हणायचं हे. हे पृथ्वीतलावरचं रहाटगाडगं कसं काय चालतं हे एक मोठं कोडंच आहे. शास्त्रीय दृष्टीने प्रत्येक गोष्टीला कारणं असतील सुद्धा. पण हे सगळं घडवणारा तो कोणी तरी आहे हे नक्की. प्रत्येक गोष्टीचं वळण अगदी ठरलेलं...... आखून दिलेलं.

अजाण त्या कळीस तो
भमर कसा भेटतो
गूढ उकले ना परी
कितीही शोधिले जरी

जशी धरा आतूरते
गगनाच्या मीलना
जशी सरीता धावते
सागराच्या वळणा

कसे कुणी अनुसरीले
कुणी कुणा शिकवीले
प्रकृतीच्या आर्तक्याचे
चलन कुणी लाविले

काय शोधी तू मना
गुपीत का करी खुले
गूढ अंतरातले
कुणा कधी न सापडे

जयश्री

Tuesday, October 10, 2006

हृदय पाखरु

तू नसतोस ना माझ्याजवळ तेव्हा माझं चित्तच नसतं रे था-यावर!

हृदय पाखरु

रुंजी घालती तुझ्या सयी रे, माझ्या या हृदयी
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

तो जर असता आज इथे तर
तो जर नसता आज तिथे तर
जर तरच्या द्वंद्वात अडकले, खिन्न दिशा दाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

मन लागेना कशात माझे
सूर तयाचा कानी वाजे
देहभान रे हरपून आता, वाट तुझी पाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

धावत ये ना, मिठीत घे ना
तोडीत ये ना वृथा बंधना
माझी नव्हते कधीच मी रे, फ़क्त तुझी राही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

जयश्री

ह्या माझ्या कवितेला सुद्धा विवेकनी स्वरबद्ध केलंय. एक सुरेख आर्त गीत तयार झालंय त्याचं.

Tuesday, October 03, 2006

श्रावणधारा

माझ्या ह्या कवितेचं विवेक काजरेकरांनी एका छानशा गाण्यात परिवर्तन केलंय. माझ्या कवितेचं बनलेलं हे पहिलंच गाणं.

श्रावणधारा

रंगत येती तरंगत येती
जलदांमधूनी धावत येती

श्रावणधारा, जलदाधारा
धुंद वादळी, कापीत वारा
बहरत येती, मोहरत येती
सप्त सूर ते छेडीत येती

लाटा धाडून सागर मग तो
आसूसून ही वाट पाहतो
सरीता वाहे भान हरपूनी
सवे तयाच्या मीलन पाही

इंद्रधनूच्या कमानीतूनी
घेई चुंबन वेडी अवनी
भारुन जाई सारी धरती
पावसास त्या घेऊन कवनी

नि:शब्द आता सारा परिसर
मृद्गंधाचा ओला गहिवर
आठवणी त्या व्याकुळ नयनी
ठेवूनी जाई रंगीत गगनी

जयश्री

Thursday, September 28, 2006

वसुंधरेची हाक

भारतातल्या पावसाचं महत्व इकडे वाळवंटात आल्यावर जास्त कळलं. पावसाच्या आगमनाचे वेध, त्याची नांदी, मग त्या टपोऱ्या थेंबांचं राजेशाही आगमन........ आणि नंतरचा तो तुफानी कोसळ.......... सगळं सगळं कसं त्या आभाळातल्या दिग्दर्शकाच्या इशाऱ्याप्रमाणे झालेलं. पावसाचं प्रत्येक रुप वेगळं. पण प्रत्येक रुप तेवढंच मोहक. आता ह्या कवितेतला पाऊसच बघा ना.......!

वसुंधरेची हाक

कातरवेळी नीरव परिसर
लावी जीवाला उदास हुरहुर
नकळत हे घन भरुनी आले
तिजला मग आर्जवू लागले

आतुरलेली वेडी अवनी
थकूनी झोपली वाट पाहूनी
खट्याळ वारा कुठूनी आला
अलगद तिजला उठवू लागला

स्वप्नामधली वेडी धरती
कूस वळवूनी खुदकन हसली
तिचे निरागस हास्य बघाया
सौदामिनी ही धावून आली

मनातला हा तिचा प्रिया तो
तिला ओढूनी जवळी घेतो
मेघराज मग धावत येतो
त्या आवेगा साथच देतो

धुंद अजाण गंधित धरती
तृप्त होऊनी सुखावते
हरित तृणांचा मऊ गालिचा
फुलांसवे मग पांघरते

जयश्री

Wednesday, September 27, 2006

ओला वारा

आज सूरांचा प्रवाह जरा जास्तच जवळचा वाटतोय. कारण माझ्यासोबत सगळा निसर्गच जिवंत झालाय आणि तुझ्या स्वागताला सज्ज झालाय.

हासत नाचत विहरत आला
धुंद मनीचा ओला वारा

त्या लाटेवर स्वार होऊनी
सूर तुझे ते लहरत आले
अलगद माझ्या मनी उतरले
कसा होय उतारा

धुंद मधुमती बहरत होती
मनात अन्‌ रे हासत होती
दूर तिचे ते मंद हासणे
करी तुझाच पुकारा

गगनावरची रक्तिम लाली
आणि सळसळे आतुर वेली
सारे जणू रे तुझ्या स्वागता
नांदी देत किनारा

जयश्री

Monday, September 25, 2006

सूर

सूर कुठूनी उमटले
चकित मी जाहले
रोमरोमी ही कळी
कशी उमलू लागली

धुंद मी स्वरात त्या
गुंतू अधिक लागले
सूर आर्त होतसे
मजसी काही ना दिसे

त्या सूरात अंतरात
खोल खोल गूढ आत
तरंग दाट फुलती जसे
माझे मन होय पिसे

सावरु कसे तयास
तूच सांग ना गडे
जिथे तिथे तुझाच सूर
मजसी अता सापडे

सूर हेच पांघरुनी
प्रेम जाई बहरुनी
प्रीत येई ही फुलूनी
धुंद त्या स्वरातूनी

गाली आली लाली ही
हसूही हळूच उमटले
सूर तेच हासले
गोजिरे फुलातले

जयश्री

Monday, September 18, 2006

कशी ही प्रीत

त्याच्या प्रेमाच्या सादेला मी रुकार दिला आणि सगळं आयुष्यच बदललं......! सगळी दुनिया अचानक रंगीबेरंगी झाली.

अवचित भेट कशी रे घडली
ध्यानी मनीही नसताना
नकळत प्रीत कशी ही फुलली
गाफिल मन हे असताना

क्षणात बदले सारी दुनिया
गुलाब पखरण चोहीकडे
फुले पिसारा मनमोराचा
नर्तन त्याचे तुझ्यापुढे

एकांती मग उगाच हसणे
तुला आठवून उगीच झुरणे
स्वप्नामधल्या सहवासाने
पुन्हा पुन्हा ते पुलकित होणे

समय गुलाबी पंख पसरुनी
असाच अलगद विहरावा
चिंब भिजावे प्रीतसरींनी
मनात दरवळ पसरावा

जयश्री

Saturday, September 16, 2006

चांदणतेज

चंद्र आणि चांदणं म्हणजे माझा अगदी strong weak point. त्यातून चंद्र जर पौर्णिमेचा असेल तर मग विचारायलाच नको. घराच्या लोकेशनमुळे माझ्या थेट बेडरुममधे चंद्राची किरणं अगदी बेधडक शिरतात आणि मग माझी मी उरत नाही. माझ्या कितीतरी कवितांचं उगमस्थान आहे हा खट्याळ चंद्र. लब्बाड.....! माझ्या अंतरातलं अगदी सगळं सगळं जाणून मला अक्षरशः वेड लावतो. त्याच्यापासून काहीसुद्धा लपून रहात नाही आणि मग ........ तो बघत रहातो माझी तगमग...... हसत हसत.....!

थकलेली रवीकिरणे
पश्चिमतट उतरती
छेडित सूर येई रात
दिशा पुन्हा उमलती

अंबरात झळकती
तारकांची फुले
चंद्रकोर जागवते
स्पंदनातले झुले

तुडूंब चांदणे पिऊन
धुंदी गात्री साठवून
मोहरते अंतरात
स्पर्श तुझा आठवून

तरंग चांदण्यातले
नयनी तुझ्या उतरावे
टिपूनी तेज त्यातले
मी तुझ्यात वितळावे


जयश्री

Wednesday, August 23, 2006

हॉस्पीटल

मला हॉस्पीटल ह्या जागेबद्दल थोडंसं वावडंच आहे. पण त्यात काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल मात्र नितांत आदर आहे. सगळ्या लोकांचं आशास्थान असलेली ही वास्तू कोणालाच नावडावी हे ह्या वास्तूचं दुर्दैवच म्हणावं लागेल. अवीसोबत कुवेतमधल्या मोठ्या हॉस्पीटलमधे जायची एकदा वेळ आली. तिकडून घरी आल्यावर काहीतरी घालमेल व्हायला लागली आणि ही कविता उतरली.

तटस्थ इमारतीतली
अविरत धावपळ
पांढऱ्या रंगातली
लयबद्ध पळापळ
बाहेरची हिरवळ
मनातली पानगळ
प्रश्नार्थक चेहेरे
व्याकुळ मन
असहाय नजरा
पिडलेलं तन
उरातली धडधड
देहाची पडझड
व्याधींचं गाठोडं
थकलेलं शरीर
शोधतंय निवारा
एक छोटासा कोपरा
सांत्वनाची थाप
हसरा दिलासा
अगतिक डोळ्यांना
पेलणारा खुलासा

जयश्री

Sunday, August 20, 2006

खेळ मनाचा

कधी कधी मन... एक नाचरा मोर
फुलवतं पिसारा इंद्रधनुषी, होऊन भावविभोर
जगलेले काही क्षण, काही आठवणी विलक्षण
येतात उचंबळून वर
आणि देऊन जातात असीम सुख
अगदी तसेच, पुन्हा एकदा.
त्या सरींचा कोसळ
आणतो शहारा नवा
नवी हुरहुर, नवी थरथर
गंधही नवा नवा

कधी हेच मन झाकोळतं
होतं हताश, निराश
गढूळ बुडबुडे आठवणींचे
करतात नकोसे सारे पाश
सारं काही गडद काळं
दीनवाणं, उदास उदास
गुदमरलेला जीव
अन सारं काही भकास

खेळ सारा मनाचा
डाव कधी जिंकलेला
कधी दुबळ्या हातांनी
स्वत:च घालवलेला.
हसरा, नाचरा मोर
की खिन्न काळोख....
असतं आपल्यालाच ठरवायचं
मनाला ताब्यात ठेवून
जिंकायचं की हरायचं.

जयश्री

ही वाट दूर जाते

इथे कुवेतला आल्यावर सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आपल्याला (म्हणजे स्त्रियांना) पटकन मनात आलं की बाहेर पडता येत नाही. तसं बायका सुद्धा इथे driving करतात म्हणा. पण मी नाही करत drive इथे. म्हणून सर्वस्वी नव-याच्या मर्जीवर असतं बाहेर जाणं. बरेचदा मस्त Long drive ला जावंसं वाटतं...... पण नेमका तेव्हा जर पतीराजाचा मूड नसेल तर सगळं मुसळ केरात. असंच एकदा बाहेर मस्त वातावरण होतं......... मग मला नेहेमीप्रमाणेच बाहेर भटकायचा मूड आला. पण ह्यांचा मात्र अजिबात नव्हता........ मग काय करणार......बाल्कनीत येऊन बाहेरच्या बोलावणा-या रस्त्याकडे बघत बसली आणि ह्या ओळी मनात आल्या.

खूप दूरवर जाणारा रस्ता
कां वाटतो आपलासा
कायम वाट बघणारा
केविलवाणा बराचसा

सोबत त्याच्या एकदा मला
तुझ्या साथीनं जायचंय
खरंच कुठे जातो ते
शोधून काढायचंय

विरक्त साधूसारखा
असतो तो अलिप्त
साथ मात्र देतो तो
समजून सकला आप्त

येशील तू माझ्यासोबत...
जगाच्या अंतापर्यंत...
रस्ता फक्त निमित्त रे....
खरं तर साथ तुझी हवीये
जीवनाच्या अस्तापर्यंत.

जयश्री

Saturday, August 19, 2006

तू हवा..... तू हवा!

कुवेतला विवेकनी जेव्हा गाणी स्वरबद्ध करायला सुरवात केली ना, तेव्हा मलाही असं वाटायचं की आपण पण काहीतरी लिहावं आणि विवेकनी इतर कवितांसारखा माझ्या कवितेलाही स्वरसाज चढवावा. ती वेळ लवकरच आली. तुषार जोशीनी लिहिलेली एक कविता "हवीस तू" ही विवेकला खूप आवडली. त्यानी त्याला स्वरांनी थोडसं सजवलंही. पण काहीतरी वेगळा प्रयोग करायचं हे त्याच्या मनात होतं. तो म्हणाला की ह्यात जसं तुषारनी एका प्रेयसीचं मनोगत लिहिलंय तसं तू एका प्रियकराचं लिहू शकशील का...... जर त्याच मीटरमधे तू लिहिलंस तर आपण एक द्वंद्वगीत बनवू शकू आणि मग "तू हवा--तू हवा " ही कविता जन्मली. त्यातली दोन कडवी घेऊन विवेकनी अतिशय तरल आणि रोमॅंटिक गाणं बनवलं. जे स्पर्श चांदण्याचे ह्या अल्बमधे अर्थात सुरेश वाडकर आणि पद्मजा फ़ेणाणी ह्यांनी गायलं. माझं अतिशय आवडतं गाणं.

स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू


मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ

बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

जयश्री

Tuesday, August 15, 2006

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.

'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं

'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी

जयश्री

Sunday, August 13, 2006

नातं

सरळ सोपं आयुष्य ......... ऊहूं....... काहीतरी घडायला हवं....... something interesting!! किती मज्जा येईल ना....... खूपदा असं वाटायचं........ आणि खरंच तसं घडलंसुद्धा. "तू" ........ हो...... "तूच" ........

एकदा तू मला म्हणालास, 'तू मला खूप आवडतेस'
किती सोपे नि सरळ शब्द !
पण त्या शब्दाच्या आवेगात मी पुरती ओढले गेले

त्या झंझावाताने गोंधळले
त्यातून बाहेर निघायला, हात-पाय हलवायलाही विसरले
हळूहळू तो झंझावातही मला आवडायला लागला
त्याचा आवेग हवाहवासा वाटायला लागला
आता मला आकंठ बुडायचं आहे
अगदी गुदमरेस्तोवर डुंबायचं आहे
तू मात्र मला अडवू नकोस
मला नाही म्हणू नकोस
तुझ्यात गुंतायला तू मला भाग पाडलं आहेस
आता फ़क्त तू आणि मी, मी आणि तू
फक्त हे एकच नातं उरलंय, जे तूच जन्माला घातलं आहेस.

जयश्री

Saturday, August 12, 2006

गर्विता

ही माझी गर्विता. आपल्याच विश्वात मश्गुल..... स्वत:बद्दल अतिशय प्रांजळ अभिमान असलेली..... आपण जगत असलेल्या आयुष्यात ती इतकी खुष आणि समाधानी असते.... की ह्यापुढेही काही सुख असू शकतं ह्याची तिला कल्पनाच नसते. आणि अचानक "तो" तिच्या आयुष्यात येतो...... त्याच्या येण्यानी ती अतिशय गोंधळते. आपण काय जगत होतो आणि आता आपल्याला काय हवंय ह्याची तिला जाणीव त्याच्या येण्यामुळे होते. ती नकळत त्याच्यात गुंतत जाते. त्याच्याशिवाय जगलेलं आयुष्य किती कवडीमोल होतं...... पण तो येतो.... तसा अचानक नाहीसाही होतो..... आपली फक्त एक झलक दाखवून....... पण ती मात्र त्याची वाट बघत राहते........... कधीतरी तो येईल पुन्हा...... कधीतरी नक्कीच.

गर्विता

काया माझी गंध फुलांची
रंगबावऱ्या गुलमोहराची
दवात भिजते, दवात न्हाते
फुलवंती मी अवनीवरची

फुलात गमते, मी गंधाली
सुरात रमते, मीच स्वराली
गंध सुरांचा पांघरून मी
गाणी गाते मी चैताली

चैतन्याची मीच पालवी
कलिका फुलती हास्य पाहुनी
पडे भूल मग भ्रमरालाही
भिरभिरती ते चकित होऊनी

एके दिवशी कसा अचानक
वारा छेडी धून आगळी
मी न राहिले माझी तेव्हा
कशी ओढ ती जगावेगळी

चाहुल कोणा गंधर्वाची
चुकवी ठोका काळजातला
पंचम त्याच्या लकेरीतला
वेग वाढवी स्पंदनातला

खिळले जागी, मंत्रमुग्ध मी
पीयुष सूरांचे प्राशन करुनी,
अजब तृप्तीच्या सागरात त्या
विहरत होते सारे विसरुनी

सूर थांबती, हवेत विरती
नयन शोधिती सूरनायका,
कटू सत्याची जाणीव झाली
सुकून गेली रुपगर्विता

जीवन सारे व्यर्थ भासले
त्या गीताविण, त्या सूराविण
किती युगे ती उलटून गेली
अर्थशून्य मी जगले जीवन

अपराधी मन घेऊन वारा
त्या सूरांना पुन्हा शोधतो
अव्यक्त प्रीतीच्या मूक क्षणांचा
तोच एकटा साक्षी असतो
तोच एकटा साक्षी असतो

जयश्री

धुकं

खरं सांगू का.... मला ना वर्तमानातच रमायला आवडतं. आता ठीक आहे पण पुढे काय होणार, असा विचार करणाऱ्या माणसांचा मला काहीसा रागही येतो. पुढे काय होणार ह्या विचाराने आताचा हा सुखाचा क्षण का वाया घालवायचा? शिवाय तुम्ही जर fighter असाल तर तुमच्या हिम्मतीवर तुम्ही नक्कीच तुमचं भविष्य सुखमय करु शकता. ही कविता अगदी typical माझ्या nature ची कविता आहे.

धुकं

धुक्यात हरवलेली वाट
सभोवती हिरवळ
पण पुढे अंधार दाट

कशाला हवी ती पर्वा
त्या पुढच्या काळोखाची
त्या गूढ भविष्याची

वर्तमानातल्या हिरवळीत
आसूसून नहावं
पाखरासारखं स्वच्छंद बागडावं

आपल्या हातानी भरावं
आपलं सुखाचं माप
धुकंही विरेल मग आपोआप

पुढची वाटही विचारेल मग
कुठे वळायचं
आता कुठल्या शिखरावर जायचं

जयश्री

Friday, August 11, 2006

धरतीचा साज

भारतातल्या पावसात मनसोक्त भिजून इथे कुवेतला परत आल्यावर तिकडच्या पावसाची आठवण यायला लागली. अशाच चुकून इथल्या आभाळात वाट चुकलेल्या एका ढगाला बघून सगळ्याच पावसाच्या आठवणी मनात पिंगा घालायला लागल्या........तेव्हा हा 'धरतीचा साज' सजला.

ह्या माझ्या कवितेला आपल्या सुरेख स्वरांचं संगीत दिलंय विवेक काजरेकरांनी आणि गायलंय सुरेश वाडकरांनी. "स्पर्श चांदण्याचे" ह्या अल्बम मधे हे गाणं ऐकायला मिळेल. व्हिनस कॅसेटनी हा अल्बम वितरीत केलाय. ह्यात माझी ३ गाणी आहेत. सुरेश वाडकरांसोबत पद्मजा फ़ेणाणी ह्यांचीसुद्धा स्वरसाथ आहे ह्या अल्बम मधे.


धरतीचा साज

घन हे आले गरजत बरसत
गंध मनाचा खुलवीत फ़ुलवीत

धरती आतूर, प्रणयी थरथर
मीलनास त्या साक्षी परीसर
अवखळ वारा छेडीत जातो
सूर आगळे, लहरत विहरत
घन हे आले.........

मैफिलीत पाचूच्या हिरव्या
पदन्यास हा सौदामिनीचा
लयीत सरींच्या, संगे रिमझिम
पर्जन्याचा नाद अनाहत
घन हे आले.................

पखरण चैतन्याची अनिमिष
आसमंत मग रंगीत, गंधीत
वेदीवरती धरा उभी ही
नवा लेऊनी साज सलज्जित
घन हे आले ..........

जयश्री

Tuesday, August 08, 2006

चांदणं

कधी कधी आपल्या आजुबाजूचा आसमंत आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. मनाची स्थितीसुद्धा कारणीभूत असते म्हणा...... अशाच एका हळूवार क्षणी, मनाची घालमेल त्याच्यासाठी...... त्याच्या आठवणींसाठी.......

चांदणं

आठवणींच्या चांदण्या
लुकलुकतात नभात
लक्ष ज्योती उजळतात
निरभ्र आकाशात

न्हाऊन निघते काया
त्या शांत प्रकाशात
धुंदावते गात्रन गात्रं
त्या मुग्ध वर्षावात

तोडून सारे तारे
अलगद घेते पदरात
तुझ्या स्पर्शाचे धुमारे
मग प्रत्येक श्चासात

रात्र चढते जशी
भिनते नसानसात
तुझा तीव्र आभास
ह्या टिपूर चांदण्यात

जयश्री

बंदिनी

समाज कितीही पुढारला तरीही स्त्रीवर लादली जाणारी बंधनं अगदी तशीच आहेत. कालानुरुप थोडाफार बदल झाला इतकंच.

बंदिनी

जन्मजात लाभली
बंधने जगातली
कुशीत जरी पहुडली
कोवळी कुमुदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

तरुणाई चिवचिवते
स्वप्नी पंख पसरते

जनकाच्या परी सदनी
पराधीन नंदिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

सप्तपदी चालता
जोडवी हासती
नजरकैद कुंकवाची
असून हृदयस्वामिनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

सांजकाली जीवनी
पुत्र सुकाणू धरी
पुनश्च वाट चालते
पायी बेडी घालूनी
ती एक बंदिनी, ती एक बंदिनी

जयश्री

Sunday, August 06, 2006

असाही एक दिवस

एखादा दिवस असा उगवतो ना..........काही मनासारखं जमतंच नाही. सगळं विपरीतंच घडतं. सारखी चिडचिड स्वत:वर आणि समोर जो दिसेल त्याच्यावर.......... असंच काहीसं.....

एखादा दिवस असा उगवतो
मनाला चुटपुट लावून जातो

सारं काही उलटंच घडतं
आणि उभारलेलं मन कोलमडून पडतं

हरएक गोष्ट चुकतंच जाते
सावरायच्या आधीच विस्कटून जाते

सा-या जगाचा अगदी राग राग येतो
समोरचा प्रत्येक माणूस नकोसा होतो

मन कशातच रमत नाही
कुठल्याच गोष्टीत गमतही नाही

काळाकभिन्न अंधार वेडावू लागतो
मनातल्या काळोखाला अधिकच गडद करतो

सांजवेळीचा दिवाही धापा टाकू लागतो
भिंतीवरल्या सावल्यांशी असहाय झुंज देतो

रात्रीची चढती कमान आणखीनच रुंदावते
सा-या जगाला जणू विळख्यात घेऊ पहाते

थकलेलं मन मग स्वत:ला झोपेच्या स्वधीन करतं
आणि एका शुभ्र दिवसाची स्वप्नं पाहू लागतं.

अस्तित्व

कधी कधी मन उगाचच नको त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंतल्या जातं. स्वत:चं अस्तित्व शोधण्याचा एक चाळा म्हणा हवं तर......! पण सगळं शोधून झाल्यावर कळतं की ह्याची काही गरजच नव्हती मुळी. आपण आपल्या प्रेमळ गोतावळ्यातच आहोत गुरफ़टलेले आणि स्वतंत्र अस्तित्वाची अजिबात गरज नाहीये. आता हे झालं माझं मत...........बघा पटतंय का ?


अस्तित्व

झगडतं मन स्वत:शी
मी म्हणजे कोण
काय ओळख माझी
उत्तरं येतात बरीच
पण खरी मी कुणाची
कायम कुठल्यातरी नात्यात अडकलेली
की कधी होते मी माझी स्वत:ची.....?

कळती झाले जेव्हा,
होते फ़क्त लाडकी लेक आईबाबांची
त्यांच्या सुरक्शित पांघरुणात
कित्ती कित्ती सुखात
हळूहळू सखे सवंगडी आले जीवनात
आणि रमू लागलं मन
एका वेगळ्याच विश्वात
आईबाबांचं ते कवच होतंच
पण अंगण आता झालं होतं
रंगीत...... खुळावलेल्या ढगांचं
कुणाची होते तेव्हा मी........
माझी.......ऊं हू.......नक्कीच नाही.

वेळॆवारी झालं लग्न
बायको झाले त्याची
आई झाले दोन गोजिरवाण्या बाळांची
पण माझी मी कुठे होते........
त्या गोड किलबिलाटात स्वत:ला
हरवून बसले होते.

पाखरं झाली मोठी
उडून गेली आपापल्या जगात
फ़क्त दोघंच उरली त्या
छोट्याशा घरट्यात
तो अन मी.
कुणाची होते तेव्हा मी
माझी......... ऊं हू.....

तेव्हाही मी माझी नव्हतेच
होते त्याची, फ़क्त त्याची
पण आता मनातलं हे प्रश्नांचं वादळ मात्र शमलेलं
चारही किना-यांवर आदळून विसावलेलं.
मी पणाची जाणीवही संपलेली.
उरलीये ती फ़क्त त्याची सखी
त्याच्यासाठी जगणारी
अस्तित्व स्वत:चं विसरलेली.
कुवेतमधे सहसा हिवाळ्यात पाऊस पडतो.
अशाच एका आळसावलेल्या, गारठलेल्या, भिज-या सकाळी
अगदी पांघरुणातली कविता !

Saturday, August 05, 2006

आठवणी

पूर आठवणींचा
आठवणी साचलेल्या
काळजात ओथंबलेल्या
आठवणी पेटलेल्या
होरपळून निघालेल्या
आठवणी भरजरी
मखमली पेटीत जपलेल्या
आठवणी हळूवार
अलगद हातांनी टिपलेल्या
आठवणी पहिल्या स्पर्शाच्या
नकळत लाजलेल्या
आठवणी मीलनाच्या
हृदयात साठलेल्या
आठवणी पावसाच्या
मनात कोसळणा-या
आठवणी सरींच्या
चिंब चिंब भिजवणा-या
आठवणी थंडीतल्या
उबदार कुशीतल्या
आठवणी पहाटॆच्या
गार गार वा-यातल्या
आठवणी विरहाच्या
पिळावटून निघालेल्या
आठवणी भेटीच्या
मोहरून निघालेल्या
आठवणींचे मोहळ
अनावर तो कोसळ
आठवणींचे वादळ
भावनांचा कल्लोळ
आठवणींचा वावर
ओला गहिवर
आठवणींचा आसरा
मनाचा गाभारा
जयश्री

आयुष्य

माझ्या मते आयुष्य हे असं असावं. मी लिहिलेली ही कविता... आयुष्यावरची.

आयुष्य

आयुष्य म्हणजे काय असतं...?
देवानी जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं?
खरं तर... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं
आणि तरुणपण टिकवायचं असतं
माणूसपण जोपासायचं असतं
दुसर्यांना हसवत स्वत:ही फ़ुलायचं असतं
पहाटॆच्या दवबिंदूत नहायचं असतं
प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं
रातराणीच्या झुळूकींनी मोहरायचं असतं
निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं
स्वत:चं राजेपण स्वत:च घडवायचं असतं
मित्रमैत्रीणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफ़िलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनी संपवायचं असतं.

जयश्री

Wednesday, August 02, 2006

नव्या दालनातलं पहिलं पाऊल

॥ॐ गं गणपतये नम:॥
सुरवात गणपतीला वंदन करुन करतेय.
हा माझ्या घरचा गणपती.
कुठलंही काम असो.....छोटं किंवा मोठं.....सगळ्यात पहिले हात गणपती बाप्पापुढे जोडले जातात.
गणपतीच्या आशीर्वादानी आतापर्यंत आयुष्याची वाटचाल खूपच सुखकर झालीये.
देवा, तुझी अशीच कृपादृष्टी असू दे.