Thursday, December 02, 2010

मौनाचं वादळ

एकेक दिवस असा उगवतो ना..... !! आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं होतं..... छोट्या छोट्या गोष्टींनी डोळे भरुन येतात. नेमकं काय हवंय ते ही उमजत नाही. मग असाच सरतो ..... तो "एक" दिवस ....

काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज

उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

जयश्री अंबासकर