Friday, March 30, 2007

नवरस

नवरसांचा हा आविष्कार घडवून आणला आमच्या महाराष्ट्र मंडळानं. आमच्या वार्षिक संमेलनाची नवरसाची थीम मी अशी शब्दबद्ध केली. संगीतबद्ध केलं होतं विवेक काजरेकरांनी आणि गायक विवेक आणि मी.

तुम्ही ऐकूही शकता इथे

शृंगार रस
शृंगार मी प्रेमी जीवांचा

मीत हृदयी रुजवतो
स्पंदनातून इश्क पसरुन
मीलनी मी बरसतो

स्वप्नील मी, मदहोश मी
लाज-या प्रीतीत मी
साक्ष प्रणयाचीच मी अन्‌
चांदव्यातील आग मी

भयानक रस
उरी धडधड जागते अन्‌
कापते का ही तनू
प्राण का कंठास येतो
बोबडी वळते जणू

अस्तित्व माझे हे असूरी
जागवी भय अंतरी
उडे गाळण ही भल्यांची
दृष्टी टाकीन मी जरी

हास्य रस
तुषार माझे उडती जेथे

सुहास्य तेथे खळाळते
चैतन्याचे अल्लड वारे
मनी मानसी सळसळते

भेदभाव ना कोणासाठी
राजा रंका मी न वेगळा
दु:खाला तो नाही थारा
आनंदाचा सर्व सोहळा

बीभत्स रस
ओंगळवाणे रुप लाभले
बघुनी मला जन शहारती
नको वाटते दर्शन माझे
टाळून मज परी ते जाती

घृणाच सारी माझ्या पदरी
एकांताची साथ मला
तिरस्कार मी सदा झेलतो
बीभत्स म्हणती सर्व मला

करुण रस
नजर ओली, उरी हुंदका

मनात देवाचा धावा
दोन जीवांची विरही तगमग
तिथेच माझा जन्म नवा

दु:खाशी मी जरी जखडलो
मृत्यूशी झुंजतो सदा
कारुण्याचा सागर मी जरी
डोळे पुसतो मीच पुन्हा

वीर रस
शस्त्र शोभते माझ्या हाती

मीच शायरी वीरांची
रक्त उसळते,पेटून उठते
ऐकूनी गाथा शौर्याची

शूर शिपाई माझे साथी
नाही जागा दुबळ्याला
नको म्यान अन्‌ नको विसावा
रक्त हवे तलवारीला

अद्‌भूत रस
स्वप्नी रमविते, स्वप्नी नेते

बाग फुलविते स्वप्नी मी
झिम्मा खेळत सवे प-यांच्या
गीत गोजिरे गाते मी

जादू, राक्षस, भूत, चेटकी
दुनिया माझी ही न्यारी
भूल पाडते, चटक लाविते
या जगती मी राज्य करी

रौद्र रस
गुलाम माझी सारी दुनिया

सैतानाचा साथी मी
हाहाकार मी उडवून देतो
दिसेल ते ते तुडवून मी

आगमनाची नांदी माझ्या
देई दर्शन भयकारी
समोर येईल त्याला चिरडून
तांडव करितो उरावरी

शांत रस
अवनीवरचा दूत शांतीचा

आश्रय देतो सकल जना
हारुन दु:खे जगताची मी
सांत्वन देतो श्रांत मना

ओंकाराचे संजीवन मी
भक्तीरसाचा मी दाता
पखरण करतो वात्सल्याची
तिन्ही जगाचा मी त्राता

जयश्री

Wednesday, March 28, 2007

बुरख्यातला सूर्य

काल अचानक माझ्यासमोर अगदी टिपिकल सौदी बायका आल्या..... नवर्‍यासोबत अगदी दबून असलेल्या. त्या नवर्‍याच्या चेहर्‍यावर इतकी मग्रुरी होती ना. जणू काय त्या सगळ्या बायका त्याची मालमत्ता होती आणि त्याला जसा हवा तसा वापर तो करु शकत होता. त्या बायकांचे वाकलेले खांदे, झुकलेल्या नजरा बघून अगदी कसंतरीच झालं आणि मनात विचार आला.......

बुरख्याआडच्या वेदना... गुरफटून राहतात तशाच
सोन्याचा मुलामा चढवून...मिरवत राहतात अशाच
तेलाच्या खाणीतलं ऐश्वर्य जगापुढे दाखवताना
पैसा आणि मग्रुरीच्या कैफ़ात दुनियेला झुकवताना
दुर्लक्ष करतात........
त्या काळ्या बुरख्याआड चिणून टाकलेल्या संवेदनांकडे....
दाबून टाकतात ते सारे उसासे.
छोट्याशा डोळ्यांच्या फटीतून... कावर्‍याबावर्‍या नजरा
भिरभिरत राहतात फ़क्त
सवयच होऊन गेलेली त्यांच्या उमाळ्यांना
दबून रहायची.
त्या छोट्याशा फ़टीतूनच अनुभवायची दुनिया.
बुरखे सुद्धा काळेच
पुरुषी अहंकारासारखे...!
कुठल्याही रंगाच्या भावनेला काळवंडून टाकणारे.
त्या उदासी आवरणाला आता रंगाचंच वावडं झालेलं...
फुलण्याची....खुलण्याची स्वप्नंच करपलेली....
वखवखलेल्या वासनेची पूर्ती.....हे एकच काम उरलेलं,
बुरख्यावरची जरतारी कलाबतूच काय ती थोडी हसते
बाकी सगळं भकास.....!
कधीतरी एखादी ठिणगी ह्या काळ्याशार अंधारात....
पेटून उठेल... आणि उजळेल आसमंत थोडावेळ....!
अशी आशा तरी जागत असेल हा ह्यांच्या मनात....?
की ह्या अंधाराची सोबतच आता त्यांना हवीहवीशी वाटत असेल....
नुसतेच प्रश्न.....!
जितक्या जमिनी, तितकेच अंधार
पण उगवणारा सूर्य एकच.
तो कितीसा पुरणार सगळ्यांना....!
आता अंधारालाच पेटून उठावं लागणार आहे कधी ना कधी
फाडून टाकावे लागणार आहेत....स्वत:चे बुरखे स्वत:च
आणि जन्माला घालावा लागणार आहे आपला स्वत:चा सूर्य !

Sunday, March 25, 2007

कळले कधीच नाही

माझा कुणा म्हणू मी
कळले कधीच नाही
का जाहले तुझी मी
कळले कधीच नाही

माझाच वाटला तू
कित्येकदा परंतु
होतास दूर का तू
कित्येकदा परंतु

सर्वस्व मानिले मी
सखया मनी तुला रे
गेलास सहज कैसा
तोडून पाश सारे

रमते अजून मी रे
स्वप्नात त्या दिसांच्या
जगते अजून मी रे
प्रीतीत त्या जुन्या का

मज रीत या जगाची
कळली कधीच नाही
माझा कुणा म्हणू मी
कळले कधीच नाही.....

Wednesday, March 21, 2007

जीवनरंग

बंधन कुठले नको वाटते
पाश नको ते कोणाचे
मुक्त मोकळा श्वास हवा मज
नकोच दडपण कोणाचे

नको काळजी, नकोच चिंता
नको लढाई दुनियेशी
नको दु:ख अन्‌ नको उसासे
नको लढाई पैशाशी

अजब मागणे जगावेगळे
ऐकून हसला मनामधे
"तथास्तु'" म्हणुनी गुप्त जाहला
देव दाटशा धुक्यामधे

सुखी जाहले वाटे मजला
मनापरी घडता सगळे
सुख परंतु डाचत होते
कारण मज ते का न कळे....

विचार करता गूढ उकलले
शांती झाली चित्ताची
बंधनातले सुख आकळले
किंमत कळली पाशाची

नयनी पाणी दुस-यासाठी
हास्य तयांच्या सुखामधे
कळले मजला हिच जिंदगी
व्यर्थ गुंतणे स्वत:मधे

बेचव दुनिया फ़क्त सुखाची
दु:खाने गोडी वाढे
दु:खानंतर येता सुख ते
जगण्याला मग रंग चढे

जयश्री

Friday, March 16, 2007

उन्मुक्त तू

देहफुले उमलवून
मुक्त तू उन्मुक्त तू
तूफानी प्रीत सरी
उधळूनी रिक्त तू

झेलूनी तुझा प्रपात
नखशिखान्त नाहते
प्रणयाचा मी मरंद
मनमुराद चाखते

दाहक कोसळ तुझा
उतरतो नसानसात
मदहोशी पसरते
गात्रातून अंतरात

वितळते मिठीत मुग्ध
बेहोषी धुंद धुंद
उन्मेषी श्वासांची
लयकारी मंद मंद.

जयश्री

Wednesday, March 07, 2007

तुझ्याविना हा पाऊस

तुझी इतकी सवय झालीये ना......... की कुठलाही रंग तुझ्याविना अगदी बेरंग असतो. त्यात पाऊस तर आपल्या दोघांचाही आवडता. किती मनसोक्त आस्वाद घेतलाय ना आपण ह्या पावसाच्या स्वच्छंदीपणाचा....! पण आज तू नाहीयेस........ आणि नेमका तो आलाय रे..........

तुझा हळवा पाऊस
आज आठवतो मला
चिंब सरीनं तयाच्या
आज भिजवतो मला

कधी बरसणं तुझं
रिमझिम अलवार
नखशिखान्त भिजते
त्यात मी रे हळुवार

कधी तुफानी कोसळ
गरजत बरसत
कधी झिम्माड झिम्माड
द्वाड प्रीत फुलवत

आता कधी रे येशील
मनी सारखा सवाल
घन दाटता नभात
पुकारते वेडी प्रीत

तुझ्याविना हा पाऊस
आसू आणतो डोळ्यात
धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात

जयश्री