Sunday, May 30, 2021

वृत्त - पृथ्वी

वृत्तपृथ्वी
लगालललगा लगालललगा लगागालगा

कधी तिमिर दाटतो गडद होउनी अंतरी
उगाच हळव्या मना विकल होउनी पोखरी
हताश हरल्या मनास नसते उभारी मुळी
मना बिलगती निराश ढग साचते काजळी

जुन्याच जखमा करून उघड्या रडावे किती
उगाच खपल्या पुन्हा उकरुनी बघाव्या किती
तसेच कवटाळणे परत त्याच दु:खास का  
अशाच परिघातुनी सतत तू फिरावेच का

जरा उघड कोष तू विहर या नभी मोकळ्या
जरा उमलू दे, पुन्हा बहरु दे तुझ्याही कळ्या
असेल जपला कधी कवडसा पहा शोधुनी
दिसेल हसरी तुझीच प्रतिमा तुला दर्पणी

जयश्री अंबासक

खाली दिलेल्या लिंकवर ही कविता माझ्या आवाजात ऐकू शकता.



No comments: