Sunday, January 31, 2010

रुतावे कुठे


न काट्‌यास कळले सलावे कुठे

रुतावे कुठे अन्‌ दुखावे कुठे

विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे

तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

जयश्री

Tuesday, January 12, 2010

दुरावा

येते का रे तुला आठवण माझी....होतोस का रे माझ्यासारखाच तू ही व्याकुळ......!!

देतोस का उजाळा
त्या धुंद आठवांना
होतोस काय हळवा
स्पर्शून आठवांना

ती एकली दुपार
तो प्रश्न कापरासा
ती खूपशी कबुली
इन्कार ही जरासा

झाल्या मग अचानक
सांजा अजून कातर
अवघडले होते जगणे
विरहातले निरंतर

आहे तसा शहाणा
अपुला जरी दुरावा
आतून पेट घेतो
कधी तोच रे दुरावा

तैसाच चंद्र अर्धा
दोघांत वाटलेला
त्या पौर्णिमेत अजूनी
तू मुक्त सांडलेला

जयश्री अंबासकर