Saturday, August 12, 2006

गर्विता

ही माझी गर्विता. आपल्याच विश्वात मश्गुल..... स्वत:बद्दल अतिशय प्रांजळ अभिमान असलेली..... आपण जगत असलेल्या आयुष्यात ती इतकी खुष आणि समाधानी असते.... की ह्यापुढेही काही सुख असू शकतं ह्याची तिला कल्पनाच नसते. आणि अचानक "तो" तिच्या आयुष्यात येतो...... त्याच्या येण्यानी ती अतिशय गोंधळते. आपण काय जगत होतो आणि आता आपल्याला काय हवंय ह्याची तिला जाणीव त्याच्या येण्यामुळे होते. ती नकळत त्याच्यात गुंतत जाते. त्याच्याशिवाय जगलेलं आयुष्य किती कवडीमोल होतं...... पण तो येतो.... तसा अचानक नाहीसाही होतो..... आपली फक्त एक झलक दाखवून....... पण ती मात्र त्याची वाट बघत राहते........... कधीतरी तो येईल पुन्हा...... कधीतरी नक्कीच.

गर्विता

काया माझी गंध फुलांची
रंगबावऱ्या गुलमोहराची
दवात भिजते, दवात न्हाते
फुलवंती मी अवनीवरची

फुलात गमते, मी गंधाली
सुरात रमते, मीच स्वराली
गंध सुरांचा पांघरून मी
गाणी गाते मी चैताली

चैतन्याची मीच पालवी
कलिका फुलती हास्य पाहुनी
पडे भूल मग भ्रमरालाही
भिरभिरती ते चकित होऊनी

एके दिवशी कसा अचानक
वारा छेडी धून आगळी
मी न राहिले माझी तेव्हा
कशी ओढ ती जगावेगळी

चाहुल कोणा गंधर्वाची
चुकवी ठोका काळजातला
पंचम त्याच्या लकेरीतला
वेग वाढवी स्पंदनातला

खिळले जागी, मंत्रमुग्ध मी
पीयुष सूरांचे प्राशन करुनी,
अजब तृप्तीच्या सागरात त्या
विहरत होते सारे विसरुनी

सूर थांबती, हवेत विरती
नयन शोधिती सूरनायका,
कटू सत्याची जाणीव झाली
सुकून गेली रुपगर्विता

जीवन सारे व्यर्थ भासले
त्या गीताविण, त्या सूराविण
किती युगे ती उलटून गेली
अर्थशून्य मी जगले जीवन

अपराधी मन घेऊन वारा
त्या सूरांना पुन्हा शोधतो
अव्यक्त प्रीतीच्या मूक क्षणांचा
तोच एकटा साक्षी असतो
तोच एकटा साक्षी असतो

जयश्री

No comments: