Sunday, August 06, 2006

अस्तित्व

कधी कधी मन उगाचच नको त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंतल्या जातं. स्वत:चं अस्तित्व शोधण्याचा एक चाळा म्हणा हवं तर......! पण सगळं शोधून झाल्यावर कळतं की ह्याची काही गरजच नव्हती मुळी. आपण आपल्या प्रेमळ गोतावळ्यातच आहोत गुरफ़टलेले आणि स्वतंत्र अस्तित्वाची अजिबात गरज नाहीये. आता हे झालं माझं मत...........बघा पटतंय का ?


अस्तित्व

झगडतं मन स्वत:शी
मी म्हणजे कोण
काय ओळख माझी
उत्तरं येतात बरीच
पण खरी मी कुणाची
कायम कुठल्यातरी नात्यात अडकलेली
की कधी होते मी माझी स्वत:ची.....?

कळती झाले जेव्हा,
होते फ़क्त लाडकी लेक आईबाबांची
त्यांच्या सुरक्शित पांघरुणात
कित्ती कित्ती सुखात
हळूहळू सखे सवंगडी आले जीवनात
आणि रमू लागलं मन
एका वेगळ्याच विश्वात
आईबाबांचं ते कवच होतंच
पण अंगण आता झालं होतं
रंगीत...... खुळावलेल्या ढगांचं
कुणाची होते तेव्हा मी........
माझी.......ऊं हू.......नक्कीच नाही.

वेळॆवारी झालं लग्न
बायको झाले त्याची
आई झाले दोन गोजिरवाण्या बाळांची
पण माझी मी कुठे होते........
त्या गोड किलबिलाटात स्वत:ला
हरवून बसले होते.

पाखरं झाली मोठी
उडून गेली आपापल्या जगात
फ़क्त दोघंच उरली त्या
छोट्याशा घरट्यात
तो अन मी.
कुणाची होते तेव्हा मी
माझी......... ऊं हू.....

तेव्हाही मी माझी नव्हतेच
होते त्याची, फ़क्त त्याची
पण आता मनातलं हे प्रश्नांचं वादळ मात्र शमलेलं
चारही किना-यांवर आदळून विसावलेलं.
मी पणाची जाणीवही संपलेली.
उरलीये ती फ़क्त त्याची सखी
त्याच्यासाठी जगणारी
अस्तित्व स्वत:चं विसरलेली.

1 comment:

प्रमोद देव said...

हे 'मी'पण विसरणे सर्वात कठीण आहे.स्त्रीच्या वास्तवाचे अतिशय मार्मिक वर्णन केले आहे.अगदीच काही नाही तरी 'क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळची माता' हे वास्तव तिला जखडून ठेवत असते.
कविता आवडली.