Thursday, September 03, 2020

झाला हा परिहास म्हणू

भास म्हणू, आभास म्हणू की आला हा दिन खास म्हणू
काय म्हणू या सुखद क्षणांना, आला हा मधुमास म्हणू ?

काजळरात्री कृष्ण तटावर, यमुनेवरती साद पुन्हा
वेड म्हणावे की हृदयाला कृष्णाचा हा ध्यास म्हणू   

विरह म्हणू की शिक्षा होती अपराधांची त्याच जुन्या
जीवन झाले पूर्ण म्हणू की झाला हा वनवास म्हणू

ओढ किती ही, अंतर मिटले रामाचा मी खास जणू
आस म्हणू की कास म्हणू की, रामाचा मी दास म्हणू

कौतुक झाले, त्रागा त्यांचा, दोषी होतो मीच जणू                
दाद म्हणू की आयुष्याचा झाला हा परिहास म्हणू

जयश्री अंबासकर

 

No comments: