Sunday, September 13, 2020

निर्मळ जगणे जमेल ना

जगलो कायम ऋणात मी, ऋण हे माझे फिटेल ना
आनंदाने कधी तरी, उपभोगाया मिळेल ना

धावत आलो किती पुढे, कोणी उरले सवे अता
मागे फिरता पुन्हा मला, साथी कोणी दिसेल ना

सोडून गेली कशी मला, शोधू आई कुठे तुला
जगणे दुष्कर तिच्या विना, आई फिरुनि दिसेल ना

दु:खी व्हावे किती मना, दु: बघावे किती पुन्हा
पुनरावृत्ती नको नको, शेवट सुखकर असेल ना

आयुष्या रे गणित तुझे, सोडवणे मज जमेल ना
तुकडे सगळे जुळुनि तुझे, कोडे पुरते सुटेल ना

देवा सुंदर तुझ्या परी, मजला हे जग दिसेल ना
झुळझुळ पाण्या परी मला, निर्मळ जगणे जमेल ना

जयश्री अंबासकर

No comments: