Thursday, December 13, 2007

अवगुंठन

ही मायबोलीच्या २००७ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कविता

उगाचंच बिचारी वाटते माझी मी मलाच...
तुझ्याशिवाय....
सगळंच तुझ्या अवगुंठनात बांधलेलं
सोडवू म्हटलं तर अजूनच आवळणारं
कसा घेणार रे मी मोकळा श्वास...
कसली होतेय तडफड... कळतंय का तुला काही
तुला कधी ते समजणारच नाही
तुला भेटायची ओढ
आणि तू जाताना दाटून आलेले कढ...
तुझी बेफ़िकीरी मात्र तश्शीच !
राग राग येतो अगदी...
चिडलेली छान दिसतेस म्हणे ......

....
बोलतानाही तेच
सगळं मीच डोळ्यातून वाचून काढायचं
माझेही शब्द माझेच आणि तुझेही
तू फक्त डोळ्यांनी बोलणार
बडबड फ़क्त माझीच
.....
आता मी सुद्धा बोलणार नाहीये
ठरवलंच आहे मी तसं........
......
...
अरे पण हे काय ...
तू रडतो आहेस....
मी बोलावं म्हणून .... ?
जे जे तू बोलावंस असं वाटायचं
ते आता बोलतो आहेस......
.....
..
उशीर केलास रे जानू.......
.....
आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस
तुला माहितीये ना....
मला मोगरा आवडतो ते...
कधी सुधारणार आहेस रे राजा...

जयश्री

Wednesday, November 28, 2007

उपेक्षित

का वाटतं इतकं निराधार.......
शब्दांशिवाय....
ते सुद्धा मुद्दाम करतात अडवणूक
जाणूनबुजून....
मला हतबल होताना बघून,
विजयोन्मादानं अधिकच उधळतात
त्यांना गोळा करण्यातच थकायला होतं
हातात आलेल्या चार-पाच शब्दांचीच जुळवाजुळव करावी तर....
तेच अंगावर येतात
मी गुदमरते....
याचकासारखी हात पसरते
भीक नकोय....
माझेच हवेत मला
....
..
पण माझ्या दुबळ्या हाकेला दुर्लक्षून
ते सरळ निघून जातात
आणि मी ....
मी रहाते तशीच उपेक्षित !
नि:शब्दातून व्यक्त व्हायची सवय करायला हवी आता....

जयश्री

Tuesday, November 27, 2007

नव्हाळी

प्रीत ही जुनी जरी, रीत ही नवी नवी
जोड हा जुना जरी, ओढ ही नवी नवी

खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा
वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा

शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे
गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे

गीत हे जुने जरी, संगीत हे नवे नवे
गुंतणे जुने परी, सावरणे नवे नवे

गोडवा जुना जरी, स्वाद हा नवा नवा
वेग हा जुना जरी, आवेग हा नवा नवा

ताटवा जुना जरी, गंध हा नवा नवा
तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा

बरसणे जुने जरी, भिजवणे नवे नवे
बहर तो जुना जरी, फ़ुलवणे नवे नवे

साद ही जुनी जरी, गवसणे नवे नवे
समजणे जुने जरी, उमजणे नवे नवे

जयश्री

Monday, November 12, 2007

पुत्रकामेष्टी

बोलायचंय खूप... पण.... शब्दच आटलेत
कधी कधी ह्या कुबड्‍या सुद्धा अगदीच अधू होतात
आधाराच्या ऐवजी पांगळेपणच देतात
आणि मग चिडचिड होत रहाते आतल्या आत
आतली धुमस, घुसमट बाहेर पडायला हवीये आता
कुठल्याही भावनेला पुरुन उरणारी....!
संवेदनेच्या पलीकडलं काहीतरी आत रुजतंय....... वाढतंय
आणि तटतटून बाहेर यायचा प्रयत्न करतंय
पण कसं येणार बाहेर...
ह्या वांझपणातून कोण सोडवेल आता
कुणा दुर्वासाचा वर.....
की करावा लागणार पुत्रकामेष्टी यज्ञ ...!

जयश्री

Tuesday, May 22, 2007

हुंदका साधा तुझा


हुंदका साधा तुझा सांगून गेला
झाकलेली वेदना बोलून गेला

पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी पाऊस का बरसून गेला

सावरु मी हा कसा संसार माझा
मांडलेला डावही उधळून गेला

प्रीत माझ्या अंगणी बहरेल कैसी
कोवळा मनमोगरा करपून गेला

ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला

वावडे होते जरी मैफिलीचे
सूर का मग आगळे छेडून गेला

मी अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला

वाट माझी राहिली अंधारलेली
तो स्मृतींचे काजवे उजळून गेला

जयश्री अंबासकर
३०.३.२००७




Friday, April 13, 2007

सारे तुझ्यात आहे

आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे

तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे

ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे

स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे

संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्‍यात आहे

ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे
गाफ़ील यौवनाची संपूर्ण मात आहे

जयश्री

Saturday, April 07, 2007

मोहर नात्याचा

मोहर नात्याचा

का गुंतत जातो आपण
नात्याच्या गुंत्यात
का आवळत जातो गाठी
अपेक्षांच्या बंधनात

नात्याचा हा नाजूक बहर
कोमेजत जातो नकळत
अपेक्षांच्या ओझ्यानं
झडत जातो नकळत

नातं मनसोक्त फुलू द्यावं
रानफुलासारखं
मोकळं त्याला विहरु द्यावं
स्वच्छंदी पाखरासारखं

नाती नकोत मौसमी
भूछत्र्यांसारखी
कायम हसत बहरावी ती
गुलमोहरासारखी

नकोत फुलं भरमसाठ
नात्याच्या ताटव्यात
डौलदार तुरे मात्र
हमखास असावे त्यात....!

जयश्री

Monday, April 02, 2007

असेच काही घडून यावे

निवांत संध्या हवा नशीली
असे बहाणे मिळून यावे
खट्याळ लाटा गळ्यात गाणी
असे तराणे जुळून यावे

भल्या पहाटे कधी तरी तू
लपून यावे, जपून यावे
तरंग माझ्या मनी उठावे
असेच काही घडून यावे

गुलाब गाली फुलून यावे
दवापरी मी टिपून घ्यावे
सवाल सारे विरून जावे
असेच काही घडून यावे

तुझ्या सवे या फितूर गात्री
नवेच गाणे सजून यावे
पुन्हा पुन्हा मी जगून घ्यावे
असेच काही घडून यावे

जयश्री

Friday, March 30, 2007

नवरस

नवरसांचा हा आविष्कार घडवून आणला आमच्या महाराष्ट्र मंडळानं. आमच्या वार्षिक संमेलनाची नवरसाची थीम मी अशी शब्दबद्ध केली. संगीतबद्ध केलं होतं विवेक काजरेकरांनी आणि गायक विवेक आणि मी.

तुम्ही ऐकूही शकता इथे

शृंगार रस
शृंगार मी प्रेमी जीवांचा

मीत हृदयी रुजवतो
स्पंदनातून इश्क पसरुन
मीलनी मी बरसतो

स्वप्नील मी, मदहोश मी
लाज-या प्रीतीत मी
साक्ष प्रणयाचीच मी अन्‌
चांदव्यातील आग मी

भयानक रस
उरी धडधड जागते अन्‌
कापते का ही तनू
प्राण का कंठास येतो
बोबडी वळते जणू

अस्तित्व माझे हे असूरी
जागवी भय अंतरी
उडे गाळण ही भल्यांची
दृष्टी टाकीन मी जरी

हास्य रस
तुषार माझे उडती जेथे

सुहास्य तेथे खळाळते
चैतन्याचे अल्लड वारे
मनी मानसी सळसळते

भेदभाव ना कोणासाठी
राजा रंका मी न वेगळा
दु:खाला तो नाही थारा
आनंदाचा सर्व सोहळा

बीभत्स रस
ओंगळवाणे रुप लाभले
बघुनी मला जन शहारती
नको वाटते दर्शन माझे
टाळून मज परी ते जाती

घृणाच सारी माझ्या पदरी
एकांताची साथ मला
तिरस्कार मी सदा झेलतो
बीभत्स म्हणती सर्व मला

करुण रस
नजर ओली, उरी हुंदका

मनात देवाचा धावा
दोन जीवांची विरही तगमग
तिथेच माझा जन्म नवा

दु:खाशी मी जरी जखडलो
मृत्यूशी झुंजतो सदा
कारुण्याचा सागर मी जरी
डोळे पुसतो मीच पुन्हा

वीर रस
शस्त्र शोभते माझ्या हाती

मीच शायरी वीरांची
रक्त उसळते,पेटून उठते
ऐकूनी गाथा शौर्याची

शूर शिपाई माझे साथी
नाही जागा दुबळ्याला
नको म्यान अन्‌ नको विसावा
रक्त हवे तलवारीला

अद्‌भूत रस
स्वप्नी रमविते, स्वप्नी नेते

बाग फुलविते स्वप्नी मी
झिम्मा खेळत सवे प-यांच्या
गीत गोजिरे गाते मी

जादू, राक्षस, भूत, चेटकी
दुनिया माझी ही न्यारी
भूल पाडते, चटक लाविते
या जगती मी राज्य करी

रौद्र रस
गुलाम माझी सारी दुनिया

सैतानाचा साथी मी
हाहाकार मी उडवून देतो
दिसेल ते ते तुडवून मी

आगमनाची नांदी माझ्या
देई दर्शन भयकारी
समोर येईल त्याला चिरडून
तांडव करितो उरावरी

शांत रस
अवनीवरचा दूत शांतीचा

आश्रय देतो सकल जना
हारुन दु:खे जगताची मी
सांत्वन देतो श्रांत मना

ओंकाराचे संजीवन मी
भक्तीरसाचा मी दाता
पखरण करतो वात्सल्याची
तिन्ही जगाचा मी त्राता

जयश्री

Wednesday, March 28, 2007

बुरख्यातला सूर्य

काल अचानक माझ्यासमोर अगदी टिपिकल सौदी बायका आल्या..... नवर्‍यासोबत अगदी दबून असलेल्या. त्या नवर्‍याच्या चेहर्‍यावर इतकी मग्रुरी होती ना. जणू काय त्या सगळ्या बायका त्याची मालमत्ता होती आणि त्याला जसा हवा तसा वापर तो करु शकत होता. त्या बायकांचे वाकलेले खांदे, झुकलेल्या नजरा बघून अगदी कसंतरीच झालं आणि मनात विचार आला.......

बुरख्याआडच्या वेदना... गुरफटून राहतात तशाच
सोन्याचा मुलामा चढवून...मिरवत राहतात अशाच
तेलाच्या खाणीतलं ऐश्वर्य जगापुढे दाखवताना
पैसा आणि मग्रुरीच्या कैफ़ात दुनियेला झुकवताना
दुर्लक्ष करतात........
त्या काळ्या बुरख्याआड चिणून टाकलेल्या संवेदनांकडे....
दाबून टाकतात ते सारे उसासे.
छोट्याशा डोळ्यांच्या फटीतून... कावर्‍याबावर्‍या नजरा
भिरभिरत राहतात फ़क्त
सवयच होऊन गेलेली त्यांच्या उमाळ्यांना
दबून रहायची.
त्या छोट्याशा फ़टीतूनच अनुभवायची दुनिया.
बुरखे सुद्धा काळेच
पुरुषी अहंकारासारखे...!
कुठल्याही रंगाच्या भावनेला काळवंडून टाकणारे.
त्या उदासी आवरणाला आता रंगाचंच वावडं झालेलं...
फुलण्याची....खुलण्याची स्वप्नंच करपलेली....
वखवखलेल्या वासनेची पूर्ती.....हे एकच काम उरलेलं,
बुरख्यावरची जरतारी कलाबतूच काय ती थोडी हसते
बाकी सगळं भकास.....!
कधीतरी एखादी ठिणगी ह्या काळ्याशार अंधारात....
पेटून उठेल... आणि उजळेल आसमंत थोडावेळ....!
अशी आशा तरी जागत असेल हा ह्यांच्या मनात....?
की ह्या अंधाराची सोबतच आता त्यांना हवीहवीशी वाटत असेल....
नुसतेच प्रश्न.....!
जितक्या जमिनी, तितकेच अंधार
पण उगवणारा सूर्य एकच.
तो कितीसा पुरणार सगळ्यांना....!
आता अंधारालाच पेटून उठावं लागणार आहे कधी ना कधी
फाडून टाकावे लागणार आहेत....स्वत:चे बुरखे स्वत:च
आणि जन्माला घालावा लागणार आहे आपला स्वत:चा सूर्य !

Sunday, March 25, 2007

कळले कधीच नाही

माझा कुणा म्हणू मी
कळले कधीच नाही
का जाहले तुझी मी
कळले कधीच नाही

माझाच वाटला तू
कित्येकदा परंतु
होतास दूर का तू
कित्येकदा परंतु

सर्वस्व मानिले मी
सखया मनी तुला रे
गेलास सहज कैसा
तोडून पाश सारे

रमते अजून मी रे
स्वप्नात त्या दिसांच्या
जगते अजून मी रे
प्रीतीत त्या जुन्या का

मज रीत या जगाची
कळली कधीच नाही
माझा कुणा म्हणू मी
कळले कधीच नाही.....

Wednesday, March 21, 2007

जीवनरंग

बंधन कुठले नको वाटते
पाश नको ते कोणाचे
मुक्त मोकळा श्वास हवा मज
नकोच दडपण कोणाचे

नको काळजी, नकोच चिंता
नको लढाई दुनियेशी
नको दु:ख अन्‌ नको उसासे
नको लढाई पैशाशी

अजब मागणे जगावेगळे
ऐकून हसला मनामधे
"तथास्तु'" म्हणुनी गुप्त जाहला
देव दाटशा धुक्यामधे

सुखी जाहले वाटे मजला
मनापरी घडता सगळे
सुख परंतु डाचत होते
कारण मज ते का न कळे....

विचार करता गूढ उकलले
शांती झाली चित्ताची
बंधनातले सुख आकळले
किंमत कळली पाशाची

नयनी पाणी दुस-यासाठी
हास्य तयांच्या सुखामधे
कळले मजला हिच जिंदगी
व्यर्थ गुंतणे स्वत:मधे

बेचव दुनिया फ़क्त सुखाची
दु:खाने गोडी वाढे
दु:खानंतर येता सुख ते
जगण्याला मग रंग चढे

जयश्री

Friday, March 16, 2007

उन्मुक्त तू

देहफुले उमलवून
मुक्त तू उन्मुक्त तू
तूफानी प्रीत सरी
उधळूनी रिक्त तू

झेलूनी तुझा प्रपात
नखशिखान्त नाहते
प्रणयाचा मी मरंद
मनमुराद चाखते

दाहक कोसळ तुझा
उतरतो नसानसात
मदहोशी पसरते
गात्रातून अंतरात

वितळते मिठीत मुग्ध
बेहोषी धुंद धुंद
उन्मेषी श्वासांची
लयकारी मंद मंद.

जयश्री

Wednesday, March 07, 2007

तुझ्याविना हा पाऊस

तुझी इतकी सवय झालीये ना......... की कुठलाही रंग तुझ्याविना अगदी बेरंग असतो. त्यात पाऊस तर आपल्या दोघांचाही आवडता. किती मनसोक्त आस्वाद घेतलाय ना आपण ह्या पावसाच्या स्वच्छंदीपणाचा....! पण आज तू नाहीयेस........ आणि नेमका तो आलाय रे..........

तुझा हळवा पाऊस
आज आठवतो मला
चिंब सरीनं तयाच्या
आज भिजवतो मला

कधी बरसणं तुझं
रिमझिम अलवार
नखशिखान्त भिजते
त्यात मी रे हळुवार

कधी तुफानी कोसळ
गरजत बरसत
कधी झिम्माड झिम्माड
द्वाड प्रीत फुलवत

आता कधी रे येशील
मनी सारखा सवाल
घन दाटता नभात
पुकारते वेडी प्रीत

तुझ्याविना हा पाऊस
आसू आणतो डोळ्यात
धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात

जयश्री

Wednesday, February 28, 2007

मन

मन म्हणजे काय हे अजून कोणालाच उमगलेलं नाहीये. प्रत्येकाचं मन वेगळं ! पण कशाला हवा तो खटाटोप मनाला जाणून घ्यायचा....? मनाच्याच रंगात रंगून जाऊन....... मस्तपैकी आयुष्य रंगीत बनवायचं :) अजून काय....!

मन उनाड पाखरु
त्याची कशी भिरभिर
उडे क्षणात नभात
कधी सूर पाचोळ्यात

मन मोठं सुपापरी
कधी ससा तो सानुला
कधी आकळे सकला
कधी नाकळे कुणाला

मन रंगांची भिंगरी
खुले इंद्रधनुपरी
कधी उदास एकली
भासे सावळी सावळी

सोडवावे कशाला हे
कोडे मनाचे मनाचे
न्हावे रंगात तयाच्या
गीत गावे त्या रंगाचे

जयश्री

Sunday, February 18, 2007

प्रीत

प्रीत हुरहुर
प्रीत काहुर
हरखली प्रीती

प्रीत आठव
प्रीत आर्जव
मोहरली प्रीती

प्रीत दुखरी
प्रीत हसरी
बहरली प्रीती

प्रीत वेदना
प्रीत सांत्वना
रुजली ही प्रीती

प्रीत कातळ
प्रीत वादळ
शहारली प्रीती

प्रीत अपेक्षा
प्रीत उपेक्षा
कोमेजली प्रीती

प्रीत मृगजळ
प्रीत हळहळ
कळली ना प्रीती

जयश्री

Saturday, February 10, 2007

विजेता

नाचती ही प्रश्नचिन्हे
फेर धरुनी का अशी
ऊरी धडधड, श्वास अवघड
बावरी मी का अशी

जीवनाच्या हर सवाला
सहज उत्तर मी दिले
लाभले जे हसत खेळत
आजवरी स्विकारीले

आज मग का मी निरुत्तर
आज का मी पांगळी
का सुचेना मार्ग काही
आज मी का वेगळी

जोर माझ्या मनगटी
माघार ना मी घेतली
खेळ रडीचा जाहला
तेव्हाच नियती जिंकली

हार कधीही मानली ना
आसवे गाळून मी
सावरोनी घाव उरीचे
बाजी हर जिंकेन मी

संघर्ष माझा मित्र आता
आज नियती अंकिता
मात तुज्ला देऊनीया
मी विजेता...मी विजेता

रडविले मज हर घडी तू
नाही विझणे हे अता
ताठ आहे, ताठ राहीन
मी विजेता, मी विजेता.

जयश्री

Friday, February 02, 2007

तगमग

मन आतूर आतूर
त्याला कशाची ही भूल
काय बाई आज व्हावे
मन आतूर आतूर

ओठी सलज्ज कमान
हसू होई छान स्वार
वाट पाहतं कोणाची
मन आतूर आतूर

वारा बावरा छळतो
छेड उगाच काढतो
म्हणे जरा तू सावर
मन आतूर आतूर

गंध ओळखीचा येई
गूढ उकलून जाई
लोचनात का हे नीर
मन आतूर आतूर

पायरव येता कानी
खुळावतो जीव वेडा
दारी दिसता साजण
सडा घालतो मोगरा

आता मन हे अधीर
मन आधीर अधीर

जयश्री

Saturday, January 27, 2007

झाड वयात आलेले

मायबोलीवर "झाड वयात आलेले" ह्या ओळीवरुन चक्क जुगलबंदी झाली होती....त्यातला हा माझा सहभाग..........

रंगसोहळा झाडाचा
नेत्र अनिमिष झाले
दृष्ट लावू नका कोणी
झाड वयात आलेले

जाग हळू पानी आली
सारे जग धुंद झाले
यौवनाचा भार साहे
झाड वयात आलेले

कशा परी लपविते
सोनसळी हा बहर
नेत्री साठवते तुझे
झाड वयात आलेले

नको भिती या ग्रीष्माची
नको बावरु असा तू
ऊन जपेल जपेल
झाड वयात आलेले

कळी कळी फुलारली
पान पान हे लाजले
फांदीतून उमटले
सूर गोड ते गोजिरे

काय विपरीत झाले
काय विपरीत झाले
अहो....... झाड वयात आलेले
झाड वयात आलेले

जयश्री

Saturday, January 20, 2007

ओंजळ माझी

भिजलेल्या मनाचा गहिवर
कंठातून दाटून येतो
आणि मग आसवांचा पाऊस
अनावर होतो

मुकेपणा नाही रे त्याला
बांध फुटून कोसळतं सारं
फक्त तूच हवा असतोस त्यावेळी
बाकी व्यर्थ असतं सारं

रुजलास इतक्या खोलवर
अगदी वटवृक्षासारखा पसरलास
प्रत्येक पारंबीच्या मूळाशी तुझा
एक विलक्षण इतिहास

आठवक्षणांची ओंजळ माझी
तुडूंब, काठोकाठ भरलेली
एकही क्षण झिरपू नये म्हणून
कायम जीवापाड जपलेली

जयश्री

Thursday, January 18, 2007

चांदणे प्रीतीचे

हा चंद्र....... आकाशभर विखुरलेलं पौर्णिमेचं चांदणं काही माझा पिच्छा सोडणार नाहीयेत आयुष्यभर....! हे जीवघेणं चांदणं........!

साक्षीने पुनवेच्या
साथीने सखयाच्या
जागविते रात्र मी
चांदण्यात प्रीतीच्या

पांघरते चांदवा,
गंध रातराणीचा
मोहरते मी फ़िरुन
चांदण्यात प्रीतीच्या

चांदरातीची नशा
खुलविते ही निशा
भिजते मी नखशिखान्त
चांदण्यात प्रीतीच्या

जयश्री

Tuesday, January 16, 2007

पुनवरात

धुंद तेच चांदणे
हवेत तोच गारवा
शिरशिरी तशीच का
जागते उरात या

पाकळ्यात उमलती
रंग तेच लाजरे
अंतरात फुलविती
तशीच फुलपाखरे

गंध तोच दरवळतो
अल्लड वार्‍यासवे
तसाच श्वास उसवतो
कोवळ्या कळ्यांसवे

मंतरल्या त्या क्षणात
अजून जीव घुटमळे
पुनवराती आज का
मजसी चांदणे छळे

जयश्री

Saturday, January 13, 2007

सूर्यास्त

का लागली दृष्ट तेजोनिधीला
अवेळी कसा आज सूर्यास्त झाला

अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा
शरण भास्करा तू निशेला कसा

बांधुनी पैंजणे सावळ्या सावल्यांची
कशी सांज निमिषात उतरुन आली

अंधार डोही धरा दीनवाणी
कशी भासते आज केविलवाणी

कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची
आस वेड्या जीवाला नव्याने उषेची

जयश्री

Tuesday, January 09, 2007

तू आलास.........?

दाटल्या कंठातूनी ना शब्द काही उमटले
सावळ्या डोळ्यातूनी आभाळ सारे बरसले

पायरव ऐकावयासी, चित्त का आसूसले
उंब-याशी का असे, पाऊल माझे अडखळे

अंगठ्याशी नजर का ही, पदर हाती घुटमळे
मीत मनीचा दारी असता, लाज का ही मज छळे

पापण्यांची ओल सांगे, वेदना विरहातली
शिरशिरी स्पर्शून गेली, अंतरी भेटीतली

लक्ष्य ज्योती उजळती, नयनी अशा का बाव-या
गाली फ़ुलती हास्य कलिका गोजि-या अन्‌ लाज-या

दूर जाता तू सख्या आयुष्य होते थांबले
नव्हतास जेव्हा जवळी तू, जगणेच होते विसरले

जयश्री

Saturday, January 06, 2007

ये ना रे.......!

झालाय अनोळखी काहीसा, जागर तुझा मनातला
अन्‌ परका बराचसा, वावर तुझा मनातला

पुन्हा पुन्हा छळतो सवाल... व्याकुळ मनातला
कसा हरवला माझा सखा... माझ्या मनातला

कसा हा सांधायचा दुवा मनातला
कसा पुन्हा बांधायचा पूल मनातला

तूच फक्त काढू शकतोस, किंतु मनातला
तूच फ़क्त पेटवू शकतोस, दिवा पुन्हा मनातला

तुझ्या येण्याने उजळेल... तिमिर मनातला
तुझ्या स्पर्शाने बहरेल... वसंत मनातला

जयश्री

तू असा

अस्सा आहेस ना तू.......

तू दिलेली फुलं
तशीच आहेत अजून
आसमंत ही गंधित तसाच
तुझं अस्तित्व रेंगाळून

झुळूकीसारखा येतोस
मला फ़सवून
श्वास मात्र माझा
जातोस उसवून

सारं काही बोलतोस
भावस्पर्शी डॊळ्यातून
गात्रं जागवतोस
रेशीम स्पर्शातून

फुललेले क्षण सारे
ठेवलेत मी जपून
वाट पाहते पुन्हा
तशीच मोहरुन

जयश्री

Tuesday, January 02, 2007

स्वयम्‌

कंटाळलास एकटेपणाला.... ?
मग त्या दीपस्तंभाचं काय
काजळलेल्या रात्री तोच दाखवतो ना दिशा,
एकाकीपण सोसूनही....
तूच आहेस तुझ्या आयुष्याचा दीपस्तंभ
इतक्या तारुंना वाट दाखवलीस
आणि आता स्वतःच हरवलास....
तो अढळ धृवतारा बघितलास ना
दिमाखात असतो रे तो सुद्धा
त्याला नसेल जाणवत एकटेपण....
तो सुसह्य करतो आपली वाटचाल
अंधा-या रात्रीलाच सोबत करुन.
तू स्वयंप्रकाशी भास्कर आहेस
रात्रीचा दिवस तूच करु शकतोस
झाकोळलेली वाट तूच उजळू शकतोस
एकाकीपण कुरवाळायला वेळ कुठे आहे तुझ्याकडे....
कितीतरी रात्री संपवायच्या आहेत
कितीतरी दिवस उजळायचे आहेत
उगवणा-या प्रत्येक दिवसाची
एक सुरेल मैफ़िल करायची आहे
पेटवायच्या आहेत दाही दिशा
अंतरीच्या तेजोमृताने
आणि व्यापून टाकायचा आहे हा संपूर्ण आसमंत
तुझ्या अस्तित्वाने
जयश्री

Monday, January 01, 2007

वाट तुझी पाहते

वाट तुझी पाहते
मनातल्या मनात मी
प्रीत तुझी पांघरते
कोवळ्या उन्हात मी

फ़ुलाफ़ुलात पेंगते
रात्र अजून कालची
स्वप्नातून थकलेली
गात्रं अजून कालची

दवात न्हाऊनी पहाट
गोड गोड लाजते
मनातली तुझी नशा
नसानसात उतरते

पाहतोस अंत का
आर्जवे करु किती
प्रसन्न ह्या सकाळची
वाट पाहणे किती

जयश्री