Wednesday, April 04, 2018

रात्री


परतून येती अशा मुक्त रात्री
कशाला हवी शिस्त बेशिस्त रात्री

नवा गोड अपराध  होणार आहे
नको आज चंद्रा तुझी गस्त रात्री

कशी नोंद करतेस माझ्या गुन्ह्यांची
सजा हर गुन्ह्याची कशी फक्त रात्री

इथे गर्द काळ्या किती संथ रात्री
तिथे मात्र होत्या तुझ्या व्यस्त रात्री

नव्याने पुन्हा भेट व्हावी तुझ्याशी
नवे जागणे अन् नव्या तृप्त रात्री

जयश्री अंबासकर
३.४.२०१८

Tuesday, April 03, 2018

पसंत आहे


सत्य लख्ख मूर्तिमंत आहे
अन्‌ म्हणून नापसंत आहे

फोल वायदा उगाच केला
प्रश्न केवढा ज्वलंत आहे

नूर आज चांदण्यात नाही
कृष्ण सावळा दिगंत आहे

थांब मी जरा जगून घेतो
जीवना तुला उसंत आहे ?

घे शिकून तू जमेल ते ते
नादब्रम्ह हे अनंत आहे

माय माउली जिवंत नाही
फक्त एवढीच खंत आहे

घाव झेलले असंख्य तरिही
हासरा मनी वसंत आहे

जयश्री अंबासकर
३१.३.२०१८

Sunday, April 01, 2018

चंदन



पोर एकलीच होती
घनदाटशा रानात
रान पाखरांच्या सवे
होती अतीव सुखात

कधी ऊन ऊबदार
कधी वारा घाले मिठी
कधी हळवा पाऊस
फिरे तिच्या पाठीपाठी

रानाबाहेर पडले
जेव्हा चुकून पाऊल
सार्‍या जगाला लागली
तिची सुगंधी चाहुल

आले हुंगत हुंगत
लांडगे शहरातले
सुख आयुष्याचे तिच्या
एका क्षणात संपले

रान कावरेबावरे
दृष्ट लागली कुणाची
चंदनाचे हे प्राक्तन
भिती सदा विळख्याची

जयश्री अंबासकर

Saturday, March 31, 2018

लाजत नाही



आळस भारी कसरत नाही
कंबर म्हणते वाकत नाही

आभाळाशी झाली कट्टी
पाउस हट्टी बरसत नाही

पाटया सगळ्या कोर्‍या होत्या
पाढे कोणी गिरवत नाही

ओंजळ झाली इतकी छोटी
अर्घ्यच सूर्या पोचत नाही

तू तू मैं मैं होते कारण
नवरी आता लाजत नाही

फॅशन कसली ओंगळवाणी
उघडी काया झाकत नाही

फेसबुकावर वावर सारा
दोस्तच हल्ली भेटत नाही

जयश्री अंबासकर

Thursday, March 29, 2018

सगळ्यात सुंदर माझीच आई



श्रीमंत वावर माझीच आई
करतेय सादर माझीच आई

शाही सवारी करते स्कुटरवर
तरुणी निरंतर माझीच आई

दमुनी उन्हाचा दारात कोणी
देणार भाकर माझीच आई

दुलईत घेई सार्‍या जगाला
मायेचि पाखर, माझीच आई

पोळून आले जेव्हा कधी मी
हळुवार फुंकर माझीच आई

सार्‍या घराची तृप्ती करूनी
खाणार नंतर माझीच आई

कशिदा असो वा स्वेटर नि शाली
विणणार झरझर माझीच आई

दुखले कुणाचे थोडे तरीही
होणार कातर माझीच आई

काया तिची ना थकते कधीही
जात्याच कणखर माझीच आई

समस्या असो वा दुविधा कितीही
हमखास उत्तर माझीच आई

तेजाळ ज्योती परि भासते ती  
सगळ्यात सुंदर माझीच आई

देणेच देणे नाही अपेक्षा
साक्षात ईश्वर माझीच आई

जयश्री अंबासकर


Tuesday, March 27, 2018

तुलाही मलाही



विरक्ती जराशी तुलाही मलाही
शिसारी सुखाची तुलाही मलाही

विचारे न कोणी जराही खुशाली
भिती गुंतण्याची तुलाही मलाही

पुन्हा दंश व्हावे विषारी विखारी
चटक या नशेची तुलाही मलाही

गुन्हे पंचक्रोशीत भरपूर केले
सजेची न भीती तुलाही मलाही

बहरल्या सुखाने किती चांदराती
सवय जागण्याची तुलाही मलाही

नव्याने झगडलो पुन्हा जीवनाशी
निराळीच तृप्ती तुलाही मलाही

जुन्या वेदनांचेच जखमी किनारे
तरी ओढ त्यांची तुलाही मलाही

उभी रास केली रित्या शिंपल्यांची
गवसले न मोती तुलाही मलाही

तुझी बेफिकीरी, दिशाहीन मी ही
न चिंता जगाची तुलाही मलाही

फुले मोगरा अन्‌ फुले रातराणी
कशी नीज यावी तुलाही मलाही

कितीदा वहाव्या पखाली गुन्ह्याच्या  
नसे खंत त्याची तुलाही मलाही

नको भेटणे ते दुपारी बिपारी
सवय ना उन्हाची तुलाही मलाही

हिशेबात नव्हतेच देणे नि घेणे
कशाला उधारी तुलाही मलाही

निरपराध होतो परंतू तरीही
भिती कायद्याची तुलाही मलाही

किती जीवघेण्या किती दीर्घ रात्री
प्रतिक्षा उषेची तुलाही मलाही

जयश्री अंबासकर
२७.३.२०१८

Wednesday, March 21, 2018

काही मला कळेना


तरही मिसरा - भूषण कटककर

सारेच मित्र होते, एकांत का टळेना
(माझ्याशिवाय कोणी, माझ्याकडे बघेना)

कोट्यावधी कमवला, पैसा, जमीन, जुमला
उपभोग ह्या सुखाचा, घेणे मुळी जमेना

वाटेत भेटलेले, टाळून सर्व गेले
मदतीस मात्र कोणी अजिबात सापडेना

सलगी करुन गेला, तू सूर छेडलेला
आले कशी समेला, काही मला कळेना

नजरेत ओल होती, हृदयातही उबारा
आधार का कुणाचा, होणे मुळी जमेना

जयश्री अंबासकर





Wednesday, May 20, 2015

तुझ्यामुळे

आज चांदणे भरात आहे तुझ्यामुळे
आज पौर्णिमा मनात आहे तुझ्यामुळे

मंद गारवा हवेत आहे जरा जरा
रात्र वाटते खुशीत आहे तुझ्यामुळे

आज सावरु नकोच ना रे सख्या मला
आसमंत हा नशेत आहे तुझ्यामुळे

रंग तू मला दिलेस इतके नवे नवे
इंद्रधनुष ही कवेत आहे तुझ्यामुळे

श्वास बावरा उरात धडधड पुन्हा पुन्हा
कैफ केवढा जिण्यात आहे तुझ्यामुळे

जयश्री अंबासकर

Monday, December 15, 2014

तो माझा (?)



तो आला अन्दारी माझ्या बरसुन गेला
गोड गुलाबी संमोहन तो पसरुन गेला

माझा होता, केवळ माझा होता जेव्हा
बाकी नाती होता तेव्हा विसरुन गेला

रमले होते संसाराच्या खेळामध्ये
नाही कळले डाव कधी तो उधळुन गेला

नाते ताजे उरले नाही बाकी आता
आठव का मग श्वासांनाही उसवुन गेला

काळोखाची ओळख गहरी झाली होती
कां तो येवुन अंतर माझे उजळुन गेला

दरवळ सरला, सुकल्या होत्या माझ्या बागा
हलका शिडकावा का मजला फुलवुन गेला

जयश्री अंबासकर

Tuesday, February 04, 2014

ओली सांज

सांज उतरती ओली
का लावुन हुरहुर जाते
मन गाभा-यात कशाचे
काहूर पेटवुन जाते

अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण

संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
गतवैभव स्मरुनी सारे
ढाळती आसवे मंद

काळोखाचा विळखा मग
अधिकच काळा होतो
वाटते निसटले सारे
अन्‌ जीव घाबरा होतो

उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा


जयश्री अंबासकर