Friday, March 08, 2013

अळी मिळी गुपचिळी


सगळं होतंय ना मनासारखं
मग झालंय काय चेहेरा पाडायला ?
प्रश्न तेच पुन्हा पुन्हा...
सुख बोचतंय..... दुसरं काय...
उत्तरंही तीच.... त्यांचीच
पण बोलणार नाही मी...!!
का सगळं बोलून दाखवायचं...
का सगळं उघडून दाखवायचं...
मीच माझं कुलूप उघडायचं,
आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं.
मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार
मीच ती गोळा करायची
माझ्यासाठी....... ??
छे; कशाला.....
मी नाहीच बोलणार....
......
नकोय मला बिचारेपण
नकोय सहानुभूती
गोंजारतेय हल्ली व्यथांनाच
जपतेय त्यांची intensity  
बरं चाललंय हो आमचं
हल्ली चांगले मित्र मिळणं सुद्धा कठीण झालंय
पण हा दोस्त टिकलाय बराच
बघू किती दिवस देतोय साथ
सध्या तरी रमलेय त्यात
अहो, उसंतच देत नाही तो
बाकी काही करायला
म्हणून तर शिकलेय आजकाल
दु:खालाच गोंजारायला
ट्रेनिंग घेतेय सध्या चेहेरा हसरा ठेवण्याचं.
प्रॅक्टीस कर... नक्की जमेल म्हणाला तो
त्यात काय एवढं .....
मी आणखी काही वेदना देतो.
कित्ती सोप्पंय ..!!.
मी सगळं त्याचं अगदी मनापासून ऐकते
मज्जा येतेय....
निघतेय सोलवटून,
रक्ताळलेय...
पण प्रत्येक थेंबाला आस
आणखी नव्या दु:खाची.
बाकी पाश सारे सुटलेत...
तुटलेत...
कधी......
कळलंच नाही
मीच तोडलेत... ????
की तेच घाबरलेत.....
तुझ्या माझ्या यारीला...
बरंच झालं,
आता नाही येणार प्रश्न कुणाचे
नाही द्यावी लागणार उत्तरंही.
आत राज्य तुझंच...
प्रत्येक डाव तुझाच
खेळ तुझी खेळी
माझी फक्त अळी मिळी गुपचिळी !!


जयश्री अंबासकर


Tuesday, February 19, 2013

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही
मी जगत राहिले पुन्हा पुन्हा, उन्मळले नाही

आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी
पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही

वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही
मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही

शाळेत रोजची चिडाचिडी अन्‌ भांडाभांडी
का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही

का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती
रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही

जयश्री अंबासकर

Thursday, February 14, 2013

उत्सव


Valentine's Day Special :) 

मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी

आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन्‌ काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन्‌ लडीवाळ जराशा

कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ

आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.
 
जयश्री अंबासकर

Tuesday, February 12, 2013

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

गझल सम्राट भीमराव पांचाळेंनी आष्टेगावातल्या गझल संमेलनात प्रकाशित होणार्‍या प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी सुरेश भटांचा एक मिसरा दिला आणि तरही गझल लिहायला सांगितली.

"मज दोन आसवांना हुलकावता न आले"

त्यावरुन ही तरही गझल लिहीली.

आयुष्य राजयोगी, उपभोगता न आले
माझे असून "माझे"संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी, दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयश्री अंबासकर

Tuesday, December 25, 2012

नव्या पिढीचा नवा सूर्य



नव्या वर्षाच्या नवसूर्याचं तेज
नव्या, विचारी, संस्कारी पिढीच्या हातात
ठरवायचं सगळं तुम्हीच
दुबळे, षंढ बाहु की जोर मनगटात

भ्रष्टाचाराच्या गर्तेत भिरभिरायचं 
की पेटवायच्या उत्कर्षाच्या मशाली
ठरवायचं सगळं तुम्हीच
सार्‍या दुनियेचं भवितव्य आहे तुमच्या हवाली 

जुन्या रुढी, परंपरांचं काळं खिन्न आभाळ
की नव्या विचारांची सुंदर, रंगीत सकाळ
ठरवायचं सगळं तुम्हीच
इतिहासाची दलदल की भविष्याची विजयी माळ

पेटून उठायचं अन्यायाच्या ठिणगीतून
की बसायचं पाठीचा कणा मोडून
ठरवायचं सगळं तुम्हीच
उठा....आता चालणार नाही फार उशीर करुन

जयश्री 

Monday, November 19, 2012

नाविन्याची साद

कालचं रोमँटिक वातावरण, अचानक आलेला पाऊस, मित्रांची फरमाईश आणि झालेली कविता ..... :)

सुटला पहाट वारा
अंतरात सळसळ  
मन सुगंधी सुगंधी
पसरला दरवळ
     
नको स्वप्नातून जाग      
नको जाग इतक्यात    
नीज हलके हलके    
पुन्हा आली पापण्यात

कसा मुजोर हा वारा
रेंगाळला खिडकीशी 
पावा मंजुळ मंजुळ
जणु कृष्णाचा कानाशी

मन सैरभैर झाले
वेडावले, खुळावले
कृष्ण रंगाने रंगाने  
चिंब चिंब भिजवले

रेशमाच्या सोनसरी      
आला सोबती घेऊन   
ओला पाऊस पाऊस
ढगातून उतरून

सतरंगी झाले नभ
धरा पाचूने नटली      
ऊन कोवळे कोवळे  
पसरली गोड लाली  

आज सृष्टी देते हाळी
ऐक नाविन्याची साद  
सुख दारात दारात
दे तयाला प्रतिसाद.

जयश्री 

Wednesday, November 07, 2012

ऊन-सावली नाते अपुले



पानावरच्या दवबिंदूपरी
सजते, निसटुनिया विरते
ऊन - सावली नाते अपुले
कधी हसते अन्‌ कधी रुसते

कधी हिरवाईच्या मखमाली
भिरभिरते अन्‌ बागडते
कधी काहिली, कधी होरपळ
कधी पेटुनी धगधगते

कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी
चमचमते अन्‌ लखलखते
कधी गर्द अवसेच्या राती
काळोखातुन पाझरते

लडीवाळ कधी मोरपिसापरी
हळुच कानी कुजबुजते
कधी अनावर प्रपातापरी
दुमदुमते अन्‌ कोसळते

कधी मौनाच्या बंद क्षणांनी
हिरमुसते अन्‌ मुसमुसते
कधी शब्दांच्या पागोळ्यातुन
गहिवरते अन्‌ रिमझिमते

विरहाच्या एकांती नाते
उष्ण आसवांनी भिजते
गंध मोगर्‍या मीलन राती
फुलून गात्री दरवळते

नात्याची ही वेल आपुली
बावरते, कधी सावरते
स्पर्शलाजर्‍या हिंदोळ्यावर
झुलते आणिक सुखावते.

जयश्री अंबासकर

Wednesday, October 31, 2012

दु:ख झाले पाखरू




आज माझ्या वेदनेला
पंख हसरे लाभले
दु:ख झाले पाखरू
अन नाचु गाऊ लागले

भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली

दूर झाले मग सुखाच्या
पाश सारे तोडले
जीव जडला वेदनेवर
दु:ख मिरवू लागले.

भेटते जेव्हा नव्याने
वेदनेला त्या जुन्या
जाग येते जीवनाच्या
मैफिलीला मग सुन्या

जयश्री

Tuesday, May 01, 2012

जुळले अजून आहे


सरले बरेच काही, उरले अजून आहे
तुटले तरी जरासे, जुळले अजून आहे


वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या
वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे


संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या
स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे


वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी
सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे


वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी
सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे


आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे


उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे
वाळूत बांधलेले, टिकले अजून आहे


अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी
दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे


जयश्री

Thursday, April 26, 2012

मोहोळ



















आठवणींचं मोहोळ 
आज फुटलं फिरून
सयी छळती जीवाला
डंख मारून मारून

जुन्या पुराण्या  जखमा
पुन्हा नव्याने सलती 
भळभळा लागे वाहू
जरी खपली वरती

कधी आसूड शब्दांचे
गेले कातडी सोलून
कधी कुणी फसविले
गळा केसाने कापून

घाव वर्मावर झाले
काही काळजाच्या पार
परी दुखावून गेले
सग्या सोयऱ्याचे वार

साऱ्या कटू आठवांचे 
येई मळभ दाटून 
होई चित्त सैरभैर
राही काळोख भरून

ओझे झाले पापण्यांना
काळ्या सावळ्या ढगांचे
कोसळे झडझडून 
मन ऋणी आसवांचे

जयश्री