पानावरच्या दवबिंदूपरी
सजते, निसटुनिया विरते
ऊन - सावली नाते अपुले
कधी हसते अन् कधी रुसते
कधी हिरवाईच्या मखमाली
भिरभिरते अन् बागडते
कधी काहिली, कधी होरपळ
कधी पेटुनी धगधगते
कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी
चमचमते अन् लखलखते
कधी गर्द अवसेच्या राती
काळोखातुन पाझरते
लडीवाळ कधी मोरपिसापरी
हळुच कानी कुजबुजते
कधी अनावर प्रपातापरी
दुमदुमते अन् कोसळते
कधी मौनाच्या बंद क्षणांनी
हिरमुसते अन् मुसमुसते
कधी शब्दांच्या पागोळ्यातुन
गहिवरते अन् रिमझिमते
विरहाच्या एकांती नाते
उष्ण आसवांनी भिजते
गंध मोगर्या मीलन राती
फुलून गात्री दरवळते
नात्याची ही वेल आपुली
बावरते, कधी सावरते
स्पर्शलाजर्या हिंदोळ्यावर
झुलते आणिक सुखावते.
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment