Saturday, April 07, 2018

अंतर



माझ्या आजूबाजूला विखुरलेलं तुझं अस्तित्व ….
तू नसतानाची माझी सोबत !!
कधी दारात, उंबरठ्यावर,
तू ऑफिसला जाताना,
हळूच गालांवर…कधी ओठांवर
रेंगाळलेलं …
कधी बाल्कनीतल्या चंद्रासोबत मधाळलेलं
तर कधी सकाळच्या कॉफीसोबत वाफाळलेलं
कधी संधीप्रकाशात… जगजीतसिंगसोबत जागलेलं
कधी कवितेत हरवलेलं
कधी हातात गुंफलेलं,
सवय झालीये रे खूप…
तुझ्या असण्याची ;
तुझ्या सोबतच्या जगण्याची !
तुझं अस्तित्व घेऊनच जगतेय
तुझ्या पलिकडल्या जगात वावरताच येत नाहीये
मग वेचत फिरते आजुबाजूला पसरलेल्या तुझ्या आठवणी
ओच्यात गोळा करते रोज
एक एक आठवण घासून पुसून लख्ख करते
आणि मग ओळीने मांडून ठेवते… शोकेस मधे.
ए एक गंमत सांगू तुला…
इथे ना, शोकेसला दारंच नसतात.
त्यामुळे या आठवणी एका जागी रहातंच नाहीत रे…
सारख्या अलगद तरंगत बाहेर येतात
त्यांना गोळा करताना फार दमायला होतं
आणि नेमका त्याच वेळी …
त्याचवेळी तू फ़ोटोपुढे उभा राहतोस
फक्त एका काचेचं अंतर ….
…….
काय करु….
हे अंतर ओलांडताच येत नाहीये रे… 
हे अंतर ओलांडताच येत नाहीये…….. !!

जयश्री अंबासकर
२१.३.२०१८

No comments: