जीवन एक कोडं, न सुटलेलं
एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं
आयुष्य सरतं याच धडपडीत
असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधीत
वाट तीच, आखून दिलेली
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली
ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फ़िरायचं
वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं.
मानायची खुषी त्याच परिघात
कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात.
मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं
आणि मूळही छाटून चक्क बोनसाय बनायचं,
मिरवायचं दिवाणखान्यात एक शोपीस बनून.
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं,
ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी
कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या,
ज्या कापून काढतात ती वर्तुळं,
खुलं करतात आकाश,
स्वत:साठी, इतरांसाठी
आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.
जयश्री
1 comment:
खूप छान कविता आहेत तुमच्या..
प्रेम आणि प्रेम च ओसंडून वाहताय तुमच्या कवितेतून..
amol/manama/bahrain
Post a Comment