Sunday, November 19, 2006

मुखवटे आणि चेहरे

किती मुखवटे, किती चेहरे
किती खोटे, किती खरे
प्रयत्न केला शोधायचा जर
भीषण सत्य येईल समोर
त्या सत्याला सामोरं कधी जाता येईल का?

रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून तारीफ़ करणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?

कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?

कशाला हवेत हे जमाखर्च....
कशाला हवेत हे तर्ककुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?

नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?

जयश्री

3 comments:

गुरु said...

hi,
very nice poems!
I have a blog named http://MeMarathi.blogspot.com
where I upload the poems from our friends and collegues. I would like to publish your poems there, if you would like.

Let us know ASAP.
marathimitra@gmail.com

Aabhar!
Sarjya

Anonymous said...

वेगळ्या विषयावरची कविता बघून जरा आश्चर्य वाटले.प्रणयरंगातून एकदम व्यवहारी पातळीवर येण्याचे कारण काय?
आपण रोज विविध पातळ्यांवर वावरत असतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपण विविध मुखवटे घालून वावरत असतो.त्यावरचे आपले भाष्य अतिशय योग्य आहे. मात्र हे काव्य मला जरा मुक्तछंदात्मक(नेहमीच्या कवितेशी तुलना केल्यास) वाटले.

मुखवट्यावरून एक शेर आठवला....

अता लावला हा खरा चेहरा मी
अता माणसांनी मला ओळखावे
कवि: चंद्रशेखर सानेकर

Anonymous said...

मागे एकदा तुमच्या काही कविता वाचल्या होत्या. त्या खुप आवडल्या.
म्हणून आज वेळ काढुन तुमचा सगळा ब्लॉग वाचला. प्रत्येक कविता वाचली. खरचं फार छान लिहिता तुम्ही.
सर्वात जास्त आवडलेली कविता: कसे आवरु हृदय पाखरु....
"आवरु-पाखरु" हे शब्द मस्त जुळलेत.