वृत्त : जगदीश्वरबाला
मात्रावली - २ ६ ऽऽ ८ ४
गोजिरवाणी ऽऽ गोंडस माझी छकुली
कळले न कधी ऽऽ केव्हा मोठी झाली
आभाळ नवे ऽऽ शोधत थेट निघाली
बघता बघता ऽऽ भुरकन उडुनी गेली
आकाशाला ऽऽ अता गवसणी घाली
मज आठवते ऽऽ अजुनी बोबड बोली
नव क्षितिजाची ऽऽ ओढ तिच्या पंखांना
होती रडली ऽऽ शाळेला जाताना
अंगण अजुनी ऽऽ तिच्या सयीतच रमते
“आई-आई” ऽऽ लाघव हाळी घुमते
होईल कधी ऽऽ फिरुनी ते बागडणे
वाचून तिच्या ऽऽ घरटे केविलवाणे
भेटेल तिला ऽऽ राजसवाणा कोणी
नेईल तिला ऽऽ बनवुन त्याची राणी
होतातच का ऽऽ लेकी भरभर मोठ्या
जातातच का ऽऽ सोडुन अपुल्या घरट्या
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment