Monday, August 02, 2021

वृत्त - देवराज

देवराज वृत्त
गालगाल गालगाल गालगाल गालगा

भेटुनी सख्या तुला युगे कितीक लोटली
सांग तू कशी घडेल थेट भेट आपुली
दूर राहिलो तरी कधी न प्रीत आटली
ओढ मात्र आणखीच वाढली उरातली 

भोगले तुझ्याविनाच तप्त कोरडे ऋतू
आपसूक गोठले मनातले किती ऋतू
मूक जाहले ऋतू कधी न हासले ऋतू
फक्त क्रूर भासले तुझ्याविना सख्या ऋतू 

साद घातली किती मनास मी पुन्हा पुन्हा
हाक थेट पोचली तुझ्याकडेच रे पुन्हा
गुंतणे तुझ्यात मी असेल हा जरी गुन्हा
सांगते करेन मी असा गुन्हा पुन्हा पुन्हा 

दूर राहुनी सख्या किती असे झुरायचे
शुष्क होउनी कशास सांग तू जगायचे
स्वप्न पाहते मनात एकरूप व्हायचे
एकदा तुझ्या मिठीत धुंद मोहरायचे 

जयश्री अंबासकर



No comments: