धुंद होउनी पुन्हा
मेघ आज बरसले
पान पान मोहरून
अंतरी सुखावले
मेघनाद ऐकुनी
देहभान विसरले
झेलुनी प्रपात थेट
मन्मनी शहारले
नभातुनी कुणी जणू
सुगंध कुंभ ओतले
दरवळून आसमंत
चित्तही खुळावले
तरूवरी किती नवे
साज सुबक चढवले
जलमुकूट तरुशिरी
लखलखीत मढवले
सरी सरीत प्रेमरंग
गोड गोड मिसळले
अधीरशा धरेवरी
देह भरुन गोंदले
रिक्त होउनी नभी
मेघ सर्व पांगले
तृप्त तृप्त अंबरी
सप्तरंग उमलले
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment