वृत्त भवानी
मात्रा - २ ८ ८
८ ४
ही रात्र संपली आहे पण मग जाग अजुन का नाही
गात्रात पेरलेली मदहोशी ओसरली का नाही
डोळ्यात नीज पण गंधित सळसळ अजुनी चंदन देही
बेहोश धुंद चांदणे अंतरी तसेच चमकत राही
त्या निशाकराचे संमोहन सारून जरा बघ आता
किलबिलत गोड पाखरे सांगती जगी उषेची वार्ता
प्राजक्ताने बघ कूस बदलुनी सडा घातला दारी
उचलून चांदणे चंद्र बिचारा फिरला बघ माघारी
कोकीळ घालतो चराचराला मधुर बसंती हाळी
चैतन्य पालवी मोहरून सृष्टीवर चवर्या ढाळी
तो झेलत चंचल पहाटवारा हसतो पिंपळ गाली
जमलेली मैफिल पारावरची बघतो वाकुन खाली
रविकिरणे बघ ना किती प्रफुल्लित राजस सोनसकाळी
प्राजक्त मौक्तिके श्वेत केशरी ओघळती मखमाली
देऊन अर्घ्य तू स्वागत कर तेजस्वी नवसूर्याचे
श्वासात तजेला भरून गा तू, गीत नव्या स्वप्नांचे
जयश्री अंबासकर
ही कविता तुम्ही माझ्या आवाजात खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.
No comments:
Post a Comment