वृत्त – विधाता
मात्रावली – २ ८ ४, २ ८ ४
ती वाट पाहते दारी, तो उशीर करतो भारी
ती होते मग हिरमुसली, तो नेतो हसण्यावारी
नसते का त्याची सुद्धा, तेवढीच जिम्मेदारी
बाहेर जाउया म्हणतो, मग यावे वेळेवारी
ठरलाच किती दिवसांनी, हा बेत कालचा नाही
ती तयार होउन बसते, तो लवकर येतच नाही
का उशीर झाला त्याला, मग विचार काही बाही
पण नसते पर्वा त्याला, चुकले न वाटते काही
राखावी त्याने मर्जी, कधि त्यालाही वाटावे
राखावी त्याची मर्जी, का तिलाच हे वाटावे
का त्याने ना समजावे, का तिनेच समजुन घ्यावे
का त्याला हे न कळावे, दोघांनी समजुन घ्यावे
तो कमावतो अन भक्कम, आधार घराला देतो
ती घरात राहुन अपुले, सर्वस्व घराला देते
त्याचे चुकते कि तिचेही, की तकलादू हे नाते
कारण छोटेसे घडते, पण सारे बिनसत जाते
डोक्यातिल विचारभुंगा, नात्यास पोखरत जातो
नात्याचे ओझे होते, नात्यास अर्थ ना उरतो
संवाद एकमेकांचा, कायमचा थिजून जातो
एकांत जीवघेणा तो,
मग भकास केवळ उरतो.
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment