कधीतरी तू यावे अवचित चकीत व्हावे मी
तुला पाहुनी माझ्या शशुल्या खुशीत यावे मी
आईचा मग हात सोडुनी दुडुदुडु धावत तू
मला बिलगुनी करत रहावे "आज्जी-आज्जी" तू
किलबिलता मग तुझाच वावर बघत रहावा मी
तुझ्या बाललीला बघताना रंगुन जावे मी
तुझा खाउ अन तुझी खेळणी, तुझ्या हवाली मी
हरखुन जाणे तुझे राजसा निरखत राहिन मी
टपोर डोळ्यातील कुतूहल कसे टिपावे मी
तुझे निरागस हसणे रुसणे जपत रहावे मी
असाच मी अनुभवत रहावा वावर लडिवाळ
खडीसाखरी बोबडबोली नजर खोडसाळ
काळ जरासा थांबुन जावा तुझ्यासोबतीचा
रोज रोज हा उत्सव व्हावा असाच जगण्याचा
स्वप्नरंजनी किती रमावे भानावर येते
"आज्जी" म्हणुनी तुझी हाक अन कानावर येते
तुझी आज्जी 🤗🥰
No comments:
Post a Comment