लीलारति मात्रा वृत्त - २ ८ ८ ३
इवलासा
होता परीघ माझा जरी
परिघात
सुखाचा वावर होता तरी
नव्हता
जरि पैसा अडका माझ्या घरी
होते
परि जगणे कितीतरी भरजरी
मोहाची
आली किती वादळे घरी
माघारी
गेल्या किती विषारी सरी
राहिला
अबाधित दाराचा उंबरा
पावित्र्य
राखले घरात अन अंतरी
संसार
ठेवला छोटा पण नेटका
ना
दंभ कधीही उगाच केला फुका
मिळविली
भाकरी केवळ कष्टावरी
मानाने
जगलो कधी जाळल्या भुका
शांती, तृप्ती,
संयमात झाले जिणे
जगण्यात
कधीही नव्हते काही उणे
मज
समाधान देवाने इतुके दिले
पुरविले
मनाचे सौख्याचे मागणे
आयुष्य
वाटले जेव्हा सरल्यापरी
पाहिले
त्याकडे जरा त्रयस्थापरी
मी
कुबेर आहे कळले माझे मला
आकळले
सारे हिशेब केल्यावरी
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment