वृत्त – सुमंदारमाला लगावली – लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा
कितीदा कराव्या चुका त्याच त्या तू सुधरणार आहेस केव्हा मना
किती काळ फिरशील चक्रात दु:खी किती बोल तू लाविसी जीवना
किती वेळ गोंजारुनी दु:ख अपुले उराशी किती तेच कवटाळणे
उगाळून करतोस दु:खास ताजे किती ते उमाळे नव्याने पुन्हा
मिरवतोस भाळावरी कौतुकाने जुन्या त्याच जखमा कसा काय तू
शिळे होत आयुष्य संपून गेले जगायास बाकी विसरलास तू
तुझा तूच दोषी अशा वागण्याला शिव्याशाप दैवास देतोस का
असे दु:खकोषात जगणे स्वत:चे स्वत: मान्य केलेस का सांग तू
तुझ्यावर विखारी किती घाव झाले किती दंश झालेत जहरी तुला
किती तू बिचारा किती भाबडा तू किती या जगानेच छळले तुला
हिशेबात इतका रमलास दु:खी मना शून्य झाल्या तुझ्या जाणिवा
दिल्या कैक हाका सुखाच्या ऋतूंनी कशा बघ जराही न कळल्या तुला
अता दार उघडून बाहेर ये तू जरा मोकळा श्वास घे रे मना
तुझ्याभोवतीचे जुने पाश दु:खी करू दे कितीही नव्या वल्गना
नवा श्वास घे तू नवी आस हो तू नव्यानेच कर तू नवी कामना
तुझे मोकळे पंख पसरून घे रे तुझ्या अंबरी तू भरारी पुन्हा
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment