Monday, March 16, 2009

दुसरा कुणीच नाही.....


पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

जयश्री अंबासकर




1 comment:

नरेंद्र गोळे said...

जीवनाचे तत्त्वद्न्यान अगदी सुरेखरीत्या या कवितेत मांडलेले आहे. कविता आवडली.