Sunday, March 08, 2009

भूल

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला

चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली
बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली

सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा
मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला

यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला 

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटांत त्या रेंगाळली 

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले

जयश्री

2 comments:

Vivek said...

सुरेख! रूपक तालात छान बसेल चाल.

PRAMOD said...

भरतीच्या आवेगान कोजागिरी झाली तृप्त
सागराशी बिलगली चांद केवड्याची रात!