जुने सोडुनी नव्या दिशेला वळते आहे
दिशा मनाची पुन्हा नव्याने कळते आहे
दोन विकल्पांमधेच उत्तर दडले होते
प्रश्न सोडला म्हणुन अता हळहळते आहे
थिजल्या होत्या काळजातल्या भावभावना
आपुलकीच्या शब्दाने विरघळते आहे
क्रूर नाट्य अनुभवले होते वात्सल्याचे
स्पर्शदंश ते जुने तरी कळवळते आहे
उभा ठाकला भूतकाळ साक्षात समोरी
खपली निघुनी जखम पुन्हा भळभळते आहे
छाटत जावे हात पाशवी समाजातले
इच्छा असुरी मनामधे वळवळते आहे
कडे कपारीतुनी जरी कोसळते आहे
लाट मनाची उंचच उंच उसळते आहे
अपुली त्रिज्या, व्यास आणखी परिघ ठरवला
वर्तुळ व्यापुन आनंदी सळसळते आहे
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment