चुकते आहे काय नेमके समजत नाही
काय करावे, तेच नेमके उमजत नाही
नात्यामधले काय नेमके बिनसत आहे
त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे
नाते इतके तकलादू तर कधीच नव्हते
त्याच्या माझ्यामधे दुरावे कधीच नव्हते
तरी कशाने सोबत त्याची हरवत आहे
त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे
हरवत आहे हसणे हल्ली त्याचे माझे
मौनामधले झुरणे हल्ली त्याचे माझे
दुनियादारी ऐसीतैसी निभवत आहे
त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे
रुक्ष कोरड्या नात्यामधले क्षीण उसासे
उगा द्यायचे खिन्न मनाला फक्त दिलासे
आठवणींचे व्याकुळ मोहळ रडवत आहे
त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे
विझते आहे कणाकणाने ज्योत मनाची
मना उभारी मुळी न उरली अता कशाची
जगणे म्हणजे उरली केवळ कसरत आहे
त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे
जयश्री अंबासकर
No comments:
Post a Comment