Friday, March 24, 2023

समेट

समेट 

कुठे पोचण्यासाठी नव्हती आस
मनात नव्हती ओढ कशाची खास
पाय थांबले जशी संपली वाट
डोळे आले भरून काठोकाठ 

एकाकीशी होती माझी वाट
काळोखाने भरली होती दाट
कुणीच नव्हते ज्याची व्हावी भेट
होते केवळ गर्द उदासी बेट 

एकांताच्या कुशीत शिरले थेट
रडले ओक्साबोक्शी करुन समेट 
संयम लाटा फुटल्या अंदाधुंद
झाले पुरते अश्रूही बेबंद 

दु:ख निवळता आले पुरते भान
मान्य करावे नियतीचे हे दान
एकांताचा राखुनिया सन्मान
खेळ नवा मांडून पुन्हा जिंकेन 

करेन सुंदर जगणे माझे मीच 
एकांताचा विसरुन सारा जाच
मैत्रिण होइन आता माझी मीच  
नवीन आयुष्याची नांदी हीच 

जयश्री अंबासकर

No comments: