Sunday, November 07, 2021

वृत्त - मदनतलवार

गोदातीर्थच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी मदनतलवार वृत्तातली ही कविता

वृत्त
- मदनतलवार

(मांडणी १३ )

दुनियेत किर्र घनदाट हरवली वाट बिकट हा घाट दिसेना काही
लावले जगाने दार बंधने फार नवा अंधार सुचेना काही
लोटली युगे ना सरे जन्म हा झुरे रिक्तता उरे तेच ते भोग
वाटते पुरे हा त्रास सुखी आभास मुका वनवास फक्त उपभोग

का जुल्मी पुरुषी बळा सोसुनी कळा होउनी शिळा लावणे जीव
देहात नवा ओंकार नको आधार हवा अधिकार नकोशी कीव
रक्तात उसळते गाज सोडुनी लाज उधळते शेज आज सक्तीची
हृदयात पेटते आग जाळुनी बाग अंतरी जाग नव्या शक्तीची

शृंखला
जरी पायात टाकुनी कात मी दिमाखात भरारी घ्यावी
लांघुनी शीव थाटात करावी मात नवी सुरुवात उद्याची व्हावी
या कभिन्न काळ्या  तटी जरी एकटी परी संकटी तुझा आधार
ऐकुनी तुझी बासरी सख्या श्रीहरी पुन्हा अंतरी वाटतो धीर

जयश्री
अंबासकर




No comments: