सुखाला शोधतांना
तू
नदी खळखळ प्रवाही, मी
किनारा थांबलेला
तू
तुफानी धुंद कोसळ, हुंदका
मी दाटलेला
चंचला तू आसमानी, अश्म मी दुर्लक्षिलेला
तू
हवीशी या जगाला, मी
जगाने वगळलेला
तू
बसंती बहर नाजुक, वृक्ष
मी तर छाटलेला
भरजरी तू
वस्त्र आणिक जीर्ण मी बघ फाटलेला
शुभ्र स्फटिकासम परी तू, मी किती डागाळलेला
मूर्त तू सुंदर अखंडित, भग्न मी अन् विखुरलेला
भिन्न जग माझे तुझे अन मार्ग देखिल भिन्न होता
अन् परीघहि वेगळा पण केंद्र
बिंदू तोच होता
गाठण्याचा मग तुला तो, यत्न आटोकाट होता
गवसला प्याला सुखाचा, भरुन काठोकाठ होता
मी तुझ्या परिघात आलो, ज्या सुखाला शोधताना
तेच सुख मजला मिळाले, फक्त तुजला पाहताना
कौतुकाने पाहतो मी, तुज सुखाने विहरताना
रोखतो मग मीच अपुल्या, आसवांना वाहताना
जयश्री अंबासकर
ही कविता माझ्या आवाजात तुम्हाला Youtube वर ऐकता येईल.
तुम्हाला कविता आवडली तर नक्की Like, Comment आणि Share करा
आणि अशाच आणखी कविता ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेल ला नक्की Subscribe करा
No comments:
Post a Comment