नवा डाव
पाहिले मी तुला, तू मला पाहिले
प्रीतिचे कोवळे, बीज अंकूरले
आणभाका दिल्या, जीव आसूसले
आर्जवी बोलणे, लाघवी भासले
सोबती राहणे, गोड जे वाटले
सोबती राहता, ते कडू जाहले
प्रेम जे वाटले, ओसरू लागले
प्रेम होते कसे, आकळू लागले
पाशवी पाश ते, आवळू लागले
रंग स्वप्नातले, काजळू लागले
संयमी बांध ते, कोसळू लागले
दु:ख डोळ्यातुनी, पाझरू लागले
खेळ होता तुझा, मी तुझे खेळणे
हार माझी सदा, नी तुझे जिंकणे
रोजची भांडणे, तेच संतापणे
रोज खंतावणे, रोज कोमेजणे
संशयी कोष तू, भोवती आखले
श्वास मी ना कधी, मोकळे घेतले
हाय मी पोळले, हाय आक्रंदिले
भोग माझे जणू, सोसले, भोगले
दूषणे, टोमणे, मी किती ऐकले
मी बिचारी कशी, एवढी जाहले
बंध मी कोरडे, तोडुनी टाकले
मोडला डाव मी, मोकळी जाहले
एकटी मी अता, एकटे चालणे
एकटीने नवे, डावही मांडणे
भासले ना कधी, कोणतेही उणे
होय स्वीकारले, एकटे मी जिणे

ही कविता माझ्या आवाजात तुम्हाला Youtube वर ऐकता येईल.
तुम्हाला कविता आवडली तर नक्की Like, Comment आणि Share करा
आणि अशाच आणखी कविता ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेल ला नक्की Subscribe करा 

No comments:
Post a Comment