तुझं माझं घर मला कसं वाटतं सांगू......
तुझं माझं घर...एक झोका
कधी निळ्याशा ढगांत,
कधी पाचूच्या बनात.
तुझं माझं घर.... एक फुलबाग
कधी प्राजक्ती सडा
कधी धुंद केवडा.
तुझं माझं घर ... एक चांदणं
कधी टिपूर टिपूर
कधी गंधाळ आतूर.
तुझं माझं घर... एक पाऊस
कधी झिम्माड झिम्माड
कधी कोसळ द्वाड.
तुझं माझं घर.... एक मैफिल
कधी तुझिया सुरात
कधी माझिया तालात.
तुझं माझं घर ... एक देव्हारा
शांत समई प्रकाश
पराकोटीचा विश्वास
जयश्री अंबासकर
4 comments:
शेवटचे कडवे - केवळ अप्रतिम
"पराकोटीचा विश्वास" - त्याच आधारावर तर एवढे संसार उभे आहेत.
इतरही फार सुन्दर कविता आहेत तुमच्या.
शशांक
धन्यवाद शशांक :)
कविता गोड आहे. शेवट तर कळसच आहे.
धन्यवाद जानेमन :)
Post a Comment