Monday, April 02, 2007

असेच काही घडून यावे

निवांत संध्या हवा नशीली
असे बहाणे मिळून यावे
खट्याळ लाटा गळ्यात गाणी
असे तराणे जुळून यावे

भल्या पहाटे कधी तरी तू
लपून यावे, जपून यावे
तरंग माझ्या मनी उठावे
असेच काही घडून यावे

गुलाब गाली फुलून यावे
दवापरी मी टिपून घ्यावे
सवाल सारे विरून जावे
असेच काही घडून यावे

तुझ्या सवे या फितूर गात्री
नवेच गाणे सजून यावे
पुन्हा पुन्हा मी जगून घ्यावे
असेच काही घडून यावे

जयश्री

3 comments:

प्रमोद देव said...

पुन्हा एकदा 'अवि'स्मरणीय कविता!

Kamini Phadnis Kembhavi said...

वाह...
तुझ्या कविता गुणगुणायची सवय लागत चाललीये
मनातल्या मनात वाचुन समाधान होतच नाही अजीबात :)

Sonal said...

तुमच्या सगळ्याच कविता छान आहेत :-) पण नवरस विशेष आवडली.