भारतातल्या पावसाचं महत्व इकडे वाळवंटात आल्यावर जास्त कळलं. पावसाच्या आगमनाचे वेध, त्याची नांदी, मग त्या टपोऱ्या थेंबांचं राजेशाही आगमन........ आणि नंतरचा तो तुफानी कोसळ.......... सगळं सगळं कसं त्या आभाळातल्या दिग्दर्शकाच्या इशाऱ्याप्रमाणे झालेलं. पावसाचं प्रत्येक रुप वेगळं. पण प्रत्येक रुप तेवढंच मोहक. आता ह्या कवितेतला पाऊसच बघा ना.......!
वसुंधरेची हाक
कातरवेळी नीरव परिसर
लावी जीवाला उदास हुरहुर
नकळत हे घन भरुनी आले
तिजला मग आर्जवू लागले
आतुरलेली वेडी अवनी
थकूनी झोपली वाट पाहूनी
खट्याळ वारा कुठूनी आला
अलगद तिजला उठवू लागला
स्वप्नामधली वेडी धरती
कूस वळवूनी खुदकन हसली
तिचे निरागस हास्य बघाया
सौदामिनी ही धावून आली
मनातला हा तिचा प्रिया तो
तिला ओढूनी जवळी घेतो
मेघराज मग धावत येतो
त्या आवेगा साथच देतो
धुंद अजाण गंधित धरती
तृप्त होऊनी सुखावते
हरित तृणांचा मऊ गालिचा
फुलांसवे मग पांघरते
जयश्री
1 comment:
तुझ्या सगळ्या कविता वाचल्या आणि लुब्ध झालो! तुझ्या मनातलं ते स्वप्नाळू फुलपाखरू विविध भावभावनांच्या फुलांवर किती स्वच्छंदपणे विहार करतंय, ते तुझ्या मनस्वी, छंदबद्ध कवितांवरून दिसतंय! :-)
कधीकधी मला वाईट वाटतं की मला का नाही अश्या छानछान कविता करता येत? तेव्हा प्रा. राम शेवाळकर मनावर फुंकर घालतात. ते म्हणतात...,"प्रत्येक कवी हा एक बोलका रसिक असतो, आणि प्रत्येक रसिक हा एक मुका कवीच असतो!" :-)
नितान्तसुंदर कविता वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद! :-)
...धर्मा
Post a Comment