Thursday, November 16, 2023

आधी ये तू

मुक्त चांदणे विरघळण्याच्या आधी ये तू
प्राजक्ताच्या दरवळण्याच्या आधी ये तू

जखम केवढी जपतो झाकुन कौशल्याने
खपली निघुनी भळभळण्याच्या आधी ये तू

आठवणींनी पोखरलो आधीच केवढा
मुळापासुनी उन्मळण्याच्या आधी ये तू

रस्ता देखिल दमला चालुन माझ्या सोबत
कंटाळुन तोही वळण्याच्या आधी ये तू

मानत नाही कधीच कुठल्या अफवांना मी
किडा संशयी वळवळण्याच्या आधी ये तू

जयश्री कुलकर्णी अंबासकर

2 comments:

Vaishali Deshmukh said...

What a beautuful gazal!Very deep.

Anonymous said...

मनापासून धन्यवाद ❤️😊